*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*🌷 काशीमध्यें प्रसिद्धि : श्रीमहाराज काशीमध्यें शास्त्रीबुवांच्याच घरीं उतरले. त्यांच्याबरोबर पांचदहा माणसें नेहमीं असत. थोड्या दिवसांनीं एका राममंदिरामध्यें श्रीमहाराजांचा मुक्काम हलला. एकदां श्रीविश्वेश्वराच्या दर्शनाला गेले असतां एक म्हातारी बंगाली बाई त्यांच्या पाया पडली. तिची चौकशी करतां ती म्हणाली, 'आम्ही बंगाली जमीनदार आहोंत. घरची अलोट श्रीमंती आहे. सर्व कांहीं अनुकूल आहे, पण माझ्या मुलाला मुलगा नाहीं. त्यानें तीन लग्ने केलीं, व आतां त्याचें वय ५५ च्या आसपास आहे.' श्रीमहाराजांनीं सहज विचारलें, 'बाई, तुमचा मुलगा व पहिली सून कुठे आहेत ? बाई म्हणाली 'ते कलकत्त्याला असतात, पण मी त्यांना ताबडतोब आपल्या दर्शनासाठीं बोलावतें.' आठ दिवसांनी तो बंगाली जमीनदार सर्व कुटुंब घेऊन काशीला आला. श्रीमहाराजांचे दर्शन घेतल्यावर त्याच्या पहिल्या बायकोच्या ओटीत (ज्या बाईचे वय ४०-४२ वर्षे होतें) श्रीमहाराजांनीं नारळ टाकला आणि तिला सांगितले, 'बाई, रामनामाचा साडेतीन लाख जप करा. हा नारळ जपून ठेवा, आणि मुलाच्या बारशाला तो फोडून सर्वांना वाटून टाका.' काशीमध्ये त्या वेळी एक कोट्यधीश व्यापारी रहात होता. त्याचे वय सुमारे तीस वर्षांचे असून आई, बाप, आजा, आजी, भाऊ, बहिणी, नोकरचाकर, वगैरे त्याचा परिवार फार मोठा होता. त्याचें लग्न होऊन तीन वर्षे झालीं होतीं आणि त्याला दीड वर्षाचा एक मुलगा होता. ज्याप्रमाणें त्या तरुण व्यापाऱ्याकडे पैसा अमाप होता त्याप्रमाणें त्याचा दानधर्मही हद्दीच्या बाहेर होता. त्याच्याकडे मागण्यासाठी गेलेला मनुष्य कधीं विन्मुख परत गेला नाहीं. भारताच्या सर्व भागांतून काशीमध्ये येणारे साधु, संत, बैरागी, यात्रेकरू, यांचें तो मायपोट होता. त्याचे द्वारीं अन्नछत्र होते. इतकेंच नव्हे तर काशीमधील जवळजवळ पन्नास कुटुंबांचा चरितार्थ त्याच्या जिवावर चालत असे. हा पुण्यवान् व्यापारी नवज्वरानें अकाली मृत्यू पावला. सर्व काशीमध्ये मोठा हाहाकार झाला; परंतु मृत्यूपुढे कोणाचा इलाज चालत नाहीं, हे जाणून लोकांनी त्याचें प्रेत मनकर्णिका घाटावर जाळण्यासाठीं आणलें, त्याची तरुण पत्नी सती जायला निघाली. प्रेताचे सर्व संस्कार संपून आतां अग्नि देणार इतक्यामध्ये लोकांच्या गर्दीमधून रामशास्त्री पुढे झाले आणि त्या बाईला म्हणाले, 'बाई! आपण आतां जाणारच आहांत, पण ज्याअर्थी आपण इतक्या साधुसंतांना नमस्कार करीत आहांत त्याअर्थी आणखी एका साधूला नमस्कार करायला चला.' शास्त्रीबुवांनीं तिला श्रीमहाराजांकडे आणले. त्यांच्या कानावर सर्व वस्तुस्थिती घातल्यावर श्रीमहाराज बोलले, "चला, मला त्या पुण्यवान् आत्म्याला एकदां बघू द्या." शास्त्रीबुवांनी श्रीमहाराजांना घाटावर आणलें, लोकांना बाजूला करून स्वारी जेव्हां त्या प्रेताजवळ आली तेव्हां सर्व लोकांची उत्सुकता कळसास पोंचली. श्रीमहाराज बोलले, 'अहो, याला सोडा, हा तर जिवंत आहे!" असें लोकांना सांगून ते त्या बाईला म्हणाले, "माय, तुमचा पति जिवंत असतांना तुम्ही सती कशा जातां ?" श्रीमहाराजांनीं थोडें गंगाजल मागून घेतलें, आणि तीन वेळां 'श्रीराम' म्हणून ते त्या प्रेताच्या तोंडांत घातलें.
दोन-तीन मिनिटांनीं त्यानें डोळे उघडले, आणि जसा एखादा मनुष्य झोपेतून जागा व्हावा त्याप्रमाणें तो सावध होऊन उठून बसला. (म्हणूनच श्रीब्रह्मानंदांनीं आरतीमध्ये म्हटले आहे की, "वाराणसी क्षेत्रदि प्रेतव बदकिसि दातने.") एकदम जिकडे तिकडे या नव्या सत्पुरुषाचा जयजयकार होऊ लागला आणि जो तो त्यांच्या पाया पडण्यासाठीं धडपड करूं लागला.
परंतु श्रीमहाराजांनीं धाडकन् गंगेत उडी मारली आणि ते तात्काळ नाहींसे झाले. तो व्यापारी मोठ्या आनंदानें सर्व मंडळींबरोबर घरीं गेला. नंतर त्यानें पुष्कळ दानधर्म व अन्नदान केलें; परंतु ज्या महापुरुषानें आपले प्राण वांचवले त्याचें पुन्हा दर्शन व्हावें ही तळमळ त्या नवराबायकोला लागून राहिली*
*-- चरित्र*
No comments:
Post a Comment