TechRepublic Blogs

Saturday, February 10, 2024

शाळा

 साबळे सरांची एका शाळेवरुन दुसऱ्या शाळेवर बदली झाली. ते गावं, ती शाळा कधीच पाहीलेली नसल्याने आता त्या गावात जाऊन शाळा शोधावी लागेल म्हणून साबळे सर जरा लवकरच घरातून बाहेर पडले. 


मुख्य रस्ता सोडुन चार किमी आत नागमोडी वळण घेत घेत गाव होतं. जराश्या दुरूनच, गावातल्या मंदिराचा कळस दिसला. तस सरांच्या जीवाला बरं वाटल. 'मोकळं' व्हायचं होत म्हणून सरांनी थोडीशी झाडी पाहुन गाडी थांबवली व मोकळे व्हायला आडोश्याला गेले.....


झुडपाच्या मागे,  एक छोटस तळं होत. त्या तळ्यावर तीन चार म्हशी पाणी पित होत्या. तर बाजूला साधारण तेरा चौदा वर्षाचा मुलगा, हातात काठी घेऊन उभा होता. आज पहिलाच दिवस असल्याने शाळेत गेला नसेल असा सरांच्या मनात विचार आला. त्यालाच शाळा नेमकी कुठे आहे हे विचारावं म्हणून त्या पोराला सरांनी आवाज दिला.


"काय रे पोरा.. गावची शाळा कुठे आहे..?''


त्याने मंदिराच्या कळसाकडे बोट दाखविलं.


''अस तुम्ही गावातून सरळ गेलात की मंदिर लागेल, तिथून डावीकडे वळलात की लगेच समोरच शाळा दिसेल. तुम्ही कोण साहेब आहेत का..?"


''नाही रेऽ मी ह्या गावातला नवीन शिक्षक आहे. तू कोणत्या शाळेत आहे..?''


इतक्यावेळ त्याच्या चेहऱ्यावर असलेले निरागस भाव भितीमध्ये बदलले. तो, काहीच न बोलता त्याच्या म्हशीकडं पळून गेला. सरही जास्त लक्ष न देता गाडीवर गावाकडे निघून गेले.


मंदिरापासून डावीकडे वळले तेच त्यांना समोर तारेचं कुंपण व वर्गखोल्या दिसल्या. पटागंणात साधारण पुरूष उंचीचे चार लिंबाचे झाड दिसले. त्याच्या बाजूला एक पूर्ण वाळलेले पुरूषभर उंचीच 'बदाम'च्या झाडाचा सापळा दिसला. वाळलेल्या झाडाखाली पानांचा लवशेष सुद्धा नव्हता, ह्याअर्थी ते वाळून भरपूर दिवस झाले असतील असं त्यांना वाटलं. 


तो दिवस जाँईन होणं, साफसफाई व सरांना पहायला आलेल्या लोकांना बोलण्यातच गेला. लेकराची ओळख, नाव वगैरे विचारताच आलं नाही. 


जाताना सर परत त्या तलावाजवळ आले. ह्यावेळीही तो मुलगा तिथेच म्हशीला पाणी पाजत होता. एक म्हैस पाण्यात थांड मांडुन बसली होती. तर बाकीच्या तीन बाजूला चरत होत्या. सरांची व त्या पोराची जशी नजरानजर झाली तसा तो पोरगा उठला व काही कळायच्या आतच, पाण्यात बसलेल्या म्हशीला मारायला लागला. त्याच्या दोनचार फटक्याचच ती म्हैस उठली तरी त्याचं तिच्यावर सपासप मारणं चालूच होतं. सरांनी जास्त लक्ष न देता गाडी पुढे नेली. सहज गाडीच्या काचात बघितलं, तर आता तो पोरगा शांतपणे सराच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात होता.


दुसऱ्या दिवशी सर सातवीचे वर्गशिक्षक झाल्याने वर्गात गेले.  गुडमाँर्निंग वगैरे झाल्यावर हजेरी काढली. लेकराचं नाव घेतल की 'येस सर' म्हणत हजेरी चालू होती. सर नाव घेऊन जो 'येस सर' म्हणेल त्याच्याकडुन त्याच्या कुटूंबाची माहीती गोळा करत होते.


'अविनाश दिपक पंडीत' अस दोनदा तीनदा नाव घेऊनही कोणीही येस म्हणालं नाही. तेव्हा एका मुलाने,


''सर तो शाळेत येत नाही.'' अस उत्तर दिलं.

''का रे..?''

