*॥श्रीराम॥*
*"नारद - श्रीराम संभाषण"*
*"आपण पृथ्वीवर का आलो आहोत"*
मनुष्याच्या मनात नेहमीच आपल्या जन्माविषयी अनेक प्रश्न निर्माण होत असतात.
*जसं,*
'मी पृथ्वीवर का आलो, मानवी जीवनाचा उद्देश काय...?'
कधी तर तो हताश होऊन ईश्वराला तक्रार करतो,
*"इतकं दुःखच द्यायचं होतं तर मला जन्मालाच का घातलं..."* इत्यादी.
*प्रस्तुत कथेत* या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रभू श्रीरामांनी परम भक्त नारदाला दिली आहेत. मनुष्याचा जन्म म्हणजे किती मोठी संधी आहे आणि पृथ्वी त्याच्या विकासात कोणती भूमिका पार पाडतेय, हे त्या दोघात झालेल्या संभाषणातून आपल्याला समजून येईल.
*शबरीच्या* सांगण्यावरून प्रभू श्रीराम लक्ष्मणाबरोबर पंपा सरोवरावर पोहोचले. सरोवरातील थंड पाण्यात स्नान करून एका झाडाच्या सावलीत ते बसले असताना तिथे नारदमुनी आले.
श्रीरामांना सीतेच्या वियोगात आणि शोध कार्यात चिंतित झालेलं पाहून नारदमुनी खूप दु:खी झाले. त्यांना पश्चात्ताप होऊ लागला, त्यांनी दिलेल्या शापामुळेच आज प्रभूंची अशी अवस्था झाली होती.
*नारदांचा भगवान विष्णूंना शाप :-*
एकदा नारदमुनी कामदेवावर विजय मिळवल्यामुळे गर्विष्ठ झाले होते.
तेव्हा अहंकारमय झालेले नारद मुनी भगवान विष्णूंकडे गेले आणि कामदेवावर विजय मिळवल्याचे सांगून स्वतःची स्तुती करू लागले.
तेव्हा भगवान विष्णूंनी नारद मुनींचा अहंकार मोडण्यासाठी माया निर्माण केली. वैकुंठाहून परत येत असताना नारदमुनींनी एका सुंदर नगरीच्या भव्य राजवाड्यात एक अतिशय सुंदर राजकुमारी (विश्वमोहिनी) पाहिली आणि तिच्यावर मोहित झाले. राजकन्येशी लग्न करण्याच्या इच्छेने, ते भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांना स्वतःला सुंदर आणि आकर्षक बनवण्याची विनंती केली. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की आम्ही तेच करू, जे तुमच्यासाठी फायदेशीर असेल.
असे बोलून भगवान विष्णूंनी नारदजींचे मुख वानरांसारखे केले. नारद मुनी, स्वतःच्या रूपाबद्दल अनभिज्ञ होते, तिच्याशी लग्न करण्यासाठी राजकन्येच्या महालात पोहोचले, जिथे इतर राजकुमार देखील राजकुमारीशी लग्न करण्यासाठी आले होते. नारद मुनींचा वानर चेहरा पाहून उपस्थित सर्वजण हसू लागले आणि राजकन्येनेही नारदमुनींना सोडले आणि अत्यंत देखण्या राजपुत्राचे रूप धारण केलेल्या भगवान विष्णूंच्या गळ्यात माळ घातली.
तेव्हा नारद मुनींनी पाण्यामध्ये त्यांचा चेहरा पाहिला आणि आपला वानरसारखा चेहरा पाहून त्यांना भगवान विष्णूंचा खूप राग आला आणि ते वैकुंठाला पोहोचले, जिथे तीच राजकुमारी भगवान विष्णूंसोबत बसली होती. तेव्हा नारद मुनींनी क्रोधित होऊन भगवान विष्णूंना शाप दिला की तुमच्यामुळे त्यांनी माझी चेष्टा केली, म्हणून मी तुम्हाला शाप देतो की तुम्ही पृथ्वीवर मनुष्य म्हणून जन्म घ्याल आणि तुम्हाला तेव्हा वानरांची मदत लागेल. तुमच्यामुळे मला माझ्या प्रिय स्त्रीपासून दूर व्हावे लागले, त्यामुळे तुम्हाला देखील पत्नी वियोग सहन करावा लागेल. असे मानले जाते की नारद मुनींच्या शापामुळे भगवान विष्णूंनी श्रीरामांच्या रूपात मानव जन्म घेतला.
