॥ श्रीराम ||
*भावार्थ मनोबोध*
*श्री रविंद्रदादा पाठक*
*आज आपण मनोबोधातला वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थमाउली म्हणते .*
करी काम निष्काम या राघवाचें । करी रूप स्वरूप सर्वां जिवांचें ॥ करी छंद निर्द्वद्व हे गूण गातां । हरीकीर्तनी वृत्ति विश्वास होतां ॥
*समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने हरिकीर्तनाने मनुष्याची उत्क्रांती थेट भगवंतापर्यंत कशी होऊ शकते, याचे अप्रतिम वर्णन या श्लोकामध्ये करत आहेत.*
सरलार्थः
*समर्थमाउली म्हणत आहेत की, माझ्या रामाचे कीर्तन, माझ्या भगवंताचे कीर्तन, मनुष्याच्या अंतरंगाचा विकास* *मनुष्यतत्त्वापासून त्या शिवतत्त्वापर्यंत करते, त्या भगवंतापर्यंत करते. जे* *संसारामध्ये अगदी लिप्त आहेत. त्यांना असे वाटते की हा सर्व म्हातारपणाचा, जेव्हा रिटायरमेंट होईल त्यानंतर करायचा प्रकार आहे. पण हरिकीर्तन हे* *मनुष्याच्या जीवनाचे खरे इंधन आहे. भगवंताच्या नामस्मरणाने त्याला त्याच्या आयुष्यामध्ये ज्या आत्मतत्त्वाची प्राप्ती होते, ते आत्मतत्त्व या जगातल्या कुठल्याही वस्तूने प्राप्त करता येऊ शकत नाही. ते केवळ आणि केवळ हरिभजनाने, हरिस्मरणाने त्याच्या नामचिंतनाने प्राप्त होऊ शकते. काय होते नेमके हरिकीर्तनाने ?*
*समर्थांनी या श्लोकामध्ये तीन अवस्था सांगितलेल्या आहेत ज्या केवळ भगवंताच्या स्मरणामध्ये, भगवंताच्या लीलांच्या वर्णनाने, त्याच्या एकंदरच सर्व व्यक्तिमत्त्वाच्या चिंतनाने जीवाला प्राप्त होतात. पहिली अवस्था ती म्हणजे आपली जी हवे-नकोपणाची वृत्ती आहे, या जगाकडून जो सर्व गोष्टींचा हव्यास आहे, ती वृत्तीच प्रभू रामचंद्रांच्या स्मरणाने निष्कामतेमध्ये प्राप्त होते. दुसरा टप्पा असा प्राप्त होतो की, या जगामध्ये मी आहे आणि माझ्या अनुषंगाने हे सर्व विश्व आहे. माझा पती आहे, माझी मुले आहेत,माझी पत्नी आहे, माझे घर आहे, माझी गाडी आहे यामध्ये मी आणि ती वस्तू या दोघांचे रिलेशन आहे.*
*या प्रत्येक रिलेशनमध्ये मनुष्याच्या अपेक्षा आहेत. या दोघांमध्ये द्वैत आहे. भगवंताचे नाम दृष्टीतील द्वैत दूर करते. द्वैत दूर करून या सगळ्यांमध्ये जर आपण थोडेसा तत्त्वचिंतनाने विचार केला तर या प्रत्येक वस्तूला माझे म्हणण्यामध्येच त्या वस्तूचा अंतर्भाव माझ्या हृदयामध्ये आहे. त्यामुळे ही वस्तू आणि मी खरेतर वेगळे नाहीच. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करता आता आपण आसक्तीपोटी या दोन गोष्टी वेगवेगळ्या करतो. भगवंताच्या नामाचे खूप मोठे रसायन असे आहे की,*
करी रूप स्वरूप सर्वां जिवांचें ||
*तिसरा टप्पा तो देतो म्हणजे तो आपल्याला द्वंद्वविरहित करतो. मी आणि तू हा जो या जगाचा नियम आहे या नियमाच्या आधाराने जे द्वंद्व आपल्या जीवनात चालते या द्वंद्वाचाच तो निःपात करून टाकतो. तो आपल्याला निद्वंद्व करून टाकतो. असा हरिकीर्तनाचा महिमा समर्थांनी या श्लोकामध्ये आपल्याला सांगितला आहे.*
करी काम निष्काम या राघवाचें ।
