श्रीराम,
गणगोत बंधु तूच कृपासिंधू, सदोदित वंदू पाय तुझे |2
भगवंता तूच सर्वस्व आहेस. तुझ्याशिवाय मला कोणी नाही. असे मनापासून म्हणता आले पाहिजे. आपण जेव्हा अडचणीत असतो तेव्हा परमेश्वराची आठवण येते आणि तूच मला तारणारा आहेस असे म्हणून त्याचे पाय धरतो. नवस बोलतो आणि अडचण गेली की मग संसारातील व्यक्ती आपल्यासाठी आपले सर्वस्व होतात.
समर्थ सांगतात - नव्हे सार संसार हा घोर आहे |घोर म्हणजे भयंकर. संसार अशाश्वत आणि दुःखदायक आहे. तसेच संसारातील कोणीही आपल्या साठी थांबत नाही. संसार द्वंद्वमय घोर आहे तर द्वंद्वातीत जीवनात फक्त आनंद आहे. या द्वंद्वातीत असलेल्या निरपेक्ष आनंदाची प्राप्ती मानसपूजेच्या माध्यमातून आपल्याला करायची आहे. त्यासाठी ईश्वराचे चरणकमल दोन्ही हाताने घट्ट धरून तूच मला हवा आहेस.. बाकी कोणी नको, असे आर्ततेने म्हटले तरच त्याचे आपल्याकडे लक्ष जाईल.
पण एका हाताने त्याचे चरणकमल धरायचे आणि एका हाताने संसार धरून ठेवला तर मात्र या द्वंद्वमय जीवनातच गटांगळ्या खात राहू.. आणि मग तो कृपासिंधू आपल्याला या गटांगळ्या मधून बाहेर काढत राहिल पण मानसपूजेसाठी मात्र येणार नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे आपण मानसपूजा करत आहोत असा फक्त भ्रम होत राहील.
No comments:
Post a Comment