''सर, तो खूप आगाऊ आहे म्हणून त्याच्या वडीलांनी त्याला म्हशीमागे लावलं.''


''अस का..? त्याच्या वडीलांना कोण बोलवून आणतं रे..?''

कुणीच हात वरी केला नाही. उलट


''सर, त्याचे वडील त्याला बोलवायला गेलो की आम्हालाच हुसकावून लावतात.''


सरांनी पुढच्या लेकराच नाव घेऊन त्याच्या कुटूबांची माहीती गोळा करायला सुरवात केली. सर्व वर्गाची माहीती  घेऊन एक छानशी गोष्ट सांगून पहिल्या दिवसाची सुरवात केली. 


त्या दिवशीही, साबळे सर त्या तळ्याजवळ आले तेव्हाही तो पोरगा तिथेच म्हशी घेऊन दिसला. काल सारखचं त्याने सरांची नजरानजर होताच म्हशीला प्रसाद द्यायला सुरवात केली.


अरे.. काल पाण्यातल्या म्हशीला मारलं. आज चरत असलेल्या म्हशीला मारलं..? सराच ह्या गोष्टीकडे लक्ष गेल. पण हा केवळ योगायोग असेल म्हणून दुर्लक्ष केलं. 


तिसऱ्या दिवशी परत जेव्हा 'अविनाश पंडीत' नाव आलं त्यावेळी त्यांना सहजच तळ्याजवळील पोरगं लक्षात आलं. कदाचित तोच अविनाश असेल म्हणून त्यांनी विचारणा केली तर तोच 'अविनाश' होता हे पक्क झालं. आपल्या वर्गातील मुलगा वर्गात आला पाहीजे ह्याचा विचार त्याच्या मनात आला. आज जर तो तळ्याजवळ दिसला तर त्याला बोलायच असं त्यांनी ठरवलं.


त्यादिवशीही जाताना सर तळ्याजवळ आले. तेव्हा 'अविनाश' एका झाडाला काट्याच कुंपन करत पाठमोरा बसला होता. तो काम करत असताना एवढ्या तंद्रीत होता की पाठीमागे आलेल्या साबळे सराचां, त्यांच्या गाडीच्या आवाजाकडे त्याचं लक्षही नव्हतं.


'अविनाशऽ' सरानी आवाज दिला.


एका क्षणात त्याची तंद्री तुटली. तसं, त्याने मागे वळून पाहीलं. सरांना पाहताच तो धूम ठोकून पळून गेला.


सरांनी त्याला दोन चार आवाज दिले. 'थांब थांब' म्हणाले. पण त्यांच्या प्रत्येक हाकेवर तो दुर दुर जात होता.


सरांनी त्याचा पिच्छा सोडला. तो ज्या झाडाजवळ बसुन काम करत होता त्याच्यावर सरांची नजर गेली तर ते 'बदामाच रोपटं' होत. जंगलात बदामाच झाड कधीच पाहील नव्हतं. म्हणजे हे नक्किच आपोआप आलेल नाही हे सरांना लगेच लक्षात आलं. दुर जाऊन गाडीच्या काचामध्ये पाहील तर तो म्हशीला मारत होता.


तो दिवसही तसात गेला. अस जवळपास दहा बारा दिवस चालल होतं. सर जवळ जायचे, बोलायचा प्रयत्न करायचे तसा अविनाश पळून जायचा. रोपट्याला पालवी फुटली होती. आता तो पाठमोरा सापडला तर आवाज द्यायचाच नाही. पहिल्यांदा त्याला पकडायच व नंतरच बोलायच हे त्यांनी ठरवल. पण लगेच लक्षात आल की त्या दिवसापासून तो तसा पाठमोरा सापडलाच नव्हता. तो ही हुशार झाला होता.


'काय कराव म्हणजे तो आपल्याला बोलेल..?'


सर त्या दिवशी शाळेत जातानाच तळ्याजवळ आले. सर  तळ्याच्या विरुद्ध दिशेला रस्त्याच्या ह्या बाजूला खाली उतरले. त्यांच्याजवळ 'बदामाचं रोपट' होत. ते त्यांनी ह्या बाजूला लावलं. आज सरांनी मुद्दामहुन अविनाशवर लक्षच दिलं नाही. रोपटं लावून सर शाळेत निघून गेले. शाळा सुटल्यावर जाताना पाहिल तर त्या रोपट्याच्या बाजूला काट्याच छोटस कुंपन केलेल सरांना दिसलं. अविनाशनेच केलं असणार. बाण बरोबर निशाण्यावर लागल्याच समाधान घेऊन, परत एकदा अविनाशकडे दुर्लक्ष करुन सर निघून गेले.


