मारल्याशिवाय
झाड कधीच मरत नाही
फुल फळ सावली दिल्याशिवाय
झाड उगाचच ढळत नाही.
कोणतेच झाड माणसाला
कधीच छळत नाही
झाडाशिवाय माणसाचं
पानही हालत नाही.
दुर्दैव हे माणसालाच कळत नाही.
चुलीत सरपण हवे
यज्ञात अर्पण हवे
चिता जाळायलाही शेवटी
एक झाडच हवे.
झाड झुल्यासाठी हवे
झाड सावलीसाठी हवे
पावलो पावली एक झाड हवेच.
फळ फुल हे तर हवेच हवे
झाडांवरच उडतील
पक्षांचे थवे.
एक झाड मरताना
कधीच रडत नाही
कितीही क्रुर वागा तुम्ही
झाड अंश पेरणे विसरत नाही.
झाड पाणी देते
झाड गाणी देते
तुमच्या कुर्हाडीच्या दांड्यालाही
झाडाचेच लाकूड लागते.
झाड तुमचे सारे काही ऐकते
कधीतरी झाडाशी बोलून तर पहा
झाड नकळत खूप काही सांगते.
एक झाड लावताना
मनात काही शंका नको
झाड उगवतेच कसेही कुठेही
फक्त लावल्याशिवाय ते उगवत नाही
आणि मारल्याशिवाय
झाड कधीच मरत नाही.
©️ शैलेन्द्र
No comments:
Post a Comment