TechRepublic Blogs

Monday, February 19, 2024

भावार्थ

 *॥श्रीहरिः॥* 


सातव्या अध्यायाची सांगता करताना(२९ व ३० श्लोक) भगवंतांनी ब्रह्म, अध्याय, कर्म, अधिभूत, अधिदैव,अधियज्ञ या सहा संज्ञांचा उल्लेख केला आणि त्यांचे ज्ञाते मला येऊन मिळतात असे सांगितले.


अर्जुन विचक्षण श्रोता असल्यामुळे त्याने या सर्वांचा अर्थ आपल्याला नेटका उलगडावा म्हणून भगवंतांना प्रश्न केला


॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता अष्टमोऽध्यायः 


*अर्जुन उवाच*

*किं तद्ब्रह्म किमध्यात्मं* 

*किं कर्म पुरुषोत्तम ।*

*अधिभूतं च किं प्रोक्तम-*

*-मधिदैवं किमुच्यते ॥* 

*॥८.१॥*


*अधियज्ञः कथं कोऽत्र* 

*देहेऽस्मिन्मधुसूदन ।*

*प्रयाणकाले च कथं* 

*ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥*

*॥८.२॥*


(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय आठवा अक्षरब्रह्मयोग ८.१ व ८.२)


*भावार्थ :-अशा तऱ्हेने भगवंताचे वचन न समजलेल्या अर्जुनाने विचारले -* 


*हे पुरुषोत्तमा ! ब्रह्म म्हणजे काय ? अध्यात्म म्हणजे काय ? सकर्म म्हणजे काय ? ही भौतिक सृष्टी म्हणजे काय आणि देवता कोण आहे? हे कृपया मला सांगा.* 


*हे मधुसूदना! यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो ? भक्तीमध्ये युक्त असलेले मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात ?* 


या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्प्राप्तीचा संदेश दिला आहे. 


यालाच *'अक्षरब्रह्मयोग'* असं देखील नाव दिलेलं आहे. 


अर्जुनाने या योगाचा अनुभव घ्यावा, गीतेचे श्लोक आत्मसात करावेत, ते जगावेत यासाठी भगवंतांनी अर्जुनाच्या सगळ्या शंकांचं निरसन केलं. 


संपूर्ण ज्ञान आणि शंकारहित मनाचा मालकच भगवद्प्राप्तीसाठी सुपात्र ठरू शकतो. त्यामुळे भगवंतांनी अर्जुनाला सगळ्या प्रश्नांची उचित उत्तरं दिली. 


 *अर्जुनाचे सात प्रश्न -*


१. ब्रह्म म्हणजे काय ?

२. अध्यात्माचा अर्थ काय आहे?

३. कर्म कशाला म्हणतात ?

४. अधिभूत म्हणजे काय ?

५. अधिदैव कशाला म्हणतात ?

६. अधियज्ञ कोण आहे ?

७. मृत्यूसमयी भक्तीमध्ये लीन राहणारे भगवान श्रीकृष्णाला कशा प्रकारे ओळखतात ?


*या प्रश्नांची उत्तरे देणारा महात्मा केवळ भगवान श्रीकृष्णच होय.*


'ब्रह्मकर्माधिभूतादि 

विदुः कृष्णैकचेतसः ।

इत्युक्तं ब्रह्मकर्मादि 

स्पष्टमस्पष्ट उच्यते ।।'


एकमात्र भगवान् श्रीकृष्णच असे आहेत की ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, इत्यादींना पूर्णपणे जाणतात. सातव्या अध्यायात

त्याचा उल्लेख झाला. तेच आता आठव्या अध्यायात भगवंत स्पष्ट रूपाने उलगडत आहेत. 


भगवंतांचे अर्जुनावर किती प्रेम होते पहा. म्हणूनच ही गूढविद्या ते प्रगट करत आहेत. 


*ज्ञानोबा म्हणतात,*

जैं कृष्णाचेया होईजे आपण ।

कृष्ण होय आपुलें अंतःकरण। 

तैं संकल्पाचें आंगण । 

वोळगती सिद्धी ।। 


परि ऐसें जें प्रेम । 

तें अर्जुनींचि आथि निस्सीम । 

म्हणऊनि तयाचे काम । 

सदा फल ।।

(ज्ञाने. ८.१०-११).


श्रोतेहो, आपण जेव्हा श्रीकृष्णरूपाशी अनन्यभावनेने एकरूप होतो तेव्हाच आपले हृदय श्रीकृष्णमय होऊन जाते. मग आपल्या संकल्पाच्या मनअंगणात अष्ट महासिद्धी येतात आणि आपली सेवा करू लागतात. हे जे अपूर्व प्रेम आहे ते भक्तश्रेष्ठ अर्जुनापाशी अपरंपार होते. म्हणून अर्जुनाची प्रत्येक इच्छा भगवंत फलद्रूप करत असे.



श्रीगीतासागर पूर्वार्ध - श्री गुरुदेव शंकर अभ्यंकर. 

सार्थ श्रीज्ञानेश्वरी. 



*।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।*

No comments:

Post a Comment