TechRepublic Blogs

Saturday, June 29, 2024

संसाराचा मोह

 *श्री श्रीधर स्वामींनी एका साधकास लिहिलेलं पत्र*


*चि. लक्ष्मीनारायणास आशीर्वाद !*

*बाळ, आपल्या मुलाविषयी विचार करून निराश होऊ नकोस. सुकले पान गळून पडले तर झाड त्यावर दुःख करीत बसते का ? तसेच ज्यांचे आयुष्य संपले त्यांच्यासाठी, त्यांच्याविषयी कुणीच दुःख करू नये. नदीच्या प्रवाहात वाहत जाणारे लाकडाचे तुकडे इकडून तिकडून आलेल्या पाण्याच्या प्रभावाने वाहत, पाहता पाहता दूर होतात. 

तसेच ऋणानुबंधाने काहीजण एकत्र येतात, तर काही जण ऋणानुबंध संपला की दूर होतात. समुद्रात उठणाऱ्या लाटा, फेस काही वेळ राहून तेथेच लीन होऊन जातात. सर्वांचे देह हे काही काळ राहून आपली वेळ संपताच विलन होऊन जातात.प्रत्येकाचा देह हा कधी ना कधी नष्ट होणारच. संसाराचा मोह असेपर्यंत, जुने कपडे काढून फेकून नवे वस्त्र धारण  केल्यासारखा, हा* *जीव एक देह सोडून दुसरा देह धारण* *करतो. मागच्या जन्मीच्या कर्मफलरूप देह धारण करून,* *त्या कर्माप्रमाणे जगून आयुष्य संपताच हा देह सोडून जाताना*

*दुःख देऊन जाणेही त्या पूर्वजन्मीच्या कर्मानुसारच. तुझा मुलगा काही दिवस इथे राहून तुला दुःख देऊन जाण्यासाठीच जन्मला होता. याचा अर्थ असा, की त्याच्या कर्मानुसार हे घडले. मग आता दुःख कशाचे करायचे ?* *नष्ट पावणारा देह आपल्या धर्मानुसार नष्ट झाला; मग आता कोणत्या देहासाठी दुःख करायचे ? शोक करायचा ? निराश का व्हायचे ?*

*जन्म मिळतो ते दुसऱ्याचा उद्धार करायला, एका जीवाच्या* *जन्ममृत्यूचा आनंद किंवा व्यथा व्यक्त करायला नव्हे. नदी सागराला जाऊन मिळते तसेच परमात्म्यापासून दुरावल्याचे अज्ञान झिडकारून, गुरूने दाखविलेला आत्मरूप मार्ग अनुसरून,

 त्याची मान्यता मिळवून या भवदुःखातून मोकळे होणे यातच जन्मसाफल्य आहे. घरी आलेला पाहुणा परत आपल्या घरी जातो, तसेच आयुष्य संपता देह पडून जातो व तो आत्मा आपल्या मूळ स्वरूपात म्हणजेच परमात्म्याच्या स्वरूपात लीन होण्यासाठी निघून जातो.

 देह हा सदैव विनाशीच आहे आणि आत्मा अविनाशी, आनंदस्वरूप आहे, हे ज्या ज्ञानी गुरुभक्ताने जाणले आहे, तो कुणाच्याही जन्म-मरणाचा शोक करीत नाही; तेव्हा तू का एवढा शोक करतोस ? फुटके मडके जसे आपण टाकून देतो, तसेच शव जाळून टाकतो. यात शोक करण्यासारखे काही नाही.

 तू माझी सेवा केली आहेस म्हणून तुला मोक्षमार्ग दाखवून यातून तुला मुक्त करावे, असे मला वाटते, हे साहजिकच आहे. तुझ्या मुलालाही मोक्ष द्यावा, हे माझे कर्तव्य आहे. प्राण गेला, देहही जाळून टाकला, त्याला मुक्ती मिळाली, मग आता शोक* *करण्यास कारण काय राहिले ? संकलन आनंद पाटील*

सप्तमोध्याय

 *॥श्रीहरिः॥*


सकाम व निष्काम भक्ताची उपासना व फल यातील भेद उलगडून सांगताना भगवंत म्हणतात, 


॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता सप्तमोध्याय:


*अन्तवत्तु फलं तेषां* 

*तद्भवत्यल्पमेधसाम् ।*

*देवान्देवयजो यान्ति* 

*मद्भक्ता यान्ति मामपि ॥*

*॥७.२३॥*


(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग ७.२३) 


*भावार्थ : परंतु; अल्पबुद्धी लोकांना मिळणारं हे फल नाशिवंत असतं. (याप्रमाणे) देवतांची आराधना करणारे देवांना प्राप्त होतात आणि माझे भक्त (उपासक) मला प्राप्त होतात.*


'अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात. पण त्यांना प्राप्त होणारी फळं मर्यादित आणि अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात. पण माझे भक्त मात्र अखेर माझ्याच परमधामाची प्राप्ती करतात.' 


