TechRepublic Blogs

Saturday, August 23, 2025

कैफ

 🌈🛕⛱️🏆

मूसाफीर ......


*क्षण चोरताना....*


सांबार गँसवर चांगला खळखळ उकळत होता. घरभर त्याचा दरवळ भरुन राहीला. शेजारच्या शेगडीवर इडलीचा पहिला घाणा कुकर मधुन खुणावत होता. बाहेर सगळं उरलेलं कुटुंब. रंगात आलेली क्रिकेट फायनल मँच बघण्यात गर्क. 


स्वप्नाली ला एकदम तीव्र इच्छा झाली. तो गरम सांबार वाफाळत्या इडलीवर ओतून मस्तपैकी आडवा हात मारावा. बाहेर मुलगा, नवरा त्रिभूवन, नातवंड अजुन खायचे आहेत आणि आपण असं सगळ्यांच्या आधी खाणं, तिचं तिलाच नकोस वाटलं.


पण ... तिने घेतलाच बाऊल.

दोन वाफाळत्या इडल्यांवर मस्त बाऊलभर सांबर वाढुन घेतले. सहजच बाहेरची हालचाल बघून ती परत किचनमध्ये आली, 


खुर्चीवर बसुन लुसलुशीत इडलीचा सांबारां बरोबरचा पहिला तुकडा मोडून तिनं तोंडात टाकला. *अंम्म्म आहाहा ऽऽऽ ...*


परफेक्ट जमलेलं काँबिनेशन. त्या दोन इडल्यात स्वप्नाली तृप्त झाली. म्हणजे भूक भागली असं नाही. पण इच्छेची तीव्रता निमली. एक चोरलेला क्षण स्वतःच्या इच्छेसाठी. तिला तृप्ती ची अनुभूती देऊन गेला.आणि तिचा तो क्षण कुणाला समजला देखील नाही.


तिची क्षणाची चोरी निर्धोक झाली.


खरं तर इतक्या वर्षाच्या तिच्या संसारात तिला काही बंधनं नव्हतीच मुळी कुणाची. पण स्वतःच स्वतःसाठी घालुन घेतलेलं एखादं बंधन असतच प्रत्येक गृहीणीपाशी.

स्वयंपाकघरातलं तिचं स्वातंत्र्य अबाधित च असतं पण तरी ही , वाटलं म्हणुन घेऊन खावं असं कधी होतच नाही. सगळ्यांना वाढून तिच्या रसवंती पर्यंत पोहचेतो. पदार्थ गार होऊन गेलेला असतो. 

करुन बघून, दमल्यामुळे कदाचित, खाण्याची इच्छा कमीच उरते. केवळ भुकेसाठी खाणं होत असतं नेहमी. कधीतरी वाटतच त्याला छेद द्यावासा आणि उपभोगावा आपल्याच बंधनांची मुक्तता. त्यासाठी मात्र क्षण चोरण्याची कला अवगत व्हायला हवीय.

असे अगणित चोरटे क्षण रोज खरं तर मनाच्या दारावर दस्तक देऊन जातात. पकडता आले. ते साजरे करता आले तर, आपलंच आपल्याशी एक मस्त नातं जमून जातं.


कधी तरुण होऊन. बेभान गाव ऽऽऽ सं वाटतं. तर कधी हातपाय ताणून गुरफटून जावसं वाटतं. निरभ्र आकाशातले उडते पक्षी कधी शीळ घालायला मजबूर करतात. तर दारातली उमलती कळी दोन क्षण तिला गोंजारायचे मागणे मागते.


रेनकोटचा उद्धार करत कधीतरी धो धो पावसात मनसोक्त भिजावसं वाटतं. तर दाटलेल्या आभाळाशी वाफाळत्या चहा बरोबर कुणाला आठवावंस वाटतं. प्रत्येक क्षणांचा असा कैफ अनुभवासा वाटतो. 

पण व्यस्त आणि रुढी परंपरांची गस्त असणारे क्षण फक्त येतात आणि जातात. त्यावर लक्ष ठेवून 


*बस्स हमे उन्हे चुराना है.* 

    *खुद के लिये ..*

*जीयो जी भर के ऽऽऽ...*


*जिंदगी हंसने गानेके लीये है पल दो पल*

*इसे खोना नही, खोके रोना नही*

*जिंदगी हंसने गानेके लीये*


मूसाफीर हूं यारों .......

🍁🌈🛕⛱️🍁

No comments:

Post a Comment