TechRepublic Blogs

Thursday, August 21, 2025

तिसरा विचार

 *॥श्रीहरिः॥*


कोणत्या कालात देहावसान झालं असता योगी जन्ममरणांपासून मुक्त होतात आणि कोणत्या कालात देहत्याग केल्यानंतर पुनर्जन्माला प्राप्त होतात हे उलगडताना भगवंत म्हणतात, 


*-----------------------------*


॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता अष्टमोध्यायः 


*अग्निर्ज्योतिरह: शुक्लः* 

*षण्मासा उत्तरायणम् ।*

*तत्र प्रयाता गच्छन्ति* 

*ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥* 

*॥८.२४॥*


(श्रीमद्भगवद्गीता अध्याय आठवा अक्षरब्रह्मयोग ८.२४) 


*भावार्थ :- पार्था, शरीरातले अग्नितत्त्व, बाहेरचा दिवसाचा लख्ख प्रकाश, शुक्ल पक्ष आणि उत्तरायणाचे सहा महिने म्हणजेच मकरसंक्रतीपासून - कर्कसंक्रातीपर्यंतचा सहा मासांचा काळ - या शुभ काळात मृत्यू पावलेले योगी ब्रह्मवेत्ते, ब्रह्मपदाला जाऊन पोहोचतात.* 


जे परमब्रह्माला जाणतात ते, अग्निदेवतेच्या प्रभावामध्ये, प्रकाशामध्ये, दिवसाच्या शुभक्षणी शुक्लपक्षामध्ये अथवा सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो, त्या सहा महिन्यांमध्ये या भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती करतात.


*-----------------------------*


मागील श्लोकामध्ये सांगितलेल्या दोन मार्गांपैकी एक मार्ग समजावताना भगवान श्रीकृष्ण  म्हणतात, 


*काही अशा योग्य संधी असतात, ज्यावेळी शरीर सोडल्यानंतर मनुष्य परम गतीला प्राप्त होतो, पुन्हा जन्म घेत नाही.* 


"अग्नी ज्योतीच्या प्रभावामध्ये, दिवसाच्या वेळी, शुक्ल पक्षामध्ये आणि उत्तरायण काळामध्ये केलेला देहत्याग सद्गतीला प्राप्त होतो." 


आता एक एक करून यांचे अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.



*अग्नी ज्योती,* *दिवसाच्या वेळी* हे शब्द ज्ञानाच्या प्रकाशाकडे संकेत करतात. हे साधकाची ज्ञानावस्था, समज दर्शवतात. जिथे, 'मी हे शरीर नाही... शरीराच्या पलीकडील चैतन्य आहे... शरीराचा मृत्यू म्हणजे माझा मृत्यू नव्हे... माझा प्रवास तर पुढेदेखील सुरू राहणार आहे... 


*पुढील प्रवासामध्ये* मला उच्च स्तरांवर जायचं आहे...' हे स्पष्ट असतं. जिथे मृत्यूकाळी कोणताही संभ्रम नसतो. फक्त वरील आवरण

निघण्याचा, दूर होण्याचा तो अनुभव असतो.


*अमावस्येनंतरचे* ते पंधरा दिवस जेव्हा चंद्र आकाराने हळूहळू मोठा होत जातो आणि पौर्णिमेला प्राप्त होतो, हा काळ शुक्ल पक्ष म्हणून ओळखला जातो. चंद्राचा आकार

वाढणं म्हणजे प्रकाश अधिकतम ज्ञानाकडेच इशारा करतो. जो या अवस्थेमध्ये शरीराचा त्याग करतो, तो भगवंताच्या परमधामाला प्राप्त होतो.



*उत्तरायण* ही सूर्याची एक दशा आहे, जेव्हा सूर्य उत्तरेकडे गमन करतो. शास्त्र आणि धर्म यांनुसार उत्तरायणाचा काळ, देवतांचा ‘दिवस' मानला गेलाय. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे, दिवस प्रकाशाचं, ज्ञानाचं प्रतीक आहे. त्यामुळे उत्तरायणामध्ये मृत्यू होणं फार अत्यल्प वेळा घडतं. अर्थात या दरम्यान ज्ञान स्पष्ट आणि प्रखर असतं. मृत्यूसाठी योग्य वातावरण असतं.


