पर्स काढून घेतलेली आई --
सुटीवर आलेला लेक जीवाची असोशी पुरवतो ही भावनाच मनाला अतीव समाधान मिळतं.त्याच्याबरोबर कुठेही जाणं म्हणजे त्याच्या सहवासाची तहान भागवून घेणं .सून अवतीभवतीनं वावरत काळजी घेते , आवर्जून हवं नको बघते ,नातू कुशीत शिरत ' आजी गोष्ट सांग ना ' म्हणत लडिवाळ हट्ट धरतो.या सगळ्या क्षणांना मन घागरभर ओसंडून येतं. भरून आलेले डोळे लपवायला प्रयास पडतात. एकेक वर्षाची गॕप एकेका क्षणाच्या पोह-याने भरायची असते.
लेकाबरोबर चक्क मराठी सिनेमाला त्याच्या कारने निघाले होते.खांद्यावर माझी सवयीची पर्स लटकलेली होती. ती सावरत त्याच्या शेजारी टेकणार तोच त्याने " ती पर्स कशाला बरोबर घेतेयस ?ठेव ती." असं म्हटलं.मी क्षणभर विचार करून पर्स बाहेर उभ्या असलेल्या सुनेच्या हातात दिली.
तिने ती तिच्या खांद्यावर घेतली.
गाडी सुरू झाली.
सिनेमागृहात सिनेमा सुरू व्हायला अजून थोडा वेळ होता.बाहेर थांबलो.लेकानं चक्क पाॕपकाॕर्न माझ्या हातात ठेवलं.लहानपणी त्याचं बोट धरून मी हिंडवलं असेन,खाऊ दिला असेल त्याचं आरश्यातल्यासारखं प्रतिबिंब दिसायला लागलं उलटी प्रतिमा !
मी चुळबुळत होते.अस्वस्थ होते.माझा खांदा इतका रिकामा ? मी एवढी मोकळी ? दोन्ही हात इतके मोकळे कधीच नव्हते. काय करू या मोकळ्या हातांचं ?
अंधारात पाय-या चढताना कठड्याला धरण्याचंही काम हातांना नव्हतं.लेकानं त्याच्या कणखर हातात हात धरला होता.
सिनेमा कसा होता हे माझ्या दृष्टीने फारच दुय्यम होतं.मी मोकळ्या खांद्याने फिरते आहे याचं अपरूप मनात पुन्हा पुन्हा उमटत होतं.आज मांडीवर ओझं नव्हतं पर्सचं.
कायकाय वागवावं लागत होतं आजवर !
पैसे ... हं ...साहजिकच नोटा कमी चिल्लर जास्त असे असायचे.
रूमाल,किल्ल्या, पेनं, पिना, आधार,पॕनकार्डची झेराॕक्स,कानातल्या कुडीच्या जोडातलं एकुलतं राहिलेलं, फोननंबर लिहिलेली चिटोरी... वाणसामानाची यादी ....!
सांसारीक ,सामाजिक अस्तित्वाचे सगळे साक्षीदार पर्समध्ये हजर असतात. पर्स हा आयुष्याचा फेविकाॕल लावलेला जोड आहे.
अशीच भावना तर होती.
आज याने माझी पर्स काढून ठेवायला लावली.
खूप मोठ्या जबाबदारीचं आजवर वाहिलेलं ओझं त्याने सहजपणाने उतरवून ठेवायला सांगितलं.सुनेच्या खांद्यावर माझी पर्स होती. ' माझं ' असं जडसं काही या दोघांनी फार उमदेपणाने पेललं असं वाटलं.
आज माझं टेन्शन चिल्लर झालं होतं.
लेकाचा खिसा माझं चलन होतं,
माझं कोणतंही कुलूप उघडण्याचा पासवर्ड लेकाकडे होता.
माझं आधारकार्ड तोच होता.
माझी वेगळी स्पेस जपणारा कप्पाही त्याच्याचजवळ होता.
पर्स काढून घेतलेली आई मोकळ्या खांद्याने
फिरत होती... मनातली पर्स चेन लागू नये एवढी तट्ट फुगलेली आहे.... !
----- आई.
लेखक माहीत नाही
No comments:
Post a Comment