🌹⚜️🌹🔆🌅🔆🌹⚜️🌹
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
*परंपरा सांगणाऱ्या*
*लोकगीताची*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
*भारतीय संस्कृती परंपरा जपणारी. या समाजव्यवस्थेत इतरांच्या तुलनेत नित्य गरजा जास्त. मग बांगड्या.. दागदागिने असोत वा कुंकू. अर्थात आज विज्ञान त्याची उपयोगीता मान्य करतंय. आज प्रगत तंत्रज्ञानाने.. औद्योगिकीकरणाने या गोष्टींची कमतरता नाही. याउलट बाजार तुडुंब भरलेत. अमिष दाखवून विक्री होतेय.*
*पण औद्योगिकीकरण झाले नव्हते तेव्हाही समाजाला कुठल्याही वस्तूंची कमतरता नव्हती. घरातील नित्य गरजेच्या.. शेतीसाठी लागणाऱ्या या सर्वच वस्तू स्वकष्टाने घरीच तयार करणारे.. पुरविणारे उत्कृष्ट कारागीर होते. समाज व्यवस्था परस्परपूरक.. एकमेकांवर अवलंबून होती. या सर्व वस्तू पुरविणारे आणि समाजाचे पिढ्यानपिढ्या स्नेहाचे संबंध होते. काही वस्तू घरोघरी फिरुन विकल्या जायच्या. तर मोठ्या प्रमाणात वस्तू मिळण्याचे ठिकाण म्हणजे गावोगावच्या जत्रा.. उरुस. यामुळे सर्वांनाच कमीजास्त प्रमाणात अर्थप्राप्ती व्हायची. पण एकमेकांच्या साथीने सारेच आनंदाने जगत होते.*
*अनेक महिला घरोघरी वस्तू विकायला यायच्या, घरोघरी त्यांची आस्थेने विचारपुस व्हायची. गुळपाणी दिले जायचे. ती पण घरच्यांची आपुलकीने विचारपुस करायची.*
*अशीच घरोघरी जाऊन वस्तू विकणारी ही एक महिला. हिच्या मोठ्या टोपलीत दातण, कुंकू.. काळे मणी, सुया इ. वस्तू विक्रीस आहेत. यातील दाभण तर शेतकऱ्यांना पोती शिवायला.. महिलांना गोधड्या शिवायला फारच गरजेचा. ही स्त्री वस्तूंची विक्री करण्यासाठी मिश्किल पण उपयुक्तता दर्शवणारी जाहिरात.. खरेदीसाठी आवाहन आपल्या सुरेल स्वरात करतेय.*
*कधी चकण्या राधाबाईला काजळ.. तर आखूड केसांच्या गोदाताईला गंगावन घ्या म्हणतेय. तान्हुल्या बाळासाठी काळ्या मण्याचे मनगटी वाळे अन् दृष्ट लागू नाही म्हणून माळा घ्या म्हणतेय. सोन्याच्या तुलनेत नगण्य किमतीचे हे काळे मणी आहेत. पतीचे महत्त्व सोन्यापेक्षाही जास्त, काळ्यामण्याच्या पोतीच्या स्वरुपात त्याचे दर्शन घडते. सोन्याला जीव लावून जपता त्यापेक्षाही याचे महत्त्व जास्त आहे असे ही महिला सांगतेय. या काळ्या पोतीने घरधन्याचे आयुष्य वाढणार आहे. हे मंगळसुत्र अगदी सती सावित्री.. माता रुख्मिणीही घालायची एवढे याचे महत्त्व आहे. याची जणीव करून देतेय.*
*आजकाल मॉल संस्कृती वाढलीय तरीही अशा लहानसहान वस्तू विकून उदरनिर्वाह करणाऱ्या मंडळीकडून भाव न करता आवर्जून वस्तू विकत घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हे एक सुसंस्कृत समाजाचे लक्षण. चार पैसे त्यांना मिळावेत ही उदात्त भावना.*
*कसारा येथे राहणारे सुप्रसिद्ध लोकगीतकार कवी प्रकाश पवार यांनी लिहलेले हे गाजलेले भारुड लोकगीत. सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांच्या कुटुंबातील रंजना शिंदे यांनी १९७४ साली सुरेल गात अजरामर केले आहे.*
🌹⚜️🌸🥀🎶🥀🌸⚜️🌹
*बाई सुया घे गं दाभन घे..*
*दाताच दात्वन घ्या गं कुणी*
*कुंकु घ्या कुणी काळं मणी*
*बाई सुया घे गं दाभन घे..*
*चकण्या डोळ्याच्या राधाबाई*
*तुम्हा काजळ शोभा देई*
*आखूड केसांच्या गोदाताई*
*तुम्ही केसाळी वापरा बाई*
*टकमका बघतील साऱ्याजणी*
*खाली बसा ओ बाईसाब जरा*
*डोकं खाजवू नका खरखरा*
*भांगाभांगात पावडर भरा*
*उवा लिखांचा नायनाट करा*
*उवांची घ्या ही बारीक फणी*
*तुमच्या तानुल्या गोजिऱ्या बाळा*
*घ्या मनगटी पायात वाळा*
*तो गोरा असो की काळा*
*दृष्ट मण्यांच्या घ्या ह्या माळा*
*पोपट बाहुली घ्या चिमणी*
*जीव लाविता जसा सोन्याला*
*जपा बायानो काळ्या मण्याला*
*माग आयुक आपल्या धन्याला*
*काळी पोत घ्या बारा आण्याला*
*सावित्री अव: रुक्मिणी*
🌹🎼🌹🔆🎶🔆🌹🎼🌹
*गीत : प्रकाश पवार* ✍
*संगीत : मधुकर पाठक*
*स्वर : रंजना शिंदे*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
🌻🥀🌸🎼🌺🎼🌸🥀🌻
No comments:
Post a Comment