*नारदमुनींना* ही कथा आठवली आणि ते प्रभू श्रीरामांजवळ गेले. आपल्या परमभक्ताला पाहून प्रभू श्रीराम अत्यंत प्रसन्न झाले. नारदानं त्यांच्याजवळ क्षमायाचना केली आणि अखंड भक्तीचं वरदान त्यांना मागितलं.
त्यानंतर नारदानं उत्सुकतेनं विचारलं,
‘प्रभू, आपण आपल्याच मायेनं माझ्या मनात विश्वमोहिनी सुंदरीबद्दल आकर्षण निर्माण केलं. शिवाय आपणच तिचा विवाह माझ्यासोबत होऊ दिला नाही. तेव्हा कृपा करून, या लीलेचं कारण मला सांगा.’
*त्यावर श्रीराम हसून म्हणाले,*
‘हे नारदा, ऐक! मी माझ्या भक्तांसोबत आईप्रमाणे वागत असतो. मूल जेव्हा छोटं असतं, तेव्हा त्याला सत्य-असत्याची जाण नसते. अशावेळी मी एका आईप्रमाणेच त्यांचं रक्षण करतो. त्यांच्या गरजेनुसार आणि त्यांच्या भल्यासाठी कधी रागवतो, तर कधी त्यांचे लाड करतो. कधी त्याला शिकवण देण्यासाठी त्याची परीक्षाही घेतो. अशा समयी भक्ताला वाईट वाटतं, तो दुःखी होतो. परंतु जेव्हा त्याला समज प्राप्त होते, तेव्हा तो स्वत:च म्हणतो, ‘हे दु:ख देऊन ईश्वरानं माझ्यावर कृपाच केलीय. कारण या दुःखद घटनेमुळेच माझा विकास झाला आणि मी सत्याच्या मार्गावर पुढे वाटचाल करू शकलो.’
*प्रभू श्रीराम पुढे म्हणाले,*
‘भक्त जेव्हा ज्ञानाने परिपूर्ण बनतो तेव्हा मला त्याची काळजी नसते, कारण आता तो चांगले-वाईट निर्णय स्वतः घेऊ शकतो. सत्याचं रक्षण तो स्वत: करतो. असा भक्त मला माझ्या मोठ्या मुलाप्रमाणे आहे, जो आत्मनिर्भर, परिपक्व झाला आहे. ज्ञानाच्या तलवारीनं तो आपल्या विकाररूपी शत्रूंना नष्ट करण्यास स्वत: समर्थ असतो. पण ज्या भक्ताचं मन अजूनही चंचल आहे, विकारांनी घेरलेलं आहे आणि ज्ञानाच्या उच्चावस्थेपर्यंत पोहोचलेलं नाही, त्याची मी छोट्या मुलाप्रमाणे काळजी घेतो, देखभाल करतो. कारण तो माझ्यावर अवलंबून असतो. त्याच्या विकाररूपी शत्रूंचा नाश करण्याची जबाबदारी माझी असते. त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठीच मी अशी लीला रचतो.’
*‘हे नारदा!*
तू माझा भोळा भक्त आहेस म्हणून मला लहान मुलासारखा प्रिय आहेस. कामदेवाला जिंकल्याचा अहंकार जेव्हा तुझ्या मनात जागृत झाला, तेव्हा तुला आवश्यक असलेला धडा शिकवण्यासाठी तुझी परीक्षा घेतली. त्या परीक्षेदरम्यान तुझे इतर विकार, इंद्रियसुखांची कामना, लोभ, कपट, राग इत्यादी उफाळून वर आले. हे विकार प्रकाशात आणण्यासाठीच मी ती सारी लीला रचली होती. ज्यायोगे त्या विकारांपासून मुक्त होण्यासाठी योग्य पावलं तू उचलावीत. तसं पाहिलं तर ती घटना तुझ्या विकासासाठी आणि भल्यासाठीच होती. आता राहिली गोष्ट तुझ्या शापाची, तर तू त्याचा विचार करून दुःखी होऊ नकोस. कारण संसारात ज्या काही घटना घडतात ती माझीच तर लीला आहे.’
*यानंतर श्रीरामांनी नारदाला काही मार्गदर्शन केलं, हे नारदा, लक्ष देऊन ऐक.*
"मनुष्याची इच्छा, कामना हेच सर्व दुःखांचं मूळ आहे. तेच माणसाच्या गुलामीचं आणि अधःपतनाचं कारण आहे. अहंकार आणि इंद्रियांचं सुख हेच भौतिक इच्छांचं मूळ आहे, जे त्याच्याकडून चुकीचं कार्य आणि कपट करून घेतं. एखादी कामना पूर्ण झाली, तर ती लोभ आणि मोह वाढवते आणि पूर्ण नाही झाली तर राग आणि निराशा निर्माण करते. या दोन्ही गोष्टी हानिकारकच आहेत."