*देहत्याग* करतानाचा हा शुभ काळ म्हणजे प्रत्यक्षात आंतरिक बाब आहे. त्यामुळे ती समजावण्यासाठी बाह्य शब्दांची जोड दिली आहे.परंतु कालांतराने हे शब्द आपले अर्थ गमावतात. लोक त्याचे वरवरचे अर्थ समजून म्हणतात, 


"मनुष्याचा मृत्यू अमृतकाळात, अशा शुभ मुहुर्तावर, शुक्ल पक्षामध्ये, उत्तरायणात झाला तरच त्याला सद्गती मिळेल." 


अशा प्रकारे बाह्य व्यवस्थांची जुळवा-जुळव करण्यात, त्यानुसार ठोकताळे बांधण्यातच लोक व्यग्र असतात. या गोष्टींना दिलेल्या अवाजवी महत्त्वामुळे त्यांना अस्सल गोष्टींचंच विस्मरण घडतं. 


*एखाद्याने* मनाच्या शुद्धतेवर कार्यच केलं नसेल, ध्यानाचा /नामस्मरणाचा अभ्यासच केला नसेल, आपली  कर्मे ईश्वराला समर्पितच केले नसतील, 'स्व' अस्तित्वाच्या जाणिवेमध्ये डुबकीच मारली नसेल, त्यामध्ये तल्लीनच झाला नसेल तर हे सगळे बाहेरचे शुभ मुहूर्त साधूनदेखील तो रिटर्न तिकीटच काढणार. 

*अर्थात त्याला पृथ्वीवर परत यावंच लागणार.*



*उत्तरायणाचा अर्थच आहे, अंतर्मुखी होणं.* 

मृत्यूच्या वेळी जर साधक अंतर्मुखी झाला तरच त्याला सद्गती प्राप्त होऊ शकते. या गोष्टीचं ज्ञान त्याला तेव्हाच होईल जेव्हा मनुष्य अंतिम क्षणी मनाला बाह्य गोष्टींपासून दूर त्याला समजेल, की बाहेर जे चाललंय, त्याची काळजी करायची नाही. बस अंतर्मुख होऊन प्रार्थना करायची आहे.


आपण एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून जातो तेव्हा परत येताना त्यांनी केलेल्या आदरातिथ्यासाठी त्यांना धन्यवाद देतो. 


*त्याचप्रमाणे* 

अंतिम काळात या पृथ्वीलाही धन्यवाद द्या, जिथे आपण पाहुणे बनून आलो होतो. या पाहुणचारामध्ये आपल्याला जे शुभचिंतक मिळाले त्यांनाही धन्यवाद द्या. 


जे अशुभचिंतक होते, ज्यांनी आपल्याला विरोधाला सामोरं जाण्यासाठी ताकद दिली त्यांना देखील धन्यवाद द्या.आयुष्यात ज्यांच्यासोबत आपले वादविवाद झाले, त्यांची क्षमा मागा आणि जे आपल्याशी वाईट वागले, त्यांना क्षमा करा. आपल्या संपर्कात आलेल्या निर्जीव वस्तूंना देखील धन्यवाद द्या आणि त्यांची क्षमा मागा.आयुष्यभर आपल्याला ही सवय असेल तरच अंतःकाळीदेखील अंतर्मुखी होऊन आपण हे सर्व करू शकाल. तेव्हाच आपल्याला *नॉनरिटर्न* तिकीट मिळेल, *सद्गती प्राप्त होईल.*



*-----------------------------*


*एका प्राचीन मतानुसार,* 


शुक्लगती(देवयानमार्गे) आणि कृष्णगती(पितृयानमार्गे) असे दोन प्रकार आहेत. शुक्लगती म्हणजे शुद्धगती आणि कृष्णगती म्हणजे कुटिलगती. सुर-असुर वृत्तींचा इथे संबंध असावा. ज्याची जशी वृत्ती तशी त्याची गती!


