*॥श्रीहरिः॥*
मागच्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला जो समत्वाचा योग सांगितला तो काही अर्जुनाला फारसा पटला नाही,
*अर्जुन म्हणाला,*
'हे मधुसूदना! तुम्ही सांगितलेला हा समभावाचा योग मला अव्यवहार्य आणि असह्य वाटतो. कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे.
॥ॐ श्री परमात्मने नमः ॥
अथश्रीमद्भगवद्गीता षष्ठोऽध्यायः
*अर्जुन उवाच:*
*योऽयं योगस्त्वया प्रोक्तः*
*साम्येन मधुसूदन ।*
*एतस्याहं न पश्यामि*
*चञ्चलत्वात् स्थितिं स्थिराम् ॥*
*॥६.३३॥*
(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय सहावा आत्मसंयमयोग ६.३३)
*भावार्थ:- अर्जुन भगवंताला म्हणाला की, हे मधुसूदना, हा जो समदर्शनाचा योग तू मला समजावून सांगितलास ना, तो माझ्या मनाच्या चंचल स्वभावापुढे टिकेल असे मला वाटत नाही.
*भगवंतांनी अर्जुनाला आत्मयोगात स्थापित होण्याची, सर्व प्राणिमात्रांबाबत समभाव बाळगण्याची जी शिकवण दिली आहे, ती ऐकायला तर खूप छान वाटतं.*
*परंतु* यातही एक समस्या आहे,
या जगात जगत असताना, मोहमायेची चपराक झेलत (सहन करत) असताना, आयुष्यात या बोधाचा अवलंब कसा करावा?
*कारण* ही समस्या केवळ अर्जुनाचीच नाही, तर त्या *प्रत्येक साधकाची* आहे, जो या प्रापंचिक मोहमायेच्या पाशातून स्वतःची सुटका करून घेण्याची इच्छा बाळगतो. ज्याला सत्यमार्गावरून मार्गक्रमण करण्याची इच्छा आहे. त्यासाठी तो सत्संगास जातो, उत्तमोत्तम गोष्टींचं श्रवण करतो, ध्यान करतो. हे सर्व केल्याने त्याला शांत, प्रसन्नतेची जाणीव होते. मात्र जसं तो सत्संग केंद्राच्या बाहेर पडून बाह्यजगतात प्रवेश करतो, तसं एकाच झटक्यात त्याच्यातील सर्व शांतीचा भंग होतो.
*जसं,*
एका साधकाला ध्यानकेंद्रात ध्यानस्थ बसल्याने, खूप हलकं आणि शांत जाणवत असे. प्रवचन ऐकून त्याने ठाम निर्धार केला होता, की आजपासून प्रत्येक जीवजंतूत
तो ईश्वरालाच पाहील. सर्वत्र समभावनेतच राहील.
*असाच* विचार करत तो ध्यानकेंद्राच्या बाहेर पडला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की आपल्या स्कूटरसमोर कोणीतरी त्याची कार अशी पार्क केली आहे, ज्यामुळे आपली स्कूटर पार्किंगमधून काढता येणार नाही. त्याने ती स्कूटर बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यात त्याला यश आलं नाही.
*हळूहळू* सत्संगाचा प्रभाव कमी होऊ लागला, त्याला क्रोध येऊ लागला आणि शेवटी सवयीनुसार त्याच्या मनाची बडबड सुरू झाली... 'कसे लोक आहेत... यांना गाडी कशी पार्क करावी याचीही अक्कल नाही... कुठं गेलाय हा अशी गाडी लावून... आता येऊ दे तर खरं, बघतोच त्याला...'
*अशा प्रकारे* स्कूटर काढण्याच्या नादात कारवर ओरखडे पडले. त्याचवेळी कारवाला तिथे आला. त्याने गाडीवर पडलेले ओरखडे पाहिले, तेव्हा त्यालाही राग आला. तो तर कधी सत्संगालाही गेलेला नव्हता. मग आता पुढचं दृश्य काय असेल, याची कल्पना तर आपण स्वतःच करू शकता.
सत्संगास गेलेला मनुष्य जेव्हा भांडण-तंटा करून घरी पोहोचेल, तेव्हा त्याची मानसिक स्थिती कशी असेल? कदाचित तो असा विचार करेल,
*अशा विचित्र लोकांमध्ये मी ईश्वर कसं पाहू?*
'या तर सगळ्या निरर्थक गोष्टी आहेत. संसारापासून दूर राहणाऱ्या, जगापासून अलिप्त राहणाऱ्या साधू-संतांबाबत हे सगळं ठीक आहे; पण आपल्यासारखे प्रापंचिक, जे या जगात ईश्वराच्या नव्हे, तर राक्षसांच्या सान्निध्यात वावरत असतात, त्यांच्यासाठी किती कठीण आहे.'
अर्जुनदेखील याच कारणास्तव श्रीकृष्णांना म्हणाला,
*‘या जगात राहून मनाला उलट-सुलट विचार करण्याची, तर्क- कुतर्क लढविण्याची, सतत चलबिचल होण्याची इतकी सवय जडली आहे, की यातून सावरणं खूपच कठीण आहे.'*
इतक्या वर्षांपासून असलेल्या या वृत्ती बळावल्याने त्यांच्यावर ताबा मिळवणं आता अत्यंत कठीण वाटत आहे. चौखूर उधळलेल्या बेलगाम मनावर नियंत्रण ठेवणं, म्हणजे सोसाट्याच्या वादळी वाऱ्याला रोखून शांत करण्यासारखंच आहे.
