*श्रीराम समर्थ*
*कांकडआरतीचें तीर्थ*
*[ मालाडचे जेष्ठ साधक डा वा रा अंतरकर यांनी सांगितलेली गोष्ट]*
श्री तात्यासाहेब केतकर गोंदावलेस श्रीमहाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवाकरतां गेले म्हणजे एक दिवस सकाळी मंदिरांतील कांकडआरतीचा कार्यक्रम झाल्यावर त्या वेळीं तेथें असलेले [कै] श्री. बळवंतराव पाठकमास्तर यांचे घरी जावयाचेंच असा दर वर्षाचा प्रघात होता. डिसेंबर १९५५ मध्यें मी [डा अंतरकर] श्री. तात्यासाहेबांच्या बरोबर गेलों होतों व श्री. तात्यासाहेबांच्याच खोलीत उतरलों होतों व म्हणून त्यांनी सांगितल्यावरुन त्यांचेबरोबर श्री. पाठकमास्तरांकडे गेलों होतों. सकाळी ७|| ची वेळ होती. श्री. तात्यासाहेब व मी [डा अंतरकर] समोरासमोरच्या भिंतींना टेकून बसलों होतों. थोड्याच वेळांत सर्वांना पानांवर उपीट दिलें गेलें. मी [डा अंतरकर] स्नानसंध्या झाल्याशिवाय कांहीं खात नसें व त्यामुळें आता काय करावे या विचारांत होतों. श्री. तात्यासाहेबांना हे माहीत होतें व तेहि माझेकडे पाहात होते. त्यांनी सुरुवात केल्याशिवाय तेथें जमलेले इतर लोक सुरू करणे शक्य नव्हते. शेवटी तात्यासाहेब मला म्हणाले, 'तुमचें कसें काय ? तुम्हीं सुरू केल्याशिवाय मला सुरुवात करतां येणार नाही.' मी [डा अंतरकरांनी] म्हटलें, 'तुम्ही सांगाल त्याप्रमाणें मी करीन.' तेंव्हा आंघोळ झाली आहे का, विचारलें असतां 'नाही' म्हणून सांगितलें. तेंव्हा श्री. तात्यासाहेब म्हणाले ' तुम्ही सकाळीं कांकडआरतीचें श्रीमहाराजांचे तीर्थ घेतलें आहे ना? मी 'होय' म्हटल्यावर 'मग स्नान झाल्यासारखेंच आहे. खाण्यास हरकत नाही' असे त्यांनी सांगितले. 'तुम्ही सांगितलेत म्हणजे मला खाण्याला हरकत नाही' असे मी म्हटले व मग खाण्यास सुरवात झाली. स्नाना पूर्वी खाण्याची माझी ती पहिलीच वेळ होती.
संदर्भः मालाडचे थोर सत्पुरुष श्री. रामचंद्र चिन्तामणि तथा तात्यासाहेब केतकर यांचे जीवनचरीत्र या डा वा रा अंतरकर यांच्या पुस्तकातून
*संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन*
No comments:
Post a Comment