सूत्रधाराची किमया
तो शनिवार होता. हॅाटेल ओबेरायमध्ये प्रसिध्द उद्योगपती रत्नपारखी ह्यांनी स्वत:चा वाढदिवस साजरा करण्यासाठी आयोजित केलेली पार्टी ऐन रंगात आली होती. उंची वेष धारण केलेले पुरूष आणि उंची वेषाबरोबरच दागिन्यांनी आणि प्रसाधनांनी नटलेल्या स्त्रीया हातात मद्याचे चषक घेऊन गटागटाने टेबलाभंवती बसून किंवा उभ्यानेच मनमोकळ्या गप्पांचा आनंद लुटत होते.
श्रीयुत साळुंके, एक यशस्वी बिझनेसमन आपल्या दोन मित्रांबरोबर एका टेबलाशी बसले होते. त्यांनी परिधान केलेला गर्द निळा सूट, त्यांच्या बोटांतील अनेक अंगठ्या, कोटाच्या खिशात ठेवलेल्या घड्याळाची कोटावर रूळणारी चेन, ह्या सगळ्या गोष्टी त्यांची श्रीमंती दाखवत होत्या. त्यांचे घट्ट मिटलेले ओठ, बारीक तपकिरी डोळे, पेन्सिलीने आंखल्यासारख्या वाटणाऱ्या त्यांचा कोरीव मिशा, ह्या सर्वांतून त्यांचा धूर्तपणा जाणवत असला तरी रुबाबदार व्यक्तीमत्वाची छाप पडल्याशिवाय रहात नसे. त्यांचा कंबाला हीलवर फ्लॅट होता आणि त्यांच्याकडे दोन कार होत्या, एवढे भांडवल त्यांना मुंबईच्या “हाय सोसायटीत” वावरायला पुरेसे होते.
श्री साळुंके शेजारी बसलेल्या इन्कम टॅक्स एक्सपर्ट कोतवालांच्या म्हणण्याला मान डोलावत होते पण त्यांचे कोतवालांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते. साळुंकेंचे डोळे त्यावेळी मिसेस पंजवानींवर खिळलेले होते. मध्यम वय उलटलेल्या पंजवानी दिसायला जेमतेमच होत्या. त्यांत आता त्यांच्या देहाचा विस्तार त्यांच्या आवाक्यांत राहिला नव्हता पण ह्या सर्वांची कमतरता त्यांनी बहूमूल्य अलंकार घालून भरून काढली होती. त्यांतही त्यांनी गळ्यात घातलेला हारही सर्वांचीच नजर खेंचून घेत होता. साळुंके तर अशा वस्तुंचे दर्दी. मिसेस पंजवानीकडे, विशेषत: त्यांच्या गळ्यातील हारा कडे पहातां पहाता ते मनांत त्या हाराची किंमत ठरवत होते आणि त्यांच्या मनांत एक योजना तयार होत होती.
जनरल इन्शुरन्स, इंम्पोर्ट-एक्स्पोर्ट, हे जरी साळुंक्यांचे दाखवायचे व्यवसाय असले तरी कमी श्रमांत जास्तीत जास्त पैसा कमाविण्याच्या अनेक व्यवसायांशी होता. फोर्ट मार्केट येथील घोगा स्ट्रीटवरील त्यांच्या ॲाफिसांमघ्ये अशा अनेक योजनांचे आराखडे तयार होत. स्वत:चा प्रत्यक्ष संबंध न येऊ देता, ते अशा योजना आपल्या हस्तकांकरवी पार पाडत असत.
छगनलाल मारवाडी हा त्यापैकीच एक. त्याचं जव्हेरी बाजारात दुकान होतं. मुख्य धंदा अर्थातच चोरीचा माल विकत घेणं हाच होता. त्याचा अनेक चोरांशी नियमित संबंध येत असे. उच्चभ्रू समाजात वावरून मिळवलेल्या माहितीच्या जोरावर साळुंके चोरीच्या, घरफोडीच्या योजना आंखून त्या छगनलालला कळवत. साळुंक्यांकडून माहिती आली की छगनलाल योग्य व्यक्तीवर कामगिरी सोंपवत असे. तो साळुंक्याना प्रत्यक्ष ओळखत पण त्यांनी फोनवर कळवलेली माहिती अचूक असते आणि त्यांच्या सूचनांप्रमाणे कामगिरी पार पाडल्यास मोठा लभ्यांश पदरी पडतो, ह्याची त्याला खात्री पटली होती. आणि अशाच मोजक्या पण मोठ्या चोऱ्या आंखून साळुंके लक्षाधीश बनले होते.