*मंदिरात* किंवा *धार्मिक स्थळांमधे* जाऊन श्रद्धेमुळे जर सत्प्रेरणा मिळत असेल तर ती गोष्ट केव्हाही चांगली. क्लबमधे जाऊन पत्ते खेळल्यामुळे अशी प्रेरणा खचितच मिळत नाही. म्हणून सामान्य लोक श्रद्धेमुळे काम करतात त्याचं फळ त्यांना मिळतं. 



*परंतु;भगवंत सांगतात की,* 

त्यांचं हे फळ टिकऊ नसतं. मोक्षाचं फळ जसं टिकाऊ आणि नित्य असतं तशीसामान्य श्रद्धेची फळं ही टिकाऊ नसतात. ती अनित्य असतात. याचं कारण, जे आराध्य दैवत असतं तेच मुळात अनित्य असतं. साऱ्या देवदेवता या परमेश्वराचंच स्वरूप आहेत. त्या परमेश्वरानंच निर्माण केलेल्या आहेत. मात्र या देवदेवता नित्य नसतात.मनुष्याची त्यांच्यावरची श्रद्धा देखील त्यामुळे नित्य नसते. म्हणून फळंही अनित्यच असतं.


*अनित्याकडून नित्यत्व* कधी मिळू शकत नाही किंवा अपूर्णाकडून मिळालेलं फळ हे कधी पूर्ण असू शकत नाही. मोक्षाकरता किंवा परमप्राप्तीसाठी ते कारणीभूत होऊ शकत नाही. या जन्मातच ते भोगून संपून जातं. शिवाय, या अनित्य भौतिक देवदेवतांच्या उपासनेमुळे अनित्य भौतिक फळंच मिळतात - मोक्षासारखं चिरंतन फल मिळत नाही. जो वासुदेवाची (परमतत्त्वाची) आराधना करतो त्यालाच मोक्षप्राप्ती होते. देवदेवतांची उपासना करणारे देवदेवतांकडे जातात. म्हणजेच स्वर्गलोक, शिवलोक, विष्णुलोक असे लोक त्यांना प्राप्त होतात. तर जे परमात्म्याचं ध्यान करतात त्यांना मोक्षप्राप्ती होऊन त्यांचं जन्म - मरण टळतं. एका अंतिम आनंदसागरात ते डुंबत राहतात.



*भगवान श्रीकृष्ण सकाम भक्तांना अल्पबुद्धी म्हणजे कमी हुशार असं संबोधतात.* 

कारण त्यांच्याकडे मिळवण्यासाठी संपूर्ण विशाल असा सागर(तत्त्वज्ञान) आहे, परंतु ते छोट्या छोट्या भौतिक गोष्टींची मागणी करून, त्यातच खूश होतात. 


*हे तर असं झालं की,* 

एक राजा त्याच्या सेवकावर खूश होऊन त्याला म्हणतो, 


'मी तुझ्या सेवेने अत्यंत प्रसन्न झालो आहे. माझ्या खजिन्यातून तुला पाहिजे तितकं धन घे.' 


पण त्या सेवकासाठी १०० मुद्रा म्हणजेच सर्वांत मोठी संपत्ती होती, केवळ तिचीच तो कल्पना करू शकत होता. त्यामुळे तो तेवढीच मागणी करतो. राजा मनातल्या मनात हसतो. कारण त्यावेळी त्याला विचार येतो, 


'अरे, मी तर या सेवकासाठी संपूर्ण खजिना उघडा करून दिला होता पण हा तर केवळ शंभर मुद्रांमध्येच खूश झाला!'


*विचार करा,* 

प्रत्यक्षात *ईश्वर* स्वतःच तुमच्याकडे येण्यासाठी तयार आहे. आणि त्यावेळी तुम्ही त्याला सांगताय, की 


'मला चांगले मार्क्स मिळू दे, माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, मला चांगली मदतनीस मिळू दे, माझा बॉस माझी रजा मंजूर करू दे...' 


*अशा वेळी* ईश्वरदेखील किती हसत असेल बरं, याची कल्पना न करणंच चांगलं. आपल्या प्रार्थनांनुसारच ईश्वर आपल्या इच्छा पूर्ण करत असतो. परंतु हे फळ नाशवंत आहे. कारण काही काळानंतर त्या फळांचं मूल्यच शिल्लक राहत नाही.



*हरिया* नावाचा एक शेतकरी होता. तो नेहमी देवकार्यात मग्न असायचा. गावामध्ये सगळे लोक त्याला मोठा भक्त समजायचे. तरीही हरियाला दुःख होतंच. 


*त्याचं* एकमेव दुःख म्हणजे त्याला संतती नव्हती. म्हणून त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन ईश्वराने त्याला संतती म्हणून एक मुलगी दिली.आता त्याचं निःसंतान असण्याचं दुःख दूर झालं. पण त्याचबरोबर दुःखाच्या पुढच्या अध्यायालाही सुरुवात झाली. आपल्याला मुलगी आहे पण मुलगा नाही... म्हणून त्याने ईश्वराकडे मुलाची मागणी केली. ईश्वराने तीदेखील पूर्ण केली. पण त्याचा मुलगा अभ्यासात हुशार नव्हता. म्हणून हरिया पुन्हा दुःखी झाला. आता आपल्या या दुःखासह पुन्हा एकदा तो ईश्वराला शरण गेला. आता त्याचं हे दुःखदेखील दूर झालं. पण त्यानंतर काही तो थांबला नाही... कधी मुलांची नोकरी, कधी लग्न, कधी सून, कधी मुलांची मुलं... अशा कित्येक दुःखांची गाऱ्हाणी घेऊन तो ईश्वराला सतत काही ना काही मागतच राहिला... आणि एके दिवशी अशाच एका अपूर्ण इच्छेसह मरण पावला.



