TechRepublic Blogs

Saturday, August 9, 2025

अनुसंधान

 *नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ति ll*


सदगुरुंची प्राप्ती झाल्यानंतर ‘गुरुसेवा’ करणे हे शिष्याचे परमकर्तव्य आहे. गुरुसेवा म्हणजे त्यांची आज्ञा पाळणे. मनात कोणताही किंतू न ठेवता, विकल्प येऊ न देता त्यांनी सांगितलेली साधना नित्यनियमाने प्रेमाने करावी. तसेच साधकाची संपूर्ण शरणागती असावी. शरण जाणे म्हणजे १) सदगुरु ठेवतील त्या अवस्थेत समाधानात राहणे. २) त्यांच्या इच्छेत आपली इच्छा मिसळणे. ३) कोणत्याही परिस्थितीत नाम घेण्याचे सोडू नये. ४) नामावर, सदगुरूवर पूर्ण विश्वास, श्रद्धा ठेवणे. त्यांनी सांगितलेले साधन न करता इतर साधन केल्यास वृथा कष्टच होतील आणि पदरात काही पडणार नाही. सदगुरुंना जे शरण जातात त्यांचा कार्यभार सदगुरु उचलतात. त्यांच्या मागे-पुढे उभे राहून ते सत्तारूपाने त्यांना मदत करतात. सदगुरु नावाड्याचे काम करतात. आपली जीवनरूपी नौका योग्य दिशेला घेऊन जातात.


भगवंताच्या आशीर्वादानेच आपली सदगुरुंशी भेट होते व सदगुरुंकडे नाम मिळाल्यानंतरच ईश्वराच्या व्यापक स्वरूपाची महती कळते.


सदगुरुंचे ‘अनुसंधान’ राखणे महत्त्वाचे. कोणतेही प्रापंचिक काम करत असताना सदगुरुंवर मन एकाग्र करणे यालाच अनुसंधान असे म्हणतात. सदगुरुंना दृष्टीआड होऊ न देणे म्हणजेच अनुसंधान. अनुसंधान ठेवण्यासाठी त्यांनी दिलेले नाम नियमितपणे घेणे. प्रपंच करताना आपले लक्ष मात्र सदगुरूंच्या चरणी असावे. ते म्हणजेच अनुसंधान. 


जिथे आपले समाधान होते, संशय, शंका फिटतात तेच गुरुपद म्हणावे. गुरुपद, गुरुतत्व सर्व ठिकाणी एकच असते म्हणूनच -


*ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे । त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ।*

*मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ॥*


!! श्री महाराज !!

!! श्रीराम जयराम जय जय राम !!

!! श्रीराम जयराम जय जय राम !!

!! श्रीराम जयराम जय जय राम !!

!! श्रीराम जयराम जय जय राम !!

          !! श्रीराम समर्थ!!

No comments:

Post a Comment