सर, रोज येता जाताना त्या ठिकाणी थांबायचे व त्यांनी लावलेल्या रोपट्याकडे पहायचे. कधी त्याच्या बाजूच गवतं उपटलेल, तर बाजूची जागा स्वच्छ केलेली दिसायची. रोज रोपट्याच आळ चिखलाने भरलेल दिसायच. ह्याचा अर्थ अविनाश नित्यनियमाने झाडाला पाणी टाकत होता.


एकदिवस, शाळेत जाताना रोजच्या जागेवर थांबले. तर अविनाश त्यांना दुरवरुन पाहताना दिसला. सर काही बोलत नाहीत, काही विचारत नाहीत म्हणून त्याची भिती कमी झाल्याने तो पळाला नाही. सर त्यांनी लावलेल्या रोपट्याजवळ गेले व बाजूला खोदायला सुरवात केली. 


''काय करताय सर..?'' पाठीमागून, बऱ्याच अंतरावरुन आवाज आला. तो पळुन जायला सोप्प पडेल अशा सुरक्षित ठिकाणी उभा होता. सरांनी त्याचा आवाज 'बरोबर' ओळखला व तो स्वत:हुन बोलला ह्याचा त्यांना आनंद झाला. पण चेहऱ्यावर अजिबात न दाखवता ते म्हणाले,


''हे झाड शाळेच्या पटांगणात लावणार आहे.''


''नका लावू. जगणार नाही.''


सर अवाक् झाले. ''का नाही जगणार..?''


''शाळेत, चार पाच फुटावरच खडक आहे. त्यामुळे पाणीच नाही मिळणार झाडाला..''


सराच्या नजरेसमोर पटांगणातल वाळलेल बदामच झाड आलं. 


ह्याच्यापेक्षा ते लिंबाच झाड लावा. त्याला पाणी कमी लागतं व एकदा टिकल की ते लवकर मरत नाही.


सर एकदम आश्चर्यचकित झाले. वनस्पती व गावच्या भूगोलाचा चांगलाच अभ्यास असल्याच पाहुन ते आश्चर्यचकीत झाले. निसर्गाने किती शिकवलं त्याला.. आपल्याला जी गोष्ट लक्षातच आली नाही ती त्याला किती लवकर समजली..


''अरे, पण आता माझी पंधरा दिवस ट्रेनिंग लागली. मी येणार नाही तेव्हा झाडाची काळजी कोण घेईल...?''


''मी घेईल..!''


''ठिक आहे. जर तू पंधरा दिवस ह्या झाडाची काळजी घेतली तर, मी तुला चित्रकलेची वही बक्षीस देईल.''


त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान आलं.


सर पंधरा दिवसाने आले तेव्हा त्याच्या रोपट्याने चांगलच अंग धरलेल दिसलं. सर खुश झाले. त्यांनी दुरवर उभं राहुन आपल्याला पाहणाऱ्या अविनाशकडे पाहीलं. तो काही जवळ येणार नाही म्हणून त्यांच्याजवळची 'चित्रकलेची वही' त्यांनी रोपट्याच्या बाजूला ठेऊन निघून गेले.


दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना त्याच रोपट्याजवळ तीच वही होती. त्यांनी वही हातात घेऊन पहिल्या पानावर पाहील तर, त्याच्यावर एक चित्र होत. एक मुलगा काढला होता. त्याच्यावर ढगात (म्हणजेच स्वप्नात) झाडांनी नटलेली शाळा, लेकरं व एका पोराला मारताना मोठा माणूस काढला होता.


सरांनी त्याच्यावर 'गुड' लिहील. तसच हाताने 'सुंदर' म्हणून त्याला खुणावलं. त्याचा चेहऱ्यावर एक सुरेख हास्य दिसलं.


तो रोज एक चित्र काढायचा. सर पाहायचे. चित्र अजिबात चांगले नव्हते पण सर प्रत्येक वेळी गुड, छान लिहुन त्याला न चुकता सुंदर आहे असं खुणवायचे. 


आता अविनाशची हळुहळु भिती कमी होऊ लागली. सराच्या जवळ असताना तो अंतर ठेऊन म्हणा किंवा पळून जाण्याच्या तयारीत नसायचा. 


''तू शाळेत का येत नाहीस..?''


''वडील नको म्हणतात.''


''घरी कोण कोण असत..?"


''दोन बहिणी, आई, वडील व मी..!"


''अच्छा, तुला अभ्यास करायला आवडत का..?''


