श्रीराम,
नुकताच आंब्याचा सिझन येऊन गेला. त्या आम्रफळाचे रसभरित वर्णन करणे हा झाला एक भाग! त्या फळाच्या माधुर्याचा आकंठ आस्वाद घेणे हा झाला दुसरा भाग!
एकाला परोक्षज्ञानाने म्हणजे शब्दांच्या साह्याने मिळालेले ज्ञान म्हणता येईल तर दुसरा अनुभव आहे म्हणजे अपरोक्ष ज्ञान.
ज्याने आंब्याची गोडी चाखली त्यालाच वर्णन करण्याची उर्मी येते, परंतु ज्याने आंबा पाहिला नाही आणि खाल्लाही नाही, त्याचे बाबतीत नुसतेच शब्दाने वर्णन करणे कुचकामी ठरते. संत असे म्हणतात - ब्रह्मानंदी लागली टाळी |तेथे देहाते कोण सांभाळी||
हा त्यांचा स्वानुभव आहे आणि हे आपल्या साठी नुसतेच परोक्ष ज्ञान आहे पण सत्संगाने संतांच्या, सद्गुरूंच्या विचाराच्या सान्निध्यात आनंदाचे साम्राज्य कसे असते ह्याची क्षणमात्र ओळख होते त्या माधुर्याचा आस्वाद घेता आला की मनातील विकारांचे प्राबल्य कमी कमी होऊ लागते.. आणि विमान जसे आकाशात झेप घेण्यापूर्वी धावपट्टी वरून धावते त्या प्रमाणे निरपेक्ष आनंदाच्या अनुभूतीसाठी आपले मन सत्संगाकडे धाव घ्यायला लागते.... हे फक्त सद्गुरू कृपेने शक्य होते.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment