भगवंत काय सांगतात की कर्म सोडण्याच्या भानगडीत का पाडता तर त्या कर्माचा जो प्राण आहे त्याचे कर्तेपण, ते कर्तेपण सोडा. मग कर्म झाले काय किंवा न झाले काय. सगळा बदल कर्त्यामध्ये व्हायला पाहिजे. आणि ह्याचेच नाव परमार्थ. परमार्थ म्हणजे काय कर्म होईल पण कर्ता त्यात गुंतणार नाही.
पंढरपूरला एक तपकिरी बुवा होते. ते तपकिर ओढत म्हणून तपकिरी बुवा हे नाव पडले. त्यांच्याकडे कोणी दर्शनाला आला की ते पैसे मागायचे. सत्पुरुष आणि पैसे मागतो हे थोडे विचित्र वाटायचे. हे काय करायचे दुपारच्या वेळेला भांड्यात साठलेले पैसे चंद्रभागेत बुडवून टाकायचे. तेव्हा त्यांच्या शिष्याने विचारलं की हे पैसे गरिबांना न देता बुडवून का टाकता ? त्या वर
ते म्हणाले माणूस मला पैसे देतो तो आपली वासना ठेऊन देतो. माणसाला वासना सोड म्हटलं तर तो ती सोडत नाही. अशी त्याची वासना घेऊन मी ती नदीत बुडवतो. श्री.गोंदवलेकर महाराज म्हणाले लॉटरी मध्ये तुम्ही १ रुपया देता आणि १०० रुपये घेता म्हणजे ९९ लोकांची वासना तुम्ही आपल्या घरात आणता. ज्या पैशासाठी मी श्रम केले नाही तो पैसा मी लोकांकडून घेतला आहे, तो घ्यायचा म्हणजे त्या लोकांची वासना घरात घेण्यासारखं आहे. अशा माणसाला कधीही स्वस्थता मिळायची नाही, समाधान तर नाहीच नाही. सत्पुरुषाला ते दिसतं, म्हणून ते सांभाळून असतात.
No comments:
Post a Comment