मिसेस पंजवानींचे अलंकार आणि त्यांतही त्यांचा हिरेजडित हार पाहून साळुंक्यांच्या डोक्यांतील योजनाकार काम करू लागला होता. त्यांच्या आणि पंजवानींच्याही ओळखीच्या एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलीचा विवाह दोनच दिवसांनी म्हणजे मंगळवारी संध्याकाळी होता. त्या विवाहाला मिस्टर आणि मिसेस पंजवानी हजर रहाणार होते. अर्थात आपले अलंकार मिरविण्याची अशी संधी मिसेस पंजवानी सोडणचं शक्य नव्हतं. म्हणजे मंगळवारपर्यंत ते अलंकार बॅंकेच्या लॅाकरमध्ये न जाता पंजवानींच्या घरीच रहाणार होते. तेव्हां सोमवारीच ते दागिने त्या हारासह पंजवानींच्या जीवन सोसायटीतील पांचव्या मजल्यावरील फ्लॅटमधून चोरीला जायची व्यवस्था करायला हवी होती.
पार्टीहून परतताना साळुंके धुंदीतच होते पण मद्याच्या नव्हे तर आपल्याच योजनेच्या. रात्री बिछान्याला पाठ लागेपर्यंत त्यांची योजना मनांत तयार झाली होती. पंजवानीच्या फ्लॅटची रचना आणि घरांतील मंडळी ह्यांची त्यांना माहिती होती. पंजवानी उद्योगी आणि कर्तबगार कारखानदार होते. मिसेस पंजवानी हौशी समाजकार्यकर्त्या होत्या. दर सोमवारी नियमाने त्या आनंद अनाथाश्रमाला भेट द्यायला जात असत. आनंद अनाथाश्रम चालवणाऱ्या ट्रस्टच्या त्या अध्यक्षा होत्या. त्याशिवाय पंजवानींच्या घरी त्यांची कॅालेजांत शिकणारी कन्या डॅाली आणि स्वैंपाकीण अशा दोन व्यक्ती होत्या.
मिसेस पंजवानी बाहेर गेल्यानंतर घरांत संध्याकाळी सातपर्यंत स्वैपाकीण एकटीच असणार. सोमवारी दुपारी तीन साडेतीनची वेळ नामी होती. पंजवानींच्या घरांत प्रवेश मिळवणं कठीण नव्हतं. त्यांच्या लघुउद्योगापैकी एका औषधनिर्मितीच्या कारखान्यांतून औषधे पाठवली आहेत, असं सांगून ती आंत ठेवायला सहज प्रवेश मिळणार होता. सगळी योजना मनाशी पक्की झाल्यावरच सांळुंक्याना झोप लागली.
दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी नऊ वाजता सांळुंके घराबाहेर पडले. चर्चगेट स्टेशनकडे येऊन त्यांनी गाडी दूरवर पार्क केली. स्टेशनवरील पब्लिक बूथमधील टेलिफोनवरून त्यांनी छगनलालचा नंबर फिरवला. सांकेतिक भाषेंत ओळख देताच छगनलाल कान टवकारून ऐकू लागला. साळुंक्यांनी त्याला बारीकसारीक तपशीलासह आपली योजना समजावून सांगितली. दागिन्यांच वर्णन आणि अदमासे किंमत ऐकून छगनलालचे हिशेबी डोळे लकाकले. फोनवरचे बोलणे ऐकता-ऐकता त्याच्या डोळ्यासमोरून सराईत चोरांची, टोळ्यांची नांवे सरकत होती. सीताराम नांवाच्या, तोपर्यंत एकदाच पकडला गेलेल्या, अट्टल चोराचं नांव तेव्हाच त्याने मनाशी नक्की केलं.
पंजवानी कुटुंबात सोमवार नेहमीप्रमाणे उजाडला. बरोबर आठ वाजता पंजवानी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले. त्यानंतर मात्र नेहमीच्या वेळापत्रकांत बदल करणारी गोष्ट घडली. स्वयंपाकीणबाईने अकरा ते सहा बाहेर जाण्याची परवानगी मागितली. थोडसं कुरकुरत कां होईना पण मिसेस पंजवानीना तिला परवानगी द्यावी लागली. त्याचवेळी डोकं दुखू लागल्यामुळे डॅालीने कॅालेजमध्ये न जाण्याचा आपला मनोदय व्यक्त केला. मिसेस पंजवानीना ही गोष्ट पथ्यकरच वाटली. अकरा वाजतां स्वयंपाकीण बाहेर पडली तर दोन वाजतां दुसऱ्या कारने मिसेस पंजवानी अनाथाश्रमाकडे गेल्या.
स्वयंपाकीणबाई दुपारी घरी नसणारं हे ध्यानात येतांच डॅाली धूर्तपणे डोकं दुखण्याचं निमित्त करून घरी राहिली होती. खरं म्हणजे दुपारच्या एकांताचा तिला पुरेपूर फायदा घ्यायचा होता. सकाळीच मिसेस पंजवानींची नजर चुकवून तिने तिच्या सध्याच्या दोस्ताला, सुरेशला फोन करून दुपारी अडीचला बोलावून घेतले होते. दुपारी बेल वाजतांच डॅाली दार उघडायला धावत गेली. सुरेश तिच्या शब्दाला मान देऊन तिला सोबत द्यायला हजर झाला होता. वेळ मजेत जाणार होता.
सुरेश ज्यावेळी पंजवानींच्या घरी आला, बरोब्बर त्याच वेळी सीताराम जीवन सोसायटीच्या समोरच्या फूटपाथवर हजर झाला होता. थोडा वेळ तिथेच उभे राहून त्याने जीवन सोसायटीची टेहळणी केली. त्याला पाहून कोणालाही कसलीच शंका येणार नव्हती. त्याचे कपडे एखाद्या कंपनीच्या शिपायासारखे होते. तो सडपातळ आणि सर्वसाधारण उंचीचा होता. त्याचा चेहराही सामान्य होता. वेळप्रसंगी जलद हालचाली करण्याचा चपळपणा त्याच्यात होता. त्याच्यांत असं कुठलेच वैशिष्ट्य नव्हतं की ज्यामुळे त्याच्याकडे लक्ष जावं. तो फार हुशार होता. तिजोऱ्या उघडण्यात त्याची बरोबरी करणारे फारच थोडे होते.
फूटपाथवर थोडा वेळ काढून सीतारामने जीवन सोसायटीत प्रवेश केला. सुरेशने पंजवानींच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर पंधरा मिनिटांनीच, हातांतली औषधांची, खरं तर हत्त्यारांची, बॅग सांवरत सीतारामने पंजवानींच्या दारावरची बेल वाजवली.
बेलच्या आवाजासरशी डॅाली दचकली. सुरेशबरोबर ती नुकतीच तिच्या खोलीत गेली होती. बेल वाजताच सुरेशपासून दूर होत ती दरवाजा उघडायला गेली. सुरेशच्या उपस्थितीबद्दल काय सांगायचं ह्याचा ती विचार करत होती. दाराच्या झरोक्यांतून तिला परका माणूस दिसताच तिचा जीव भांड्यात पडला.
तिने दरवाजाला सेफ्टी चेन लावून दार थोडे उघडले आणि सीतारामला “क्या चाहिये?” म्हणून प्रश्न केला. छगनलालने पुरवलेल्या माहितीप्रमाणे वयस्कर स्वयंपाकीण असणार, असं सांगितलं असतांना ही तरुण मुलगी पाहून सीताराम किंचित गांगरला. तिथूनच परत फिरावं असंही त्याला वाटलं. पण एवढा वेळ पाठ केलेले शब्द सहज त्याच्या तोंडून बाहेर पडले, “पंजवानीसाबने दवाईयां भेजी है!” डॅालीचा पटकन त्यावर विश्वास बसला. मुख्य म्हणजे घरातलंच कोणी आलेलं नाही, हे पाहून ती इतकी निर्धास्त झाली होती की “अच्छा! तो रख दो दवाईंया अंदर!” असे म्हणत, सेफ्टी चेन काढून तिने पटकन दार उघडले.
सीताराम बॅग सांवरत आंत आला. त्यांने आपल्या तीक्ष्ण कानांनी कानोसा घेतला आणि बॅगेतून औषधे काढण्याच्या निमित्ताने त्याने चटकन क्लोरोफॅार्मचा बोळा काढून बेसावध डॅालीच्या नाकावर दाबला. डॅाली कांही आवाज न करतांच बेशुध्द पडली.
सीताराम दबकत पुढे सरकला. तिजोरीची खोली पॅसेजच्या उजव्या हाताला दुसरी आहे, असे त्याला सांगितले होते. तो त्या खोलीच्या दाराशी पोहोचला न पोहोचला तोंच समोरच्याच डॅालीच्या खोलींतून सुरेश बाहेर आला. क्षणभर दोघे एकमेकांकडे पहातच राहिले. तेवढ्यांत दाराशीच आडव्या पडलेल्या डॅालीकडे सुरेशचे लक्ष गेले. त्याचं तरूण रक्त सळसळलं आणि त्याने सीतारामच्या अंगावर झेप घेतली.
सुरेशच्या अनपेक्षित हल्ल्याने सीताराम चकीत झाला पण त्या त्वेषपूर्ण हल्ल्याला तोंड देतांना त्याचाही हिंस्त्र स्वभाव जागृत झाला. त्याच्या हातांत मोठा पाना होता. दांत ओठ खाऊन त्याने त्याचे दोन जोरदार फटके सुरेशच्या डोक्यावर मारले. सुरेश गतप्राण होऊन खाली पडला. त्याचा जीव गेल्याचे ध्यानांत येताच मुरब्बी सीतारामने डॅालीला जिवंत सोडण्यांतला धोका ओळखून गळा दाबून तिचाही जीव घेतला.