*समत्वस्थितीच्या विरोधी अर्जुन देत असलेले कारण -*
अर्जुन असे म्हणत आहे, की
'हा समत्वयोग स्थिर स्थितीत राहणे - ही अगदी अंतिम स्थिती तू सांगत आहेस, पण माझी अडचण तर अगदी प्रारंभी आवश्यक असणाऱ्या गोष्टींपासून आहे.'
*मनाची एकाग्रता* होणे ही ध्यानयोगातील प्रथम साध्य करण्याची गोष्ट आणि ध्यानयोग हे समत्वयोग साध्य करण्याचे साधन. मनाच्या चंचलत्वामुळे एकाग्रता साधणेच मला अवघड आहे, त्यामुळे ध्यानयोग साधणेही कठीणअसताना, त्याच्यापुढचा समत्वयोग माझ्या या अवस्थेत साधला जाणे हे मला संभवनीय वाटत नाही.'
*पं. सातवळेकरांनी* या श्लोकावर विवरण करताना म्हटले आहे,
'कोणतेही कलाकौशल्याचे काम मन एकाग्र केल्याशिवाय उत्कृष्ट होऊ शकत नाही. तर यापेक्षा (आत्मस्वरूपावर ते केंद्रित करणे हे) कितीतरी उच्च कार्य (मनाच्या चंचलत्वाला आवर घालून) ते पूर्ण एकाग्र केल्याशिवाय कसे होऊ शकेल? प्रबल झालेला नोकर स्वाधीन ठेवून त्याच्याकरवी आपल्या हिताचे काम कसे करून घ्यावे, हा प्रश्न नेहमीच मालकासमोर असतो. (मनाला ताब्यात ठेवून त्याच्याकडून काम करून घेणे) हे तर राक्षसाला सेवक ठेवण्यासारखे आहे.'
*मन हे केवळ चंचल आहे एवढेच नव्हे तर त्याला आवरणे कठीण करणारे अनेक दुर्गुण त्याच्यामध्ये आहेत. साधकाला मन आवरणे का कठीण जाते हे पुढच्या श्लोकात श्लोकात अर्जुन अधिक विशद करून मांडत आहे.*
*मनाचे चंचलत्व अर्जुन मांडतो हे विशेष का ?*
अर्जुन हा एकाग्रतेचे आदर्श प्रतीक (रोल मॉडेल) असे वस्तुतः म्हणता येईल.
द्रोणाचार्यांजवळ धनुर्विद्या शिकत असताना, एकदा द्रोणाचार्यांनी कापडाचा पक्षी करून उंच झाडावर ठेवला होता, आणि शिष्यांच्या धनुर्विद्येतील कौशल्याची परीक्षा घेण्यासाठी त्यांना त्या पक्ष्याच्या डोळ्यात बाण मारायला सांगितले होते. कित्येकांना तर तो पक्षीच दिसत नव्हता. परीक्षेसाठी पुढे येणाऱ्या प्रत्येकाला द्रोणाचार्य विचारत,
'तुला काय - काय दिसतआहे?'
*तेव्हा* ते लहान वयातील कौरव-पांडव एकेक जण पुढे येऊन उत्तर देत होते, की 'झाड दिसत आहे, पाने दिसत आहेत, पक्षी दिसत आहे.' तेव्हा द्रोणाचार्य 'नको मारू बाण' असे सांगून पुढच्या शिष्याला बोलवत असत. शेवटी अर्जुन आला आणि तो एकाग्रतेने पाहू लागला. बाण मारण्यापूर्वी त्यालाही द्रोणाचार्यांनी प्रश्न विचारला,
'तुला काय दिसत आहे?'
तेव्हा तो म्हणाला,
'मला फक्त पक्ष्याचा डोळा दिसत आहे.'
तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले,
‘मग मार बाण!' आणि अर्जुनाने पक्ष्याच्या डोळ्यात बाण मारला. तेव्हा अर्जुनाला शाबासकी देत ते सर्व शिष्यांना म्हणाले,
*‘धनुर्विद्येसाठी अशी एकाग्रता हवी.'*
*अर्जुनाने* पुढेही आयुष्यामध्ये मत्स्यभेद इत्यादी प्रसंगांतून विलक्षण एकाग्रता करण्यासाठीचे मनाचे संयमन करून दाखवले होते. तोच अर्जुन मनाच्या चंचलत्वाची प्रबलता आणि त्यामुळे समत्वयोग साधणे कठीण आहे असे या श्लोकात प्रकट करत आहे, हे विशेष आहे.
*मनाचे नियंत्रण करणे किती अवघड आहे, आणि का अवघड आहे, हे तो पुढच्या श्लोकात व्यक्त करत आहे.*
ध्यानयोग - स्वामी माधवानंद स्वरुपयोग प्रतिष्ठान.
संपूर्ण भगवद्गीता - सरश्री
*।।श्रीकृष्णार्पणमस्तु।।*
No comments:
Post a Comment