TechRepublic Blogs

Saturday, February 3, 2024

श्रीविष्णुसहस्रनाम

  *भीष्मद्वादशीच्या* 

शुभ पावन दिनी *श्रीविष्णुसहस्रनाम* या स्तोत्राचे पठण जास्त प्रमाणत करावे.


 त्या निमित्ताने *भीष्मद्वादशी* या तिथीचे माहात्म्य सांगणे हे औचित्यपूर्ण ठरेल. हस्तिनापूरचा कुरुवंशीय राजा शंतनू आणि साक्षात गंगामातेचा(नदी) पुत्र *देवव्रत*

म्हणजेच महाभारतात *पितामह भीष्म* या नावाने ज्यांना सन्मानपूर्वक संबोधले जात असे, अशा भीष्माचार्यांनी माघ शुद्ध अष्टमी या पवित्र दिवशी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांच्या साक्षीने आपल्या देहाचा त्याग केला.महाभारताचं प्रसिद्ध असं महायुद्ध मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला सुरू झालं. हे युद्ध एकूण १८ दिवस चाललं होतं.युद्धाच्या पहिल्या दिवशीच विविध प्रश्नांनी ग्रासलेला अर्जुन समोर पितामह भीष्म,गुरूद्वय द्रोणाचार्य-कृपाचार्य आणि आपल्याच बांधवांना पाहून हतोत्साहित झाला.त्याची ती अवस्था पाहून भगवान श्रीकृष्णांनी त्याला गीता सांगितली,मोक्षदा एकादशीचा हा दिवस आपण *गीताजयंती* म्हणून साजरा करतो.या महायुद्धात कौरव-पांडव पराक्रमाची शर्थ करत होते. महावीर अशा पितामह भीष्मांना या युद्धात पराजित करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना देखील हातात शस्त्र न घेण्याची प्रतिज्ञा करूनही रागाने रथाचे चाक हातात घ्यावे लागले होते.प्रत्यक्ष परमेश्वराच्या हातून मरण यापेक्षा श्रेष्ठ दुसरे काय असू शकेल या कल्पनेने भीष्मही आनंदित झाले.पण नंतर कृष्णाच्याच सांगण्यावरून शिखंडीला( पूर्वाश्रमीची अंबा- अंबिका- अंबालिका या तिन्हीतील अंबा) भीष्मांच्या समोर उभं केलं गेलं. भीष्म जसे महापराक्रमी होते तसे ते महाज्ञानीही होते. शिखंडीच्या रूपातील अंबेला ओळखल्यामुळे आणि स्त्रीशी न लढण्याची त्यांची प्रतिज्ञा असल्यामुळे त्यांनी शिखंडीशी लढण्यास नकार दिला.मग श्रीकृष्णांच्या सूचनेनुसार शिखंडीच्या पाठी उभ्या राहिलेल्या अर्जुनाच्या बाणांनी भीष्मांच्या देहाची चाळण झाली,तो दिवस 

मार्गशीर्ष कृष्ण सप्तमीचा होता. त्यावेळच्या कालमापनाच्या गणितानुसार तेव्हा सूर्य दक्षिणायनात होता.इच्छामरणाचे वरदान लाभलेल्या पितामहांनी देहत्यागासाठी उत्तरायणाची वाट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी अर्जुनाने तयार केलेल्या शरशय्येवर ते सेहेचाळीस दिवस 

पहुडले होते. माघ शुद्ध अष्टमीला श्रीकृष्णांच्या आज्ञेवरूनच त्यांनी युधिष्ठिराला सोळा धर्मनियमांचा उपदेश केला. युधिष्ठिराच्या सहा प्रश्नांची उत्तरे दिली. ते प्रश्न असे होते- १)आपल्या मते परम धर्म कोणता? २)कोणत्या जपाने मनुष्याची जन्म- मरण बंधनातून सुटका होते? ३)सगळ्यात श्रेष्ठ दैवत कुठले? ४)सर्वांचा आश्रय कोण?

५)कुणाची स्तुती करावी?

६) कुणाची पूजा करावी?

आणि या सहाही प्रश्नांचे उत्तर एकच होते आणि ते म्हणजे *विष्णू आणि विष्णुसहस्रनाम* आणि मग भगवंतांच्या सन्मुख महाज्ञानी भीष्माचार्यांना स्फुरलेले,भगवंतांच्या एक हजार नावांची सुरेख,अर्थपूर्ण गुंफण असलेले *श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र* त्यांच्या श्रीमुखातून स्रवत गेले. त्यामुळे *माघ शुक्ल अष्टमीला*   *श्रीविष्णुसहस्रनाम जयंती*  असे म्हटले जाते.हे अंत:स्फूर्तीतून निर्माण झालेले स्तोत्र लगेच तोंडपाठ होणे कुणालाच शक्य नव्हते. तिथे उपस्थित असलेल्या पांडवांपैकी सहदेवाला त्याने केलेल्या भगवान शिवशंकरांच्या तपश्चर्येमुळे प्राप्त झालेले *मणिपुष्पक नावाचे स्फटिकरत्न* त्याने गळ्यात धारण केलेले होते. या स्फटिकात अद्भुत अशी ध्वनिग्रहण क्षमता होती. महर्षी व्यासांनी महादेवांची संमती घेऊन या स्फटिकाद्वारे दिव्य अशा या श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे श्रवण  केले आणि नंतर ते  महाभारतात समाविष्ट केले,असे सांगितले जाते. या स्तोत्राच्या निर्मितीनंतर लगेच त्याच दिवशी म्हणजे माघ शुद्ध अष्टमीला काही क्षणांतच सुमारे १८६ वर्षांच्या श्रेष्ठ भगवद्भक्त पितामह भीष्मांनी श्रीकृष्ण चरणी आपले आयुष्य समर्पित करून वसुलोकांत प्रयाण केले. या वीर क्षत्रियाचा अंतिम संस्कार माघ शुद्ध द्वादशीला करण्यात आला .या द्वादशीला *गोविंद द्वादशी* म्हणूनही ओळखलं जातं.माघ शुक्ल अष्टमी ते माघ शुक्ल द्वादशी हे *भीष्मपंचक पर्व* म्हणून भारतातील कर्नाटकासारख्या अनेक प्रांतांमध्ये अजूनही साजरे केले जाते. या काळात पितामह भीष्मांचे स्मरण करून सोन्याची किंवा चांदीची श्री लक्ष्मीनारायणाची मूर्ती तयार करून कमळपुष्पांनी तिची षोडशोपचारी पूजा केल्याने योग्य अपत्य प्राप्त होते,रोग आणि पितृदोष नाहीसे होतात, सुख - समृद्धी प्राप्त होते असे पद्मपुराणात सांगितले आहे. भीष्मद्वादशीला आपल्या पूर्वजांना तिलोदक द्यावे म्हणजेच तिलतर्पण करावे असेही काही धर्मग्रंथांमध्ये नमूद केले आहे.सर्वांनी या पर्वाचा लाभ घ्यावा.धन्यवाद!🙏

            

         CR  डॉ.अपर्णा कल्याणी

                सोलापूर.

No comments:

Post a Comment