उत्तरायणाचा संबंध इथे येण्याचं कारण कदाचित भौगोलिक परिस्थिती असावी -


म्हणजे *आर्यांचं* सुद्धा मूल वसतीस्थान असावं. वैदिक आर्यांचं मूलस्थान *उत्तरध्रुव प्रदेशात* होतं अशी लोकमान्य टिळकांसह कित्येकांची मान्यता आहे तर कित्येकांचा या विचाराला विरोध आहे. काही अभ्यासक एका विशाल

उल्केच्या टकरीमुळे पृथ्वीचा ध्रुवच बदलला असं मानतात. म्हणजे ध्रुव मेरुपर्वतापाशी होता; अर्थात हिमालयात किंवा मध्य आशियापाशी होता असं मानतात. पण देवांची, ऋषींची वस्ती ध्रुवप्रदेशात होती, असं *महाभारतात* निःसंदिग्धपणे म्हटलं आहे.


*तिथे* सहा महिन्यांचा दिवस आणि सहा महिन्यांची असते. दक्षिणायन कालातील अडीच मास अशा प्रदेशात पूर्णपणे अंधकाराचं साम्राज्य असतं. त्या कालात एखाद्याचा मृत्यू झाला तरत्याच्या मृत शरीरावर अंत्यसंस्कार करता येत नसत. कारण सूर्यकिरणं मृत शरीरावर पडल्याशिवाय ते शरीर शुद्ध होत नाही, अशी तत्कालीन आर्यांची श्रद्धा होती.


त्या कालात नद्यांचे प्रवाह थांबायचे. वनस्पतींची वाढ खुंटायची.ज्योतिर्मय अनी नसायचा. अशावेळी मृत शरीराची विल्हेवाट कशी लावावी हा प्रश्न उभा असे. हिवाळा संपेपर्यंत ते शव एका पेटीत योग्य रीतीनं ठेवण्याची प्रथा होती. पारशी धर्मग्रंथ *'अवेस्ता'* मध्ये त्याचं सविस्तर वर्णन आहे.


मग पुन्हा *उत्तरायण* सुरू झालं, पक्षी उडू लागले, वनस्पती वाढू लागल्या, जलप्रवाह वाहू लागले की त्या शवाची रीतसर विल्हेवाट लावली जायची. उत्तरायणात सूर्य ध्रुव- प्रदेशातच सतत क्षितिजावर फिरत असल्यामुळे मृत शरीराच्या विल्हेवाटीत कोणतीच अडचण येत नसे. म्हणून उत्तरायणाचा काल मृत व्यक्तींसाठी पवित्र मानला जायचा. इजिप्तमधल्या पिरॅमिड्समध्ये देखील मृतव्यक्ती थेट सूर्यलोकी जाव्यात म्हणून त्यांच्या ममीज् करून त्या जतन केल्या जायच्या.सूर्यलोकाला म्हणजेच प्रकाशलोकाला तेव्हा किती महत्त्व होतं ते दिसून येतं.



*एक दूसरा विचार म्हणजे,* 


विशिष्ट वेळी आणि परिस्थितीत *विश्व-द्वारं* *(Star - Gates)* उघडली जात असावीत. ती वेळ साधणारा ग्रहगोलांमधे फिरत न राहता ब्रह्मलोकापर्यंत निसटून जात असावा. रॉकेट्सही विशिष्ट कोनातूनच पृथ्वीच्या कक्षेबाहेर सोडावी लागतात. नाहीतर ती पृथ्वीवर कोसळतात! 


(भीष्माचार्यही उत्तरायणासाठी प्राण धरून होते, हे महाभारतात लिखित आहे.) 


*त्या काळी लोकांना असं कोणतं ज्ञान होतं म्हणून ते उत्तरायण कालाला इतकं पवित्र मानत होते, हे एक गूढ आहे.*



*तिसरा विचार म्हणजे,* 


जीवनभर शुद्धं कर्मं केली तर त्या जीवासाठी या कालात आपोआप स्टार गेटस् मुक्त होत असावीत. २६-२७व्या श्लोकांच्या संदर्भानं हा विचार तपासून बघितला तर तो अधिक योग्य वाटतो.


*पाच हजार वर्षांपूर्वी आपल्या प्राचीन ऋषींना हे ज्ञान होतंच. त्या ज्ञानाचा अर्थ लावणं आज जिकिरीचं जातं.*


या श्लोकांमधून गीताकारांना नेमकं काय सांगायचं आहे? यावर बुद्धिनिष्ठ दृष्टिकोनातून पुष्कळ संशोधन होणं आवश्यक आहे.


*-----------------------------*


संदर्भ ग्रंथ :-

श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीताभाष्य. 

संपूर्ण भगवद्गीता. 



*॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥*

No comments:

Post a Comment