TechRepublic Blogs

Sunday, February 4, 2024

सुबुद्धी

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*सुबुद्धी क्षणातही पालटू शकते म्हणून मनात आले की करून टाकावे*


   *अधिक मास चालू होता. त्या निमित्ताने एकाने आग्रहाने चांदीची एक जाडजूड वाटी श्रीमहाराजांस अर्पण केली ती त्यांनी तेथल्याच कोनाड्यात ठेवून दिली. योगायोग असा की दुसऱ्याच दिवशी श्मश्रु करण्यास नेहमीचा नापित आला. त्याने सवयीप्रमाणे धोपटीतली पितळी वाटी पाण्यासाठी काढली. श्रीमहाराज त्याला म्हणाले, " अरे आज ती वाटी नको ; ती कोनाड्यात आहे ती वाटी घे. नापिताने ती वाटी घेतली आणि ती आपल्या उजव्या ( म्हणजे समोर बसलेल्या श्रीमहाराजांच्या डाव्या) हाताशी ठेवून आपले काम सुरू केले. त्या बिचाऱ्याला चांदीची वाटी ही एक अपूर्व, अलभ्य अशीच गोष्ट होती आणि त्याचे मन स्वाभाविकच त्या वस्तूवर गेले. ही गोष्ट सर्वज्ञानी श्रीमहाराजांच्या लक्षात आली. श्मश्रुकर्म संपल्यावर आपल्या डाव्या हाताशी असलेली ती वाटी नापिताला डाव्याच हाताने देत ते म्हणाले , " अरे घेऊन जा ही तुला. "*

      *तेथे एक पढिक शास्त्री होते त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला आणि डाव्या हाताने दिलेले दान अशास्त्रीय आहे ही गोष्ट त्यांनी श्रीमहाराजांच्या नजरेस आणून दिली तेव्हा श्रीमहाराज म्हणाले, " ही गोष्ट अशास्त्रीय असेल हे मी मान्य करतो पण ती तशी करण्याचे कारण असे की ती वाटी डाव्या हातातून उजव्या हातात घेण्याच्या अत्यल्प अवधीत सुध्दा देण्याची सुबुद्धी पालटून जाणे शक्य असते तो संभव टाळण्यासाठी मी असे केले. "*

*||श्रीराम जय राम जय जय राम||*

No comments:

Post a Comment