"मनुष्यानं हीच गोष्ट ज्ञानाच्या प्रकाशात समजून घेऊन, भक्तीचं बळ वापरून त्यापासून मुक्त राहिलं पाहिजे.’ श्रीरामांचं हे मार्गदर्शन ऐकून नारदमुनींना आनंद झाला. त्यांना अंंतर्यामी समाधान वाटलं, ‘प्रभूंना माझी किती काळजी आहे... माझ्या भल्यासाठी त्यांनी आपल्या माथी शाप घेतला..नारदमुनी कृतकृत्य झाले."
*आपण पृथ्वीवर का आलो आहोत:-*
ईश्वर आपल्या भक्ताच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी कसं कार्य करतो, हे प्रस्तुत प्रसंगात स्पष्टपणे सांगितलं आहे. ईश्वराची ही पद्धत समजण्या आधी काही अन्य रहस्यंही समजून घेतली पाहिजेत.
*उदाहरणार्थ,*
आपण जर या जगात जन्माला आलोय तर केवळ आरामदायी, सुखसमृद्धी, मनोरंजनानं भरलेलं सुखी जीवन जगून, परत
जाण्यासाठीच का? की त्यामागे इतर काही उद्देश आहे?पृथ्वीवरचं आयुष्य म्हणजेच संपूर्ण जीवन आहे का? मृत्यूनंतरही जीवन असतं का?
*अशाप्रकारे मनुष्याच्या संपूर्ण जीवनाचे दोन भाग करता येतील.*
*पहिला* म्हणजे पृथ्वीवरील जीवन, ज्याला आपण *‘पार्ट वन’* म्हणूयात. यालाच स्थूल जगतही म्हणता येतं. कारण इथं सर्व वस्तू स्थूल किंवा भौतिक रूपात असतात. माणसाचं शरीरदेखील स्थूल रूपात असतं.
*दुसरा म्हणजे*
मृत्यूनंतरचं जीवन-ज्याला *'पार्ट टू'* असंही म्हणता येईल. यालाच सूक्ष्म जगत म्हटलं जातं. स्थूल शरीराचा मृत्यू झाल्यानंतर मनुष्य याच सूक्ष्म जगात वावरतो, जिथं त्याचं शरीर सूक्ष्म स्वरूपात असतं. आपण स्वतःला शरीरापासून वेगळं करून पाहिलंत, तर जे शिल्लक राहिलं असतं ज्याच्यासोबत, आपलं भौतिक शरीर (पार्ट वन) संपल्यावरही पुढील यात्रा चालू राहते. अर्थात आपलं मन, विचार, बुद्धी, विवेकशक्ती, विकार, सवयी, वृत्ती आणि चेतना हे सर्व एकत्र आल्यावर सूक्ष्म शरीर बनतं.
"*कॉम्प्युटरच्या* भाषेत सांगायला गेलो तर शरीराचं हार्डवेअर म्हणजे स्थूल शरीर आणि सॉफ्टवेअर पार्ट म्हणजे जे आपण पाहू शकत नाही, ज्याला स्पर्श करू शकत नाही, फक्त त्याचा अनुभव घेऊ शकतो ते म्हणजे सूक्ष्म शरीर."
*मनुष्याचा* ‘पार्ट वन’ म्हणजे त्याचं पृथ्वीवरील जीवन हे त्याच्या संपूर्ण जीवनाचा एक अगदी छोटासा हिस्सा आहे. त्याचं खरं आणि विस्तृत जीवन म्हणजे ‘पार्ट टू’ होय. ‘पार्ट टू’ हा चेतनेच्या सात स्तरांमध्ये विभागलेला असतो. मनुष्याची चेतना जशी असेल, त्यानुसार त्याला चेतनेचा स्तर मिळतो.
*एखादा* तामसी, अहंकारी, रागीट, तिरस्कारानं भरलेला मनुष्य खालच्या, निम्न स्तरावर जाईल.
*तर* पृथ्वीवरच आत्मसाक्षात्कार झालेला मनुष्य चेतनेच्या उच्च स्तरावर जातो.
*म्हणजेच* ‘पार्ट टू’ मध्ये वरच्या स्तरावर जाण्यासाठी मनुष्याला आपल्या अंतर्यामी सद्गुणांची वाढ आणि विकास करायला हवा. आपल्या वाईट सवयी, कुसंस्कारांतून मुक्त व्हायला हवं.
