श्री महाराजांना अर्पण ----
श्रीमहाराजांचा प्रत्येक अनुयायी म्हणतो की श्रीमहाराजांनी आमच्या लायकीपेक्षा जास्त आम्हाला दिले आहे. आम्ही श्रींनी सांगितल्याप्रमाणे वागत नाही तरीही श्रीमहाराज आमचे एवढे लाड कसे करतात हेच समजत नाही. श्रीमहाराज म्हणतात," एखादे सात-आठ महिन्यांचे सुंदर, बाळसेदार मूल असते, आईच्या अंगावर पीत असता आईला लाथा मारते. खरे म्हणजे मुलाने आईला लाथा मारू नयेत, पण ते आईला लाथा मारते तेव्हां आईला त्याचे आणखीच प्रेम येते. तसे मी ज्याला माझा म्हटला, त्याची त्याला जाणीव नसली तरी मला त्या आईसारखे होते."
श्रीमहाराजांचे उतराई होण्यासाठी त्यांची सेवा करायचा विचार केला तर श्रीमहाराज म्हणतात," तुम्ही सर्वजण म्हणता की आम्ही तुमची सेवा करण्यास आलेलो आहोत, परंतु मलाच तुमची सेवा करावी लागते. माझी सेवा तुम्ही जी केली ती आपल्या देहबुद्धीची केली.तुम्हाला जे पसंत पडेल, तसे तुम्ही केले. वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे, माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे."
आम्हाला नामस्मरण करणे काही नीट जमत नाही, मग श्रीमहाराजांना काही अर्पण केले तर ! श्रीमहाराज म्हणतात,"ज्याच्याजवळ जी वस्तू नाही ती दिली तर त्याला आनंद होईल." अगदी खरं आहे. एखाद्या भिकारीला शंभर रुपये दिले तर तो खुष होईल, पण तेच जर एखाद्या लक्षाधिशाला दिले तर त्याला आनंद होईल का ? मग श्रीमहाराजांना काय बरे द्यावे ? ---------
महाराज तुम्हा वाटे द्यावे काही ।
परि काही नाही मजपाशी।। धृ ।।
जमविले धन ठेवुनिया ध्यान।
असे नामधन तुम्हापाशी ।। १।।
देऊ बघू घर असे हे सुंदर।
अवघा संसार तुम्हा हाती ।।२।।
अर्पावे हे तन अपुले चरण।
नाही खात्री क्षण तुम्हा ठाव।।३।।
माझा अहंकार घ्यावा तो सत्वर ।
नाही कणभर तुम्हापाशी।।४।।
' *मना* ' वाटे आज सोडवावा माज।
नामाचिया काज तुम्हासंगे।।५।।
----- डॉ. मनोहर वर्टीकर
No comments:
Post a Comment