त्यानंतर त्याने पंजवानींच्या खोलीत शिरून सहजपणे तिजोरी उघडली. तिला तो हार व इतर अलंकाराबरोबरच भरपूर रोख रक्कम सांपडली, तिचा हिशोब त्याला छगनलालला द्यायची गरज नव्हती. तो सर्व ऐवज बॅगेत भरून जणू कांहीच घडले नाही, अशा आविर्भावांत तो जीवन सोसायटीतून बाहेर पडला.
चारच्या सुमारास सीताराम छगनलालकडे पोहोंचला आणि रोख रक्कम सोडवू सर्व ऐवज त्याने त्याच्या स्वाधीन केला. सीतारामने ह्या कामांत दोन खून करावे लागल्याचे सांगून छगनलालकडून जास्त पैशांची मागणी केली. खून झाल्याचे ऐकताच छगनलालचे पाय लटपटले पण त्या मौल्यवान हाराचा आणि अलंकाराचा मोह होताच. सीतारामची मागणी पुरी करून त्याला दुसऱ्या लांबच्या राज्यांत पळून जायला सांगून तो दागिन्यांची व्यवस्था करायला लागला.
ठीक साडेसहा वाजतां श्री साळुंके आपल्या ॲाफिसमधून सी.टी.ओ. मध्ये आले आणि तिथल्या पब्लिक फोनवरून त्यांनी छगनलालला फोन केला. छगनलालने दिलेली बातमी विशेष चांगली नव्हती. छगनलालच्या माणसाने कामगिरी पार पाडली होती पण त्याच्या हातून दोन खून घडले होते. म्हणजे पोलिस आता ह्या प्रकरणाचा कसोशीने पाठपुरावा करणार होते. छगनलालने त्यांच्या वाटणीची रक्कम त्यांनी सांगितलेल्या खात्यात जमा करायचे मान्य केले. ते त्यांच्या ॲाफिसमध्ये परत येऊन बसले, तेव्हा स्वत:शीच हंसत होते. एका भलत्याच नांवाने ठेवलेल्या त्या अकाउंटमधली रक्कम काढून घेण्याची व्यवस्था केली की त्यांचा ह्या प्रकरणातील संबंध संपणार होता.
पंजवानीच्या घरी कुणाचे खून झाले असतील, ह्याबद्दल त्यांनाही कुतुहल होते. त्यांच्या योजनेप्रमाणे त्यावेळी फक्त स्वयंपाकीणबाई त्यावेळी घरांत असायला हवी होती. मग तिचा आणि मिसेस पंजवानींचा खून झाला की तिचा आणि ….. पण कांही असो. ते स्वत:च्या मनाची समजूत घालत होते.
त्यांचा त्या खूनांशी कांहीच संबंध नव्हता. पोलीसांचे हात, सूत्रधारापर्यंत, त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचणे शक्य नव्हते.
एवढ्यांत त्यांचा फोन घणघणला. त्यांनी चटकन् फोन उचलून कानाशी धरला व म्हणाले, “साळुंके स्पिकींग” पलीकडून गंभीर आवाज आला, “मी इन्सपेक्टर साळवी बोलतोय. साळुंके साहेब, आपण जरा तांतडीने जीवन सोसायटीतील मिस्टर पंजवानींच्या घरी या.” “मी.. मी.. माझे काय काम आहे तिथे पंजवानींकडे?” साळुंक्याना दरदरून घाम फुटला. त्यांना कांहीच सुचेना.
तेवढ्यांत इन्सपेक्टर साळवींचा आवाज परत त्यांच्या कानांत घुमला, “साळुंके साहेब, बातमी अतिशय दु:खद आहे. पंजवानींची मुलगी डॅाली आणि तुमचा मुलगा सुरेश, ह्या दोघांचा पंजवानींच्या फ्लॅटमध्ये खून झालाय. तुम्ही ताबडतोब इकडे निघून या.”
श्री साळुंक्याच्या हातून एव्हांना फोन गळून पडला होता. चोरीच्या अनेक निर्दोष योजना आंखणाऱ्या सूत्रधार साळुंक्यांना जगाच्या खऱ्या सूत्रधाराच्या किमयेची जाणीव होऊन ते खुर्चीत कोसळले, ते कायमचेच.
अरविंद खानोलकर
पूर्व प्रसिध्दी- लोकप्रभा आणि माझा कथासंग्रह “ऋण फिटतां फिटेना” (१९९१).
No comments:
Post a Comment