*हरिया* आयुष्यभर ईश्वराची भक्ती करत राहिला तरीदेखील तो शेवटपर्यंत दुःखीच राहिला...भक्तीचा परिणाम म्हणून त्याच्या सगळ्या इच्छाही पूर्ण झाल्या. शिवाय त्याच्या ज्या इच्छा पूर्ण झाल्याने त्याला जो आनंद मिळाला तोदेखील मावळला. 

*(यालाच नाशवंत फळ असं म्हटलं आहे)*


*परंतु* ज्ञानाच्या अभावी नवीन इच्छा निर्माण होतच राहिल्या... अपूर्णता, दुःख आणि अतृप्त इच्छांसमवेतच त्याचा मृत्यू झाला. एका अज्ञानी सकाम भक्ताचं जीवन अशा प्रकारचंच असतं. 


*एखाद्या* गाळणीच्या साहाय्यानेच तो ईश्वरीकृपा ग्रहण करतो. कृपा येते आणि जाते... तिचा ते लाभ तो घेऊच शकत नाही. त्याची झोळी रिकामीच राहते, मात्र त्याच्याकडे पाहणाऱ्याला वाटतं, 


'अरे तो किती पूजा- पाठ करतोय, कितीतरी पुण्य कर्म करतोय... त्या भक्तीमुळे त्याला नक्कीच मुक्ती मिळणार...' 


*परंतु* प्रत्यक्षात आतून तो एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे रिक्त, पोकळच राहतो. पुत्र, संपत्ती, नातवंडं यांसारख्या त्याच्या सगळ्या इच्छा याच जगात राहतात... ज्या इच्छांचा त्याला कोणताही उपयोग नसतो... पण निष्काम भक्ती, ज्ञान यांसारख्या इच्छांचा, ज्यांचा त्याला उपयोग झाला असता, त्या तर दुर्दैवाने त्याने मागितलेल्याच नसतात.


*भगवान श्रीकृष्ण म्हणतात,* 

देवतांचं पूजन करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझ्या भक्तांनी कोणत्याही प्रकारे माझं पूजन केलं तरी, शेवटी ते मलाच प्राप्त होतात. या पंक्तीचा अर्थ सविस्तर समजून घेऊ या. 


*निसर्गाचा हा नियम आहे, की* 

'ज्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करतो तसेच बनतो.'


*एखाद्या देवाची* तुम्ही पूजा करत असाल आणि फोकस इच्छापूर्तीवरच असेल तर हरियाच्या बाबतीत जे घडलं तेच तुमच्या बाबतही घडेल. त्या देवतेमध्ये आपल्याला ईश्वर नाही तर इच्छापूर्तीचं एक साधन मात्र दिसेल. आपलं डिलिंग ईश्वराबरोबर नव्हे तर त्या साधनाबरोबर किंवा निमित्तासोबत होईल. अशा प्रकारे निमित्ताच्या सान्निध्यात जाऊन आपल्याला ईश्वराची भेट तर घडणारच नाही, ईश्वरप्राप्तीही होणार नाही.


*आपण* महान भक्त संत तुकाराम आणि संत मीराबाई यांच्यासंबंधी ऐकलंच असेल. संत तुकारामांनी विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा केली, विठ्ठलालाच सर्वस्व मानलं, तर संत मीराबाईंनी श्रीकृष्णाच्या मूर्तीचं पूजन केलं. परंतु त्यांनी आपल्या आराध्याला इच्छापूर्तीचं साधन नव्हे तर ईश्वर मानूनच पूजलं. ते साधनांचे नव्हे तर ईश्वराचे परम भक्त होते. परिणामी त्यांना ईश्वरप्राप्ती झाली. मूर्तिपूजेचा खरा उद्देश तिथे पूर्ण झाला. परमभक्तासाठी ईश्वर एकच असतो,मग तो कोणत्याही स्वरूपात का असेना!


*भगवान श्रीकृष्ण म्हणतात,*

'माझ्या भक्तांनी मला कसंही भजलं, कोणत्याही रूपात अथवा मूर्ती समजून भजलं, ते जर माझीच भक्ती करत असतील तर ते मलाच प्राप्त

होतील.' कारण तिथे वेगळ्या गोष्टींची किंवा इच्छांची मागणीच नसेल, मागणी केवळ ईश्वराचीच असेल.'



