कर्मामध्ये अमुक एक कर्म माझ्या वाट्याला आलं पाहिजे असे वाटते, पण ते माझ्या हातात नाही. तसंच अमुक एक कर्म केलं तर ते फळ मला मिळेल, हे माझ्या हातात नाही. जीवनात कोणती अशी गोष्ट आहे की तुम्ही ती हमखास करू शकता? जीवनात कोणावर कोणत्या वेळी काय प्रसंग येईल याचा नेम नाही. या विश्वाला एक कारणांची परंपरा आहे. आपण एका संस्कृती मध्ये जन्माला येतो आणि तिची बंधन आपल्या जीवनावर पडतात.
ज्या परिस्थितीत आपण आहोत, ज्या समाजात आपण आहोत, ज्या भाषेत आपला व्यवहार होतो त्याचं दडपण आपल्या जीवनावर असते. या जीवनामध्ये कर्माची परंपरा आहे आणि त्या परंपरेच्या बाहेर तुम्हाला जाता येत नाही. त्या परंपरेत जन्माला येणे याला प्रारब्ध म्हणतात.
प्रारब्ध म्हणजेच विश्र्वाच जे कर्म आहे, प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये तुम्ही जन्माला येता. मग त्या प्रवाहाचे गुणधर्म लागू होतात. प्रारब्ध म्हणजे विश्वाच्या कर्मसंचयामध्ये माझ्या वाट्याला जे कर्म जन्म घेताना आलेलं आहे ते प्रारब्ध.
याचा व्यक्तिगत संबंध काय त तर मी अमक्या ठिकाणी, अमक्या वेळी, अमक्या कुटुंबात जन्माला येणे, स्त्री अथवा पुरुष म्हणून आणि माझ्या हातून काय कार्य व्हावं हे विश्वाच्या योजने मध्ये ठरलेलं आहे.
No comments:
Post a Comment