*॥श्रीहरिः॥*
अनन्य भक्तीच्या साधनाने ईश्वराचे परमधाम प्राप्त करणारा जीवात्मा कोणत्या मार्गाने जातो, हे भगवंत सांगतात,
*-----------------------------*
॥ॐ श्री परमात्मने नमः ॥
अथश्रीमद्भगवद्गीता अष्टमोध्यायः
*यत्र काले त्वनावृत्ति-*
*-मावृत्तिं चैव योगिनः।*
*प्रयाता यान्ति तं कालं*
*वक्ष्यामि भरतर्षभ ॥*
*॥८.२३॥*
(श्रीमद्भगवद्गीता अध्याय आठवा
अक्षरब्रह्मयोग ८.२३)
*भावार्थ - हे भरतश्रेष्ठा, कोणत्या श्रेष्ठ अशा पवित्र वेळी देह ठेवला असता योगी पुन्हा जन्माला येत नाही, जन्म-मरण-जन्म ह्या चक्रातून मुक्त होतो आणि कोणत्या अशुभ वेळी देह ठेवला असता तो योगी पुन्हा जन्माला येतो आणि ह्या जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकतो तो काळ मी तुला आता सांगतो.*
हे अर्जुना! आता ज्या वेगवेगळ्या काळी या जगतातून योग्याने प्रयाण केले असता, तो परतून येतो अथवा येत नाही, याचे मी तुला वर्णन करतो.
*-----------------------------*
*भगवान श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात -*
हे भरतश्रेष्ठ !
या पृथ्वीवर मनुष्य जेव्हा शरीराचा त्याग करतो, तेव्हा दोन परिणामांची शक्यता असते. एक तर त्याला पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल किंवा त्याला सद्गती (पृथ्वीवर परत येण्याची आवश्यकता नसणे) प्राप्त होईल.
भौतिक संपत्ती आणि लौकिक उन्नती हेच लक्ष्य ठेवून जीवन जगणारा मनुष्य जेव्हा शरीराचा त्याग करतो, तेव्हा त्याला पृथ्वीवर परत यावं लागतं, ज्याला आवृत्ती म्हटलं जातं. परंतु जो आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करतो आणि त्या अनुभूतीमध्ये देहाचा त्याग करतो, त्याला पुन्हा पृथ्वीवर यावं लागत नाही, याला अनावृत्ती म्हटलं जातं. हे दोन्ही मार्ग भगवान श्रीकृष्ण पुढील श्लोकांमध्ये सविस्तर समजावून सांगत आहेत.
*देवयान व पितृयान -*
प्राणोत्क्रमणाच्या वेळी त्या काळाच्या अभिमानी देवतेप्रत मनुष्य जातो. जे योगी असतात ते ब्रह्मरूप होऊन परत येत नाहीत. परंतु जे कर्मी असतात ते पुन्हा जन्ममृत्यू चक्रात येतात. परंतु जे ब्रह्माचे ध्यान करतात ते देवयानमार्गे जातात. त्यास पुनरावृत्ति (पुन्हा जन्म) नाही. कर्म करणारे पितृयानमार्गाने जाऊन पुनः परत येतात.
कर्म करणारे देवयानमार्गाने गेले तरी ते पुनरावृत्ति पावतात.परंतु पितृमार्गाने जाणारे जे कर्मी त्यास क्रममुक्ती सर्वथा प्राप्त होत नाही. त्यांनी केलेल्या कर्मानुसार त्यास लोकप्राप्ती होऊन भोग भोगावे लागतात. हे भोग संपले म्हणजे ते पुन: जन्म पावतात. *म्हणून पितृयान ह्या मार्गाहून देवयान श्रेष्ठ होय.*
देह टाकल्यावर ईश्वररूप होणे किंवा जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडणे ही दोन्ही ठराविक मरणवेळेच्या स्वाधीन आहेत. योग्यांनी योग्य काली देह ठेवला, तर देह ठेवता क्षणीच ते ब्रह्मरूप होतात,अन्यथा अयोग्य वेळी देह टाकला तर पुन्हा संसारात येतात. देह टाकण्यास दक्षिणायनापेक्षा उत्तरायण अधिक चांगले. (पितामह भीष्मही उत्तरायणाला प्रारंभ होईतो- पर्यंत थांबले होते.)
*संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे,*
देहातील अग्नितत्त्व शेवटपर्यंत प्रबळ हवे.
'आतां असो हें सकळ ।
जाण पां ज्ञानासि अग्नि मूळ ।
तया अग्नीचें प्रयाणीं बळ ।
संपूर्ण आथी ।' (ज्ञाने. ८.२१९).
'आता हे सगळे असू दे. असे समज की, ज्ञानाला मूळ कारण अग्नी आहे. त्या अग्नीचे मरणकाळी संपूर्ण बळ असावे.' अग्नीशिवाय प्राणांना बळ नाही,शरीरातील ज्ञानकलाही (चेतना) टिकत नाही.
*-----------------------------*
संदर्भ ग्रंथ :-
गीतासागर पूर्वार्ध - श्री गुरुदेव शंकर अभ्यंकर.
*॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥*
No comments:
Post a Comment