*या* निरनिराळ्या देवतांची भक्ती करता करता उपासकाची बुद्धी स्थिर आणि शुद्ध व्हायला लागते.अखेरीस भक्ताला भगवंताच्या एकमेव विराट- सूक्ष्म, कालतीत आणि नित्य स्वरूपाचं ज्ञान होतं.पुण्याहून एखादी आगगाडी दिल्लीला जाणार असेल तर असा भक्त निदान दिल्लीच्या गाडीत तरी बसतो म्हणजेच जशी समज येईल त्यानुसार या भिन्न देवतांच्या उपासनेतून अंति परमात्म्याच्या उपासनेपर्यंत मनुष्य जाऊन पोचू शकतो. पण तोपर्यंत जी फळं मिळतात ती मात्र अनित्यच असतात. मनुष्यानं या गोष्टी ध्यानात घेऊन फळांमधेच गुंतून पडू नये. तर देवदेवतांच्या पलीकडे असलेल्या त्या अंतिम परमात्म्याचं स्वरूप जाणण्याची इच्छा धरावी. 


*'ज्ञानी'* भक्त होण्याची आकांक्षा मनात ठेवून त्या दृष्टीनं परमेश्वराचं विश्वव्यापक *'वासुदेव रूप'* आपण समजून घ्यायला हवं, असा यातून आशय निघतो.



*सारांश:*

*अनित्य देवतांच्या उपासनेतून अनित्य फळच मिळू शकतं. अपूर्णाकडून पूर्णत्व कधी मिळू शकत नाही. आपली कर्म आणि उपासनापद्धती प्रगल्भ बनवली पाहिजे.अंतिम परमात्म स्वरूपाचा शोधघेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो नित्य असल्यामुळे त्याच्याच उपासनेतून मिळणारं फलही नित्यच असतं.* 


संपूर्ण भगवद्गीता - सरश्री. 

श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीता भाष्य. 



*।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।*

Thursday, June 27, 2024

ज्ञानी भक्त

 *॥श्रीहरिः॥*


ज्ञानी भक्त सर्वश्रेष्ठ आणि दुर्लभ कसा ते भगवंत सांगतात,


*-----------------------------*


॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता सप्तमोध्यायः


*बहूनां जन्मनामन्ते*

*ज्ञानवान्मां प्रपद्यते ।*

*वासुदेव: सर्वमिति* 

*स महात्मा सुदुर्लभ:॥* 

*॥७.१९॥*


(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग ७.१९) 


*भावार्थ:- पुष्कळ जन्मांच्या  शेवटच्या जन्मी तत्त्वज्ञान प्राप्त झालेला ज्ञानी सर्व काही वासुदेवच आहे अशा प्रकारे मला भजत असतो तो महात्मा अति दुर्लभ आहे.*


*-----------------------------*


*'वासुदेवः सर्वम्' -*

खऱ्या ज्ञानी व आत्मसाक्षात्कारी महात्म्याचे वर्णन भगवंत करतात. या श्लोकातील 'वासुदेवःसर्वमिति' हा भाग महत्त्वाचा आहे.वासुदेव शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे,



'सर्वाणि भूतानि वसन्ति यस्मिन् स वसुः, सर्वाणि भूतानि ससत्तास्फुरणेन द्योतयति प्रकाशयति य सः देवः, वसुश्वासौ देवश्च वसुदेवः, वसुदेवः एव वासुदेवः सर्वात्मा परं ब्रह्म ।'


"ब्रह्मदेवापासून सर्व भूतमात्रात वसणारा जो, त्याला वसु म्हणतात, सर्व भूतमात्रांना आपल्या सामर्थ्याने तो चैतन्य प्रदान करतो, प्रकाश देतो. म्हणून त्याला देव म्हणतात; वसु व देव यांचा मिळून वसुदेव असा द्वंद्व समास झाला. वसुदेव (विष्णु) हाच वासुदेव (कृष्ण) होय." 


विष्णुपुराणही म्हणते,


'भूतेषु वसते सोऽन्तर्व-

-सन्त्यत्र च तानि यत् ।

धाता विधाता जगतां 

वासुदेवस्ततः प्रभुः ।।'

(वि. पु. ६-५-८२)


"अर्थात् जो सर्व भूतांच्या ठायी निवास करतो आणि सर्व भूतसमूह ज्याच्यात निवास करतात, जो सर्वांचा धाता (पालनकर्ता) आणि जगताचा विधाता (कर्मफलदाता) आहे त्या प्रभूला (जगत्पतीला) वासुदेव असे म्हणतात." 


हे सर्व जग वासुदेवच आहे,असा जो प्रत्यक्ष अनुभव  असा घेतो, तो खरा ज्ञानी महात्मा. तो सुदुर्लभ म्हणजे अत्यंत दुर्लभ आहे. ही अनंत जन्मांची तपश्चर्या असते. मग एखादाच शुक, एखादाच ज्ञानेश्वर जगाला दिसतो. 


*परमेश्वर* सर्व भूतांच्या ठायी वास करून असतो. म्हणून त्याला वासुदेव म्हणतात. महाभारताच्या शांतिपर्वात ही 'वासुदेवा'ची आध्यात्मिक व्याख्या सांगितलेली आहे. अशा सर्वव्यापक परमेश्वराची अनन्य दैवत म्हणून जो भक्त एकनिष्ठेनं भक्ती करतो तो भक्त अनेक जन्मानंतर मला येऊन मिळतो असं भगवंत सांगतात. 



