TechRepublic Blogs

Tuesday, November 5, 2024

संधी

 ■■  बोधकथा : संधी  ■■


खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक तरुण गावातील शेतकऱ्याच्या मुलीवर प्रेम करू लागला. तो तरुण त्या मुलीला भेटण्यासाठी वारंवार गावात येऊ लागला. हळूहळू ही गोष्ट त्या मुलीच्या वडिलांपर्यंत पोहोचली. 


त्या मुलीचे वडील खूप समंजस होते. त्यांनी ठरवलं की, या मुलाची योग्य पारख करून मुलीचं लग्न त्या मुलाशी करावं की नको याचा निर्णय घेऊ. त्यामुळे त्यांनी त्या मुलाला भेटायचं ठरवलं.


दुसऱ्याच दिवशी हा तरुण शेतकऱ्याच्या घरी पोहोचला. शेतकऱ्याने त्याला विचारलं, तू माझ्या मुलीवर प्रेम करतोस? तरुण बोलला, हाे करतो. 


तिच्याशी लग्न करायची इच्छा आहे? तरुण बोलला, हाे. 


शेतकरी बोलला, मग तुला एक परीक्षा द्यावी लागेल. तरुण बोलला, मला याच्या साठी काय करावे लागेल?


शेतकरी बोलला, मी एक-एक करून तीन बैल मोकळे सोडून देईन. जर तू तीन पैकी एकाही बैलाची शेपटी पकडली तर तू या परीक्षेत पास होशील. पण जर तुला हे करता आलं नाही तर तुला परत जावं लागेल. 


शेतकरी त्या तरुणाला शेताकडे घेऊन गेला. शेतकऱ्याने आधी एका बैलाला सोडले. त्या मोठ्या बैलाला पाहून तरुण घाबरून गेला. तरुणाने विचार केला, याची शेपटी पकडायला नको, दुसऱ्या बैलाची शेपटी पकडू. 


दुसरा बैल समोर आला तर तो आधीच्या बैलापेक्षा मोठा आणि शक्तिशाली होता. त्याची टोकदार शिंग बघून तो तरुण घाबरला आणि विचार केला की, यापेक्षा पहिला आलेला बैलच योग्य होता. पण संधी निघून गेली होती. आता तो तिसऱ्या बैलाची वाट बघू लागला. तोपर्यंत तिसरा बैल बाहेर आला. तरुणाने पाहिलं, तो बैल अगदी कमजोर होता. त्या तरुणाला आनंद झाला. पण बघतो तर काय, त्या बैलाला शेपूटच नव्हते. 


आता त्या तरुणाकडे कोणताच पर्याय उरला नाही निराशेने तो तरुण गावातून निघून गेला आणि पुन्हा कधीच गावात परत आला नाही. आपण नेहमीच चांगल्या संधीची वाट बघत आलेल्या संधीकडे दुर्लक्ष करतो. पण अशामुळे आपल्याकडे पश्चात्ताप करण्या शिवाय कोणताच पर्याय उरत नाही.


*बोध.....*

अनेक जण चांगल्या संधीची वाट बघत समोरून आलेल्या संधी सोडून देतात. ज्याला ते चांगली संधी समजतात ती संधी नसतेच......!

        ~●●○○○●●~



No comments:

Post a Comment