🌹
क्षणो क्षणी तो देतो मजला हृदया मधुनी श्वास नवे..
*कशास मागू देवाला,*
*मज हेच हवे अन् तेच हवे?*
क्षितिजावरती तेज रवीचे
रोज ओततो प्राण नवे..
उजळविती बघ यामिनीस
त्या नक्षत्रांचे लक्ष दिवे....
निळ्या नभावर रांगोळीसम
उडती चंचल पक्षी-थवे....
*कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?*
वेलींवरती फुलें उमलती
रोज लेऊनी रंग नवे...
वृक्ष बहरती, फळे लगडती
गंध घेउनी नवे नवे...
हरिततृणांच्या गालिच्यावर दवबिंदूंचे हास्य नवे...
**कशास मागू देवाला,*
*मज हेच हवे अन् तेच हवे?*
प्रसन्न होऊनी निद्रा देवी
स्वप्न रंगवी नवे नवे
डोळ्यांमधली जाग देत असे
नव दिवसाचे भान नवे
अमृत भरल्या जीवनातले
मनी उगवती भाव नवे
*कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?*
कोण आप्त तर कोणी परका
उगा निरर्थक मन धावे..
सखा जिवाचा तोच, हरी रे,
नाम तयाचे नित घ्यावे...
*नको अपेक्षा,नकोच चिंता, स्वानंदाचे सूत्र नवे...*
*कशास मागू देवाला,*
*मज हेच हवे अन् तेच हवे?*
🙏
No comments:
Post a Comment