*असा* महान भक्त होणं ही दुर्मिळ गोष्ट आहे.आत्यंतिक श्रेष्ठ भक्त होणं ही सहज साध्य गोष्ट नक्कीच नाही. अनेकजन्मांच्या अथक परिश्रमानंतर, निष्ठापूर्वक भक्तीनंतर ही स्थिती एखाद्याच ज्ञानी भक्ताला प्राप्त होते. अनेक जन्मांमध्ये हा ज्ञानी भक्त निराशी: म्हणजे फलाशारहित कर्म करता करता या पदापर्यंत येऊन पोचतो. 



*'पी हळद आणि हो गोरी,'* इतकी सहज वाटणारी ही गोष्ट नाही. जे काही आहे ते वासुदेवमय आहे, अर्थात परमात्मा-स्वरूप आहे, ही जाणीवयुक्त समज प्राप्त झाल्यावरच ज्ञानवानाला परमेश्वराची प्राप्ती होते. तो महात्मा बनतो. 


*केवळ* दानधर्म करणं, स्वत:चं नाव व्हावं म्हणून मंदिरं बांधणं किंवा धार्मिक स्थळांना देणगी देणं, पाणपोया घालणं, आध्यात्मिक व्यक्ती म्हणून प्रसिद्ध पावणं, द्वेषमूलक राजकारण-समाजकारण करणं अशा लौकिक गोष्टींमधून परमेश्वराला अभिप्रेत असणारं 'महात्मा'पद ठरत नसतं. अशा कार्यांमुळे स्वर्गप्राप्तीही होण्याची शक्यता नसते; मग मोक्षप्राप्तीची गोष्ट तर दूरच! कारण शुद्ध - वासनाशून्य अवस्थाच परमात्म्यापर्यंत जाऊ शकते.


आपल्या अन्नावर कुणाची वासना गेली तर ते अन्न आपल्या घशाखाली उतरत नाही. मग या भौतिक नावलौकिकाच्या वासना कर्मात राहिल्या तर परमात्मा त्या जीवाचा स्वीकार करील का?



*एकदा* एक उद्योगपती निवर्तल्यानंतर स्वर्गाच्या द्वारापाशी जातो. द्वारपाल त्याला अडवतो. तेव्हा तो म्हणतो, 


'अहो, मी पृथ्वीवर खूप महान कार्य केलं आहे. मोठमोठाली मंदिरं बांधली आहेत. मला स्वर्गात प्रवेश मिळणारच!'


द्वारपाल चित्रगुप्तांकडून निश्चिती करून घेतो आणि उद्योगपती महाशयांना सांगतो,


'आपल्याला स्वर्गात जागा नाही. कारण आपण जी मंदिरं बांधलीत ती प्रसिद्धीच्या हेतूनं आणि स्वत:चं नाव व्हावं म्हणून बांधलीत. आपला हेतू

शुद्ध नव्हता. आपला 'अहं' मुळीच सुटला नव्हता! अशांना इथे स्थान नाही.'


परमेश्वस्वरूप जाणण्याची क्रिया इतकी सरळसोपी नाही. अनेक जन्मांच्या निदिध्यासातून ज्ञानप्राप्ती होते आणि ज्ञानप्राप्तीनंतर अंतिमतः त्या तत्त्वाशी एकरूपता होते.



*सारांश:* 

*जेव्हा कार्यामागचा हेतू शुद्ध असतो, कार्य निष्काम बुद्धीनं, ईश्वर निष्ठेनं आणि ज्ञानपूर्वक केलं जातं तेव्हाच मनुष्य महात्मा बनतो. असा एकनिष्ठ भक्त होण्यासाठी अनेक जन्म साधना करावी लागते. ज्ञानोत्तर निष्काम कर्म करावं लागतं. तरच केव्हा ना केव्हा तरी सिद्धी प्राप्त होण्याची शक्यता असते.*


*-----------------------------*


श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीता भाष्य. 

श्रीगीतासागर पूर्वार्ध - श्री गुरुदेव शंकर अभ्यंकर. 



*।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।*

आयुर्वेद आणि श्रीखंड यांचा संबंध

 *" गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे?"*


आयुर्वेद आणि श्रीखंड यांचा संबंध



मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते.हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी बांबू, रेशमी वस्त्र,तांब्या, आंब्याची डहाळी, कडुनिंबाची कोवळी पाने, बत्ताशाची माळ यासारख्या शंभर टक्के नैसर्गिक आणि आरोग्यास पूरक असलेल्या गोष्टी वापरून गुढी उभारून त्याची पुजा केली  जाते.  बत्ताशाचा प्रसाद वाटला जातो आणि कडुनिंबाची चटणी खाल्ली जाते... असे म्हटले जाते की जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असेल, ती वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करावी..  म्हणूनच काय ते गुढीपाडव्याच्या दिवशी आहारात आपण गोडा पासून ते कडू पर्यंत सर्व चवीचा समावेश केलेला असतो...


