🙏
*परमार्थाची प्रक्रिया जर योग्य दिशेनं झाली नाही तर गुंता वाढतो. परमार्थ हा 'मी'चा निरास करण्यासाठी आहे, हे भान सुटलं तर परमार्थाची दिशा चुकते. मग 'मी'ची गाठ सुटण्याऐवजी पारमार्थिक 'मी'ची गाठ अधिकच पक्की होते. त्यासाठी प्रपंचाप्रमाणेच परमार्थातही अवधान पाहिजे. आपल्याला कृती करण्याची सवय आहे, वृत्ती बनवायची नाही. बाहेरून पारमार्थिक कृती, बाहेरून पारमार्थिक वेषभूषा, बाहेरून पारमार्थिक वावर आपल्याला पटकन जमतो पण वृत्ती तशी नसते! तोंडी उच्च ज्ञान आहे पण कृती विपरीत, यामुळे त्या परमार्थाबद्दलच लोकांना शंका येते. पारमार्थिक मुखवटा घातलेल्या मला अहंकाराबद्दल तिटकारा असतो, पण तो दुसऱ्याच्या! मलाही आसक्ती आवडत नाही, पण ती दुसऱ्याला असलेली. तेव्हा मी अहंकारी, आसक्त असताना सर्व जग राममय आहे, असं नुसतं बोलत असेन तर काय उपयोग? परमार्थ करणारे जे लोक दिसतात किंवा परमार्थाच्या नावाखाली जे व्यवहार होत असतात त्यांच्याकडे पाहिले असता खऱ्या परमार्थाच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही.*
🙏🙏
No comments:
Post a Comment