TechRepublic Blogs

Friday, August 23, 2024

उपासना

 ||श्री राम समर्थ||  


  *कहाणी श्री ब्रह्मचैतन्याची* 


        ||श्री गणेशाय नम:ll


ऐका श्री सद्‌गुरुनाथा तुमची कहाणी आटपाट नगर होते, कुठे होते हे नगर? 


 सातारा जिल्हा, तालुका माण, माण गंगेच्या तीरावर गोंदवले हे गाव. गोंदवले गावात वशिष्ठ गोत्री, शुक्ल यजुर्वेदी, देशस्थ ब्राह्मण रहात असे रावजी आणि सौ. गिताबाई कुलकर्णी त्यांच नाव. रावजी व गीताबाईंच्या पोटी एक अलौकिक बाळ जन्मले. गणपती त्यांचे नाव. प्रेमाने सर्व गणूबुवा म्हणत.  गणपतीला रामाची नामाची व ध्यानाची आवड.


 वयाचे बारावे वर्षी गणपती गुरुच्या शोधात निघाला. मराठवाड्यातील येहेळगांवी श्री  तुकामाईशी त्यांची भेट झाली. 


येहळगांवी येऊन गणूबुवांना नऊ महिने झाले होते. या काळात त्यांना  गोंदवल्याची वा आपल्या माता पित्याची आठवण झाली नाही. गुरूंच्या अखंड सेवेत ते स्वतःचे भान विसरले. त्यांच्या मनाचे व्यापार स्तब्ध झाले. भूक, तहान, झोप वगैरे देह धर्म सुटले. अंतकरण पूर्ण निर्वासन झाले. खऱ्या चित्तशुद्धीचे तेज त्यांच्या शरीरावर झळकू लागले.


रामनवमीच्या दिवशी भर उन्हात दोघे गुरुशिष्य रानात गेले. एका शेतात विहिरीवर दोघांनी स्नाने केली. एका अशोका वृक्षाखाली तुकामाईंनी गणूबुवांना हात धरून आपल्यासमोर बसवले आणि बोलले, "मी तुला आज पर्यंत फार कष्ट दिले. पण पूर्वी 

वशिष्टांनी रामचंद्र ला जे दिले ते मी तुला आज या क्षणी देतो" असे सांगून त्यांनी  गणूबुवांच्या डोक्यावर हात ठेवला गणूबुवांना तात्काळ समाधी लागली. काही वेळानंतर जेव्हा समाधी उतरली तेंव्हा तुकामाईंनी त्यांचे " ब्रह्मचैतन्य " असे नाव ठेवले आणि अत्यंत प्रेमाने आलिंगन दिले.

"श्री राम जय राम जय जय राम"  हा त्र्ययोदशाक्षरी मंत्र जपून राम उपासना करावी असे सांगून तुकामाईंनी श्री महाराजांना रामदासी दीक्षा दिली व अनुग्रह देण्याचा अधिकार दिला.


"प्रापंचिक लोकांना, विशेषतः  मध्यम स्थितीतील लोकांना आपल्या प्रपंचामध्ये परमार्थ कसा करायचा हे शिकव. राम मंदिराची स्थापना करून राम नामाचा प्रसार कर. माझे महत्त्व  वाढविण्यापेक्षा श्री समर्थांचे  महत्व वाढव. लोकांमध्ये भजनाचे प्रेम उत्पन्न होईल असा मार्ग दाखव. जे खरे दिन असतील त्यांची सेवा कर आणि सर्व ठिकाणी प्रेम वाढेल असा उपाय कर " 


इतक्या गोष्टी श्री महाराजांना तुकामाईंनी करण्यास सांगितल्या, यावेळी, सूर्य बरोबर डोक्यावर आला होता. 


श्री महाराजांनी अनेक ठिकाणी रामाची मंदिरे स्थापिली. गोंदाव‌ले ग्रामी रामाचे मंदीर बांधले व रामनामाचा प्रसार केला.


नीतीमत्तेने वागावे, परनिंदा, परधन विष्ठेसमान मानावे. परनारी मातेसमान मानावी. यथाशक्ती अन्नदान करावे. अहोरात्र रामनाम स्मरण करावे. सतत अनुसंधान ठेवावे जगाची आज सोडावी. सद्गुरुला अनन्यभावे शरण जावे. हा उपदेश तुकामाईंनी केला.


गोंदवलेग्रामी श्री महाराजांनी रामनामाचा, अन्नदानाचा मोठा हाट भरवला तो आजही अव्याहतपणे चालू आहे. 


*आयुष्याचा भरवसा नाही  म्हणून राम नामाचा वसा घ्यावा -*  हा वसा कधी घ्यावा?  आयुष्याच्या सुरुवातीस घ्यावा. हा वसा कसा घ्यावा? गोंदावलेग्रामी जावे. सद्गुरूंना अनन्यभावे शरण जावे, मस्तकाचे श्रीफळ अर्पावे, बाहूंचा हार घालावा. मनाची सुमने व्हावीत. हृदयाचे सिंहासन करावे त्यावर सद्गुरूंना बसवावे. काम, क्रोधाचा धुप लावावा. प्रेमाची ज्योत जागवावी. स्नेहाचे तूप घालावे. 'मी' पणाचा कापूर जाळावा. सर्वस्वाचा नैवेद्य दाखवावा, राम नामाचा प्रसाद घ्यावा,  तुळशी माळहाती घ्यावी, अखंड राम नामाचा जप करावा.


     *ह्याने काय होते?*  देह शुद्धी होते. चित्त शुद्धी होते, काम थकून जातो, क्रोध क्षीण होतो, लोह, विरून जातात, मी कोण हे कळते, जीवनाचा अर्थ कळतो, आत्मारामाचे दर्शन  होते.


आवडीने, तळमळीने व प्रेमाने 

घेतलेल्या कोटीच्या कोटी राम नामाने व सद्गुरु कृपेने ही  प्रचिती येते.


  *ही उपासना कधी करावी?* 

ब्राह्म मुहूर्ती उठावे, अंतरबाह्य  शुचिर्भूत व्हावे, अनन्यतेने, प्रेमाने स्नेहाने सद्गुरुंची शोडषोपचारे मानस पूजा करावी. सद्गुरूंना साष्टांग  नमस्कार करावा, षडरिपू त्यांचे चरणी अर्पण करावे, मूर्ती हृदयी साठवावी, नामस्मरण करावे. 


उतू नये, मातू नये घेतला वसा टाकू नये. हा वसा जन्मोजन्मी  चालवावा. 

*मोक्षप्राप्तीने या व्रताची परिपूर्णता होते.* 


जसे ब्रह्मानंद महाराज,  तात्यासाहेब केतकर, कुर्तकोटी, आनंद सागर रामानंद महाराज, प्रल्हाद महाराज यांना सद्गुरू कृपा झाली तशी तुम्हा आम्हा होवो, ही साठा उत्तराची कहाणी  पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.


  || सद्‌गुरु महाराज की जय ||

 


श्री. प्रकाश जोशी,

 

No comments:

Post a Comment