या दिवशी गुढीला श्रीखंड पुरी चा  नेवेद्य आवर्जून दाखवला जातो.. आज आपण या श्रीखंड बद्दल थोडंसं जाणून घेऊया. आयुर्वेदात श्रीखंडला "रसाला" किंवा "शिखरिणी" म्हणतात. श्रीखंड या पदार्थाला पौराणिक संबंध सुद्धा आहे. महाभारतामधील भीम जेव्हा बल्लव, या नावाने स्वयंपाक करीत होता. तेव्हा हा खाद्यपदार्थ सर्वप्रथम तयार केला. या पदार्थांच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप आली. श्रीच्या दैनंदिन व्यवहारात यामुळे खंड पडला, म्हणूनच हा पदार्थ श्रीखंड म्हणून ओळखला जातो.


"आता गुढी पाडव्याला श्रीखंडच का खायचे?"

उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना करताना थकवा येऊ नये, शरीरशक्‍ती टिकून राहावी यासाठी श्रीखंड हे रसायना प्रमाणे काम करते. म्हणजेच काय तर उन्हाळ्यात कडक उन्हामुळे ज्याचे शरीर अगदी शुष्क बनले आहे, ज्यांना उत्साह नाही,ज्यांना शरीराची पुष्टी हवी असेल त्यांना श्रीखंड हे अगदी उत्तम होय.  श्रीखंड हे पचायला थोडे जड असते, शिवाय हा थोडा आंबवलेला पदार्थ आहे, या दृष्टीने आयुर्वेदाने श्रीखंडाला लागणारे घटक व ते बनविण्याची कृती व्यवस्थित सांगून ठेवली आहे. पण आजकाल बरेच जण आयुर्वेदिक विधी न वापरता श्रीखंड बनवतात   यामुळे श्रीखंड बाधते..


"आता आयुर्वेदानुसार श्रीखंड कसे बनवावे हे आपण पाहू या"


प्रथम छान दही लावावे ते कधीही आंबट असू नये. चांगले दही लागल्यानंतर सूती अथवा तलम वस्त्रात बांधून पुरचुंडी तयार करून ते 7-8 तासा साठी टांगून ठेवावे. जे काही जल रहीत दही तयार झाले आहे त्याला आपण चक्का म्हणतो. 

 

आयुर्वेदिक श्रीखंड मध्ये चक्का हा खडीसाखर (मिक्सर ला बारीक करून घेणे)बरोबर फेटायचा आणि फेटायच्या भांड्याला कापराने धुपवलेले जाते आणि श्रीखंड पचविण्यासाठी लागणारा अग्नी मधरूपाने समाविष्ट असतो, श्रीखंडाच्या अन्नशुद्धीसाठी त्यात तूप हि टाकलेले असते. नंतर त्यात दालचिनी, नागकेशर, वेलची, मिरीपावडर, तमालपत्र, सुंठ याची पावडर करून मिसळले जाते. वरून थोडं केसर दूध घाला म्हणजे तुमचे आयुर्वेदिक श्रीखंड तयार होते. वरील विधी वरून हे लक्षात येते कि श्रीखंड जरी कफ वाढविणारे असले तरी त्याबरोबरीने अशा पदार्थांची योजना केलेली आहे त्यामुळे श्रीखंड कफवर्धक ठरत नाही.

 

थोडक्यात काय तर गुढीपाडव्याच्या परंपरेचा आरोग्य अर्थ जाणून घेवून हा सण साजरा केला पाहिजे म्हणजे येणारे नवीन वर्ष सुख,समृद्धीने युक्त आणि आरोग्याने परिपूर्ण नक्कीच होईल.

विड्याचे पान

 *विड्याचे पान शुभ कार्यात का महत्वाचे मानले जाते 💚*


घरात कोणतेही शुभ कार्य असेल तर पहिला उल्लेख केला जातो तो विड्याच्या पानाचा. 


घरात पूजा किंवा लग्न, साखरपुडा यांसारखे शुभकार्य असेल तर अनेकदा भटजीबुवा पहिला प्रश्न विचारतात विड्याची पाने कुठे आहेत?


या विड्याच्या पानाला केवळ महाराष्ट्रीय लोकांमध्येही नाही तर इतर धर्मांतील लोकांमध्ये विड्याला महत्व आहे. 


बंगाली लोकांमध्ये लग्नाला नवरीच्या तोंडासमोर विड्याचे घेऊन मंडपात आणले जाते तर तेलुगु, बिहारी, पंजाबी या सर्व धर्मां मध्ये विड्याचे पान आणि सुपारी देऊन लग्नाची बोलणी करतात किंवा शुभकार्याला सुरुवात करतात. 


मात्र आपल्यापैकी कित्येकांना हे विड्याचे पान का वापरले जाते असे विचारले तर कोणी ठामपणे सांगू शकणार नाही.


विड्याच्या पानामागची धार्मिक कथा:


समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले. त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तींच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. 


थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंतावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली. हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला. त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले. भोजन झाल्यावर देव देवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले. त्यानंतर देवाला महानैवैद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा, दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली.


*विड्याच्या पानाचे महत्व:*


१) या विड्याच्या पानाच्या टोकास "लक्ष्मी" चा सहवास असतो.


२) विडयाच्या पानाच्या उजव्या बाजूस "ब्रम्हदेवांचा" सहवास असतो.