*मनुष्याला निरासक्त करणे, मनुष्याच्या जीवनातील सत्य* *पचवण्याची ताकद त्याला देणे, हे भगवंताच्या नामाचे काम आहे. हे केवळ त्याच्या स्मरणानेच प्राप्त होऊ शकते. नाहीतर मनुष्याला त्याच्या जीवनात दुःख पचवणे केवळ अवघड आहे. दुसरा टप्पा भगवंताचे नाम आपल्या जीवनात आणते तो म्हणजे आपल्या दृष्टीमध्ये तो समत्व आणतो. हा भगवंतच या सृष्टीमध्ये, या चराचरामध्ये सामावलेला आहे, याबद्दल दुमत नाही, पण मनुष्याची दृष्टी ही देहबुद्धीची दृष्टी आहे. या देहबुद्धीच्या दृष्टीमध्ये द्वंद आहे. मी आणि तू हा व्यवहार आहे. जोपर्यंत मी आणि तू हा व्यवहार आहे तोपर्यंत रूप आणि स्वरूप यातील संघर्ष हा जीवाच्या दृष्टीने चालू राहतो. मी आणि माझा भगवंत हा संघर्ष त्याच्या दृष्टीने चालू राहतो. मी वेगळा आणि माझा भगवंत वेगळा हा संघर्ष त्याच्यामध्ये चालू राहतो. भगवंताचे नाम हे जीवाला या सृष्टीमध्ये पसरलेले स्वरूप आपल्यासकट दाखवतो. आपल्या महाराजांच्या* *संप्रदायामध्ये रामानंदमहाराज हे तितकेच अधिकारी संत जालनाक्षेत्री होऊन गेले. श्रीगोंदवलेकरमहाराजांनी या रामानंदमहाराजांना चातुर्मासाची दीक्षा दिली होती. या चातुर्मासाच्या दीक्षेसाठी ते किनोळा या गावी जायचे. या किनोळा गावी एक सईबाई देशपांडे नावाच्या विधवाबाई राहायच्या. लहानपणीच वैधव्य आलेले. त्यामुळे आपल्या भावाकडे - बापूराव कुलकर्णी म्हणून त्यांचे भाऊ, त्यांच्याकडे - त्या राहायच्या. त्या काळचा तो समाज. विधवा स्त्रीचे आयुष्य खरोखर एका अर्थाने*
*वाळीत टाकल्यासारखे आयुष्य. घराच्या बाहेरदेखील पडता येणे शक्य नसे. या बापूराव कुलकर्णीच्याकडे एकदा रामानंदमहाराज काही कारणाने गेले असताना बापूराव कुलकर्णीनी आपली बहीण सईबाईंना महाराजांच्या पायावर घातले आणि म्हणाले की हिला अनुग्रह द्या. हिला रामनाम द्या. यावरती ते म्हणाले की, अनुग्रहाचे आपण नंतर बघू पण बाई आता तुम्ही रोज तेरा हजार रामनाम घ्याल का? अशी विनवणी रामानंदमहाराजांनी केली. त्याप्रमाणे बाई नामाला लागल्या. नाम घेता घेता त्यांच्या वृत्तीमध्ये बदल झाले. काळ झपाट्याने जाऊ लागला. त्या काळचा तो समाज, त्या काळचे ते वैधव्याचे आयुष्य, त्यामुळे शरीराचे झालेले कुपोषण, या सगळ्यामुळे सईबाईंनी अंथरूण धरले. त्यांच्या लक्षात आले की आता आपल्या आयुष्याचा अंतकाळ जवळ आलेला आहे. पण यामध्ये बराच काळ निघून गेला होता. प्रचंड नामस्मरण झालेले होते. गुरुकृपा झाली होती. अनुग्रह झाला होता. मग त्यांच्या अंतकाळाच्या वेळेला सद्गुरू त्यांच्या मस्तकाजवळ आले, त्यांची विचारपूस केली आणि म्हणाले, 'सईबाई, आपण कोण आहात?' यावरती सईबाई फक्त स्मितहास्य करत आपल्या देहाचे सारे कष्ट सांभाळत प्रभू रामचंद्रांच्या स्मरणात रामानंदमहाराजांना म्हणाल्या, 'महाराज आपल्या चरणप्रतापामुळे तुमच्या माझ्यासहित सर्वत्र आता मला रामरूपच दिसत आहे. एका वैधव्य आलेल्या स्त्रीच्या आयुष्यात झालेली क्रांती केवळ रामनामामुळे झाली. त्यामुळे* समर्थ म्हणतात की, 'करी रूप स्वरूप सर्वां जिवांचें ॥'.
संकलन आनंद पाटील
No comments:
Post a Comment