*‘पार्ट टू’* चे जीवन अतिशय वेगवान आहे, कारण तिथं स्थूल जगताच्या मर्यादा (लिमिटेशन्स) नाहीत. तिथं केलेला विचार ताबडतोब प्रत्यक्षात येतो.
*उदाहरणार्थ,*
आपण एखाद्या ठिकाणी जाण्याचा विचार केला तर त्याठिकाणी लगेच पोहोचतो. पृथ्वीवर मात्र कुठलीही गोष्ट करण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. आपल्याला कुठे जायचं असेल तर आपण नीट विचार करून, वाहनांची, मुक्कामाची, खाण्या- पिण्याची सोय करून मगच जातो.
आपण नीट विचार केलात तर लक्षात येईल, पृथ्वीवर (पार्ट वन) विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि त्यावर पुन्हा विचार करण्यासाठी काही कालावधी मिळतो. हा कालावधी आपल्या सद्गुणांच्या विकासासाठी आणि वाईट सवयींतून मुक्ती मिळवण्यासाठी आवश्यक असतो. समजा, आपलं एखाद्या मित्राबरोबर काही कारणानं भांडण होतं. त्या आवेशात आपण त्याला नाही नाही ते बोलतो, त्याच्याबद्दल वाईट विचार करत राहतो. थोड्या वेळानं राग शांत झाल्यावर आपली चूक आपल्या लक्षात येते. आपण म्हणतो, ‘जाऊ दे, तो माझा मित्रच आहे... मैत्रीत बर्याचदा असे गैरसमज होतात...’ मग आपण आपल्या मित्राची माफी मागतो, त्यानंतर परिस्थिती पुन्हा पहिल्यासारखी होते.
*आता जरा विचार करा,*
हेच भांडण जर ‘पार्ट टू’ मध्ये झालं, रागाच्या आवेशात आपण जे काही चुकीचे विचार केले, तेच प्रत्यक्षात घडले तर काय कराल?
*अनवधानानं नकळत आपण दोघांचंही नुकसान करतो...!*
हेच तर पृथ्वीवरील (पार्ट वन) जीवनाचं वैशिष्ट्य आहे. इथं मनुष्याला कालावधी मिळतो, ज्यात तो आपल्या गुणांचा विकास करू शकतो.आपल्या विकारांवर मनन करू शकतो. त्यांना ओळखून ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या नकारात्मक विचारांवर पुनर्विचार करून ते दूर करू शकतो.
*पृथ्वी - एक शाळा (ट्रेनिंग सेंटर)*
'मनुष्यासाठी पृथ्वी जणू एक शाळाच आहे. इथं मनुष्याला आपल्या मनाला प्रशिक्षण द्यायचं असतं. त्याचं मन अकंप, प्रेमन, निर्मळ आणि आज्ञाधारक बनवणं.'
मनुष्य जन्म म्हणजे *‘ईश्वरीय कृपा’* असं अनेक आत्मसाक्षात्कारी संतांनी संबोधलं आहे. या जन्मात आपल्याला समज प्राप्त करण्यासाठी मन आणि बुद्धीला प्रशिक्षण देण्याची पूर्ण संधी मिळते.
*परंतु*
इथं आल्यावर मात्र आपण हा मूळ उद्देशच विसरून जातो. इतर लोकांना पाहून आपणही तसंच वागायला सुरुवात करतो. आपली सांसारिक (इहलौकिक) शिक्षण प्रणाली आणि सामाजिक वातावरण आपल्याला पूर्णपणे भौतिकवादी करून टाकतं. इथं आपण फक्त पैसे कमावण्याची कला शिकतो. स्पर्धेत पुढे जाण्यासाठी, दुसर्यांच्या खांद्यावर पाय देऊन, ईर्षा, द्वेष, कपट करायला शिकतो. याचाच अर्थ, आपण आलो होतो, खरंतर विकास करण्यासाठी पण अज्ञानामुळे आपलंच अधःपतन करून परत जातो.
*इथं आपल्याला पृथ्वीवरील जीवनाचा उद्देश जाणीवपूर्वक समजून घ्यायला हवा. आपणही आपल्या आयुष्यात येणार्या दुःखद आणि प्रतिकूल परिस्थितींचं महत्त्व जाणून, सापाला शिडी बनवण्याची कला शिकायला हवी. जेणेकरून आपल्या जन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल.*
*(रामायण रहस्य)*
No comments:
Post a Comment