३) या विडयाच्या पानाच्या मधोमध "सरस्वती देवीचा" वास असतो.


४) विडयाच्या पानाच्या डाव्या बाजूस "पार्वतीदेवीचा" वास असतो.


५)या विडयाच्या पानाच्या लहान देठा मध्ये "महाविष्णूचा" वास असतो.


६)विडयाच्या पानाच्या मागील बाजूस "चंद्रदेवते"चा वास असतो.


७) विडयाच्या पानाच्या सर्व कोपऱ्यामध्ये "परमेश्वरा" चा वास असतो.


८) विडयाच्या पाना खाली "मृत्यूदेवते"चा वास असतो. या कारणाने ताम्बूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे.


९) विडयाच्या पानाच्या देठात 'अहंकार देवता' आणि 'दारिद्र्य लक्ष्मी' राहतात. म्हणून पान सेवन करतांना देठ काढून टाकायचे असते.

🙏👏👏👏🙏

रामायण Express

 रामायण Express 




मित्रांनो, 


अयोध्या म्हणजे हजारो मंदिरं, मठ, आश्रम (7-8 हजार) ह्यांची गढी आहे असं लोक सांगतात. प्रत्येकामागे काही ना काही कहाण्या गुंफलेल्या असतात. काही खर्‍या काही कपोलकल्पित, काही नव्याने पैसा कमावण्यासाठीही असतील ; वारंवार आक्रमण, विध्वंस, जाळपोळ, कत्तली ह्यामधूनही सत्याची बीजं मौखिक इतिहासातून (Oral history) पुढच्या पिढीकडे जात राहिली. जनमनात रुजली. जनजिह्वेवरून पुढच्या पिढीकडे हा इतिहासाचा तेजस्वी वारसा सरकत सरकत आज आपल्यापर्यंत पोचला तो काही उगीच नाही तर त्यात तथ्य होतं म्हणूनच. राईचा पर्वत व्हायला राई तर आवश्यक आहेच ना!  विक्रमादित्याने येथे हनुमानगढीसह 360 मंदिरं बांधली असं म्हणे स्कंद पुराणात आहे. 


                  औरंगजेबानी निर्दयपणे फोडली मंदिरं! जगात चार प्रकारचे लोक आहेत. भर्तृहरीच्या सांगण्याप्रमाणे  समाजात काही लोकं परोपकारी सज्जन असतात. काही स्वार्थी असले तरी त इतरांना विनाकारण त्रास देत नाहीत. मनुष्यांमधे राक्षसवृत्तीने राहणारे स्वतःच्या स्वार्थासाठी दुसर्‍यांचं लुबाडायला मागेपुढे बघत नाहीत. पण ह्या तीन प्रकारच्या लोकांहून अजून एका वेगळ्या प्रकारचे, राक्षसांहूनही निंदनीय लोक आहेत.


''का निष्कारण मांडतीच न कळे उच्छाद काहीजण

जी जी गोष्ट असे जना हितकरी त्याचे करी भंजन ।

ना साधे हित, स्वार्थ ना घडतसे कल्याण त्यांचे कधी

ह्या वाह्यात जनांस काय म्हणणे ? विध्वंस वृत्ती कृती ।।


      असे हे चौथ्या प्रकारचे  हीनाहूनही हीन जन! त्यांना काय म्हणावे? जे स्वतः काहीही बांधू शकले नाहीत ते दुसर्‍यांच्या अजोड कलाकृती मात्र सातत्याने फोडत राहिले. ना त्यातून त्यांचे कल्याण झाले ना काही स्वहित  साधले. असो! 


                         रामायण लिहायचं काम जरी वाल्मिकींनी केलं तरी रामाचा पराक्रम जन हृदया हृदयात जागृत ठेवण्याचं काम हे असंख्य सामान्य जनांचंच!  ह्या सामान्य वाटणार्‍या लोकांवर  अनेकांनी अत्याचार केले. अत्याचाराखाली भरडत राहिले हे भारतीय! अत्याचारी अतिरेक्यांची नावं बदलत गेली कधी मुसलमान मुघल तर कधी डच, ब्रिटिश! कधी आपलेच!

 पण! ------


यातनाओं से किसी की भावनाएँ कब मिटी हैं? 

कठिन दुर्गम शृंग से क्या प्रबल सरिताएँ रुकी हैं?

आणि ---!


                              अवधच्या नबाबाकडून बैराग्यांच्या सेनेने हनुमानगढी परत जिंकून घेतली आणि त्यावर हनुमान मंदिर उभारलं. हनुमान मंदिराखाली मशिदीचे अवशेष आहेत म्हणून अनेकवेळा ती पाडण्याचे प्रयत्न झाले पण ते अयशस्वी ठरले. अयोध्यावासीयांच्या मुखातून आलेला इतिहास आज मी तुमच्यापर्यंत पोचवला.


