TechRepublic Blogs

Thursday, February 22, 2024

संधी

 एकदा एका साधकाने श्री.गोंदवलेकर महाराजांना (हे सर्व सद्गुरु मंडळीना लागू आहे ) विचारले आपण एव्हढा परोपकार करीत राहूनही त्या पासून अलिप्तता राखणे आपल्याला जमते तरी कसे? त्या वर श्री.महाराज म्हणाले " परोपकार करणाऱ्या माणसांचे पाच प्रकार आहे." पहिल्या प्रकारची माणसे परोपकार करण्या आधीच त्याची वाच्यता करतात.

 प्रत्यक्षात ती सावकाशीने करतात. दुसऱ्या प्रकारात परोपकार करतात. केल्या बरोबर लगेच आणि वारंवार त्याचा उच्चार करतात. तिसऱ्या प्रकारात केल्याचा बोलबाला करीत नाही पण ती व्यक्ती समोर आली की त्याच्या मनात येते की आपण केले याची जाण ठेऊन वागावे तसे नाही दिसले तर त्याच्या विषयी  तुच्छता वाटते. दुसरा आणि तिसरा हा रजोगुणी प्रकार म्हणता येईल. चवथा प्रकारात माणसे दुसऱ्या साठी काही करण्याची संधीच पहात असतात.

 संधी आली की दवडत नाही आणि केलेल्याचा उच्चार ही करत नाही. हा सत्वगुणी परोपकार. साधकाने या प्रकाराला साजेसे वागत जावे. पाचव्या प्रकारची माणसे परोपकार अहर्निश करीत असतात. ते करताना अशी भावना बाळगतात की हे सर्व भगवंताच्या इच्छेने घडत आहे.

 मी फक्त नावापुरता आहे. यात कर्तेपण टाकल्यामुळे व ते भगवंतासाठी असल्याच्या जाणीवेमुळे उपकराचे भानही त्यांना नसते. स्नानाच्या वेळी माणूस सर्व हाताने अंग चोळतो त्यावेळी मी या शरीरावर उपकार करतो आहे असे हाताला वाटत नाही. तसेच हा माणूस  दुसऱ्याला भगवतस्वरुपात पहात असतो म्हणून उपकार हा शब्द ही त्याला आठवत नाही.

No comments:

Post a Comment