''हो!'' अगदि हळू आवाजात. त्याचा जो झाडाबद्दल आत्मविश्वास होता त्याचा लवलेशही हे उत्तर देताना नव्हता.


''बरं, आता उद्या तुला मी वही पुस्तक देतो. आपण चित्रासारखचं करत जाऊ. मी येता जाता पाहील. चालेल..?''


चेहऱ्यावर एकदम स्मित करत तो 'हो' म्हणाला. ह्यामुळे वडीलांनाही काही अडचण होणार नव्हती. व शिकताही येणार होत ह्यामुळे तो अतिशय आनंदी दिसत होता.


सरांनी पुढे काही दिवस रोज पाढे लिही, शुद्धलेखन लिही, शब्द लिही असा अभ्यास देत गेले. सुरवातीला त्याचं खूपदा चुकलं. पण सरांनी कधीच त्याला रागावलं नाही की चूकलयं ह्याची जाणीव होऊ दिली नाही. 'फक्त तु ह्यापेक्षा ह्या पद्धतीने करुन पहा,' चुकले किती ह्यापेक्षा बरोबर किती आले ह्याचा आकडा लिहुन, बरोबर आलेल्यांसाठी त्याची प्रशंसा करत राहीले.


हळुहळू दोघातलं अंतर कमी होऊ लागलं. तो आता चांगलाच धीट झाला. सरही शाळा सुटल्यावर अर्धा एक तास मुद्दामहुन त्याला वेळ देऊ लागले. तोही सरांची आता आतुरतेने वाट पाहु लागला. 


बदामाचे दोन्ही रोपट्याच झाडात रुपांतर होऊ लागलं. झाड व अविनाश झपाट्याने वाढू लागले. मधल्या काळात सरांची अजून दोन तीन गावात बदली होऊन सर निवृत्तही झाले.


एकदिवस सरांच्या घरी पोस्टमनने पार्सल आणून दिलं त्यात,


''सर, मी अविनाशऽ.. तुमच्या लक्षातही आहे की नाही कोण जाणे..? पण मला तुम्ही लक्षात आहात. मी तूम्हाला विसरणं शक्यच नाही. ढोरामागच्या पोराला, खोड्या करणाऱ्या म्हणून प्रसिद्ध पोराला तुम्ही माणसात आणलं. आज मी एसटीआयची परिक्षा पास झालो. आज माझे सत्कार वगैरे होत आहेत पण तुमच्या शिवाय सत्कार मला नकोच आहे. त्यामुळे मी सर्व सत्कार टाळत आहे. ह्या सत्कारापेक्षा तुमचे दोन शब्द माझ्यासाठी अमूल्य अाहेत. मला माहीत आहे की तुम्ही नक्कीच मला पत्र पाठवून माझी ईच्छा पूर्ण करणार.. एक सांगू.. आता जेव्हा मी त्या वह्या पाहतो त्यावरच तुम्ही तपासताना मुद्दाम चूकीच्या उत्तराकडे दुर्लक्ष केलेल कळतं. पण त्याचमुळे मला 'चूकीचं सोडुन द्यायच, चांगल ते घ्यायचं' हे कळालं. त्या जोरावरच मी आज ईथपर्यंत आलो. तुम्ही गेल्यावर मी ते दोन्ही बदामाचे झाड वाढविले. त्याच 'बदामाच्या सावलीत' मला परत एकदा तुमच्याकडुन 'सुंदर' म्हणवून घ्यायच आहे.. याल का..?


आणि हो.. तुम्हाला आठवत का की म्हशीला मारायचो... ते मी तुम्हाला पाहुन त्यांना मारायचो. तुमच्या अगोदरच्या सरांनी कधीच मला समजून घेतल नाही. त्यांचा राग मी म्हशीवर काढायचो. 'शिक्षक' म्हटलं की मला त्यांचाच चेहरा समोर यायचा व म्हशीला 'शिक्षक' समजून बदडायचो..!  चूकल्यावर 'चूक' म्हणून जेव्हा ते मारायचे तेव्हा त्यांना वाटायच कि मी सुधारेल.. पण मी त्यांच्यापासून दूर जात होतो ते त्यांना कळलचं नाही. पण तुम्हीच शिकवलं ना चांगल ते घ्यायच.. तेव्हा त्या सराबद्दलही माझ्या मनात काहीही द्वेष नाही. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. नाही का..?"


"सोबत, तुमच्या झाडाचे दोन बदाम पाठवत आहे.!!


- अग्रेषित.

No comments:

Post a Comment