TechRepublic Blogs

Saturday, November 2, 2024

पुण्यसंचय

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*पू. बाबा : आज सकाळी एक गृहस्थ आले होते. ते म्हणाले की साडेतीन कोटी जपाच्या संकल्पाचे उदक सोडावे असे मनात येते; काय करू? मला सत्पुरुषाचा छत्तीस वर्षे सहवास लाभला. 

त्यामुळे याबाबतीत काय सांगावे, कसे वागावे ते समजू लागले आहे. श्रीमहाराज सांगत तेच मी त्यांना सांगितले. मी म्हणालो की एकट्याने संकल्प करण्यापेक्षा नवरा-बायको दोघांनी मिळून संकल्पाचे उदक सोडा. 

श्रीमहाराज म्हणत की यामधे दोन गोष्टी साधतात. १) घरातून विरोध राहात नाही आणि २) जपात भागीदारी (sharing) होते. मी त्यांना रोजचे व्यवहार सांभाळून सुरुवातीला प्रत्येकजण रोज पाच हजार जप करा म्हणून सांगितले. म्हणालो, फार हिशोब करू नका. दोघांचा मिळून रोज दहा हजार जप झाला तरी साडेतीन कोटीला अंदाजे दहा वर्षे लागतील.*


*साडेतीन कोटी जपसंख्या देतांना श्रीमहाराज म्हणत की यामुळे तीन गोष्टी साधतात. १) देह व मन शुद्ध होतात. २) नामाच्या सामर्थ्याचा प्रत्यय येतो आणि ३) पुण्यसंचय होतो. पुण्यसंचयाची अतिशय गरज आहे.*


*श्रीमहाराजांनी डॉ. कूर्तकोटींना गोंदवल्याच्या नदीपलीकडच्या भीमाशंकराच्या देवळात चाळीस दिवस जप करायला सांगितले होते. शेवटच्या दिवशी श्रीमहाराजांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवताच त्यांची समाधी लागली पण ती पाऊण-एक तासच टिकली. तेव्हां श्रीमहाराज म्हणाले की पुण्यसंचय कमी आहे. अद्यापि लौकिकाची वासना शिल्लक राहिली आहे.*


*विवेक आणि वैराग्याचा आश्रय घेऊन देह आणि मन शुद्ध केल्याखेरीज नाम स्थिर होणार नाही. नामात रस येणार नाही.*


*-- अध्यात्म संवाद*

No comments:

Post a Comment