              हनुमान गढी मंदिर ----हिंदूंचं श्रद्धास्थान!  श्रीरामप्रभु व सीतामाई लंकाविजयानंतर अयोध्येस आले. त्यांच्यासोबत हनुमानही आले. हनुमानास राहण्यासाठी रामाने जी जागा दिली ती हनुमागढी. तेथेच एका गुफेत मारुती रहात असे व रामकोटाचं रक्षण करत असे. रामाने शरयूत आत्मसमर्पण करताना हनुमानास अयोध्येच्या राज्याची जबाबदारी सोपवली. अयोध्येचे लोक अजूनही हनुमानाला सध्याचा अयोध्येचा राजा मानतात. हा रामभक्त आजही कुठल्याही क्षणी तेथेच असतो अशी त्यांची श्रद्धा!


                   दक्षिणेवर विजय मिळवून आले म्हणून मंदिर दक्षिणाभिमुख आहे. लंकेशावर अलौकिक विजय मिळवून रामसैन्य परत येत आहे हे सर्वांना कळण्यासाठी अनेक ध्वजा फडकवत हर्षोल्लासाने आलेल्या सैन्याच्या सार्‍या ध्वजा ह्या ठिकाणी उभारल्या गेल्या म्हणून येथे आजही अनेक ध्वज फडकत असतात. लंकेवर विजयाचे चिह्नस्वरूप 8 मि. लांब आणि 4 मि. रुंद असा भव्य ध्वज आजही तेथे फडकत असतो. रामाचे दर्शन घेण्यापूर्वी ह्या रामभक्ताचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. प्रभु रामांनंतर अयोध्या परत वसवायचं काम विक्रमादित्यानी केलं.


                    हातात असलेल्या थोडक्या वेळात रामलला आधी भेटण्यास ह्या रामभक्ताची ना नसावी.  रामललाला भेटून हनुमानगढीची गर्दी भेदून हनुमानाचं दर्शन दिलेल्या वेळात अशक्य वाटत असेल तर आपल्याकडे कळसदर्शनही तेवढेच पवित्र आहे.


                     शरयूही पहायची होती. हनुमानगढी पाहताना त्याच्या समोर असलेल्या एका उंच्या पुर्‍या भव्य मंदिरावर नजर सतत जात होती. जुनं देऊळ असावं. पण मूळ बांधकाम खणखणित होतं. त्याचा भव्यपणा झाकला जात नव्हता. प्रचंड गर्दीत सर्वांकडून दुर्लक्षित  असलेलं त्याचं धीर गंभीर अबोलपण खूप काही बोलून जात होतं.  त्याचा भला मोठा घुमट मनात कायमचा वस्तीला आला. झाडं उगवली होती त्याच्यावर. अनेकांना विचारून कोणाकडून समाधानकारक उत्तर येत नव्हतं.  शेवटी एका दुकानदाराने सांगितलं, ‘‘वो तो रामजी का दरबार हैं । अब वहाँ कोई मूर्ती नहीं हैं ।’’ ऐकताना मन खिन्न झालं. 


                 हातात फोन/ कॅमेरा नसल्याने त्या भव्य दुर्लक्षित मंदिराचा फोटो घेता आला नाही त्याचं मात्र वाईट वाटलं. राममंदिरानंतर त्याचंही नूतनीकरण होणार असल्याचं तेथील लोक बोलत होते. जखमेवर फुंकर वाटली ती. अयोध्येत रामाचं बालपण गेलं म्हणून रामलल्ला पाहिजेच पण ज्या अयोध्येत राम जानकीला घेऊन आले तेथे रामासोबत वामांगी सीतामाई हवीच. लक्ष्मण धनुष्य घेऊन श्रीरामाच्या उजव्या बाजूस सज्ज हवा. मागे चवरी व अब्दागिरी घेऊन भरत शत्रुघ्नही! पायाशी निष्ठावंत मारुतराय आणि समोर सज्जनांचा दरबारही हवाच. ह्या सर्वांच्याशिवाय श्रीरामांसही पूर्णत्व नाही. माझ्या मनातील एक छोटी सल बाहेर आली. माझ्या  आणि जनमनातील रामपंचायतनाची स्थापना मनानेच त्या भव्य मंदिराच्या गाभार्‍यात करून शरय़ू आरतीला त्या जनसागरात सामील झालो.


                 एकदा का ब्रह्म प्राप्ती झाली की मनाची चलबिचल शांत होते. मनात कोणतेही किंतु, परंतुचे भोवरे उमटत नाहीत. एखाद्या खोल, शांत जलाशयासरखं मन शांत शांत होतं. श्रीरामप्रभुंच्या सहवासात शरयूलाही हीच रामबाधा झाली की काय न कळे. घाटाच्या पायरीवर बसून तिचा प्रवाह न्याहाळण्यासारखं सौख्य नाही. मनातील सारे विचार ती धुवून नेते.  गंगा यमुनेच्या कौतुकात थोडी मागे पडलेली शरयू तितकीच सुंदर आहे.  वेग आहे पण जाणवत नाही. लाटा आहेत पण त्याच्यातील कमालीची शांतता भंग पावत नाही. लोकांनी काठावर बुड्या मारून वा फुलं टाकूनही तिच्या भव्य पात्राची अमल-विमलता कमी झालेली नाही. नावा प्रवाशाना दुसर्‍या काठावर घेऊन जात आहेत. नावेच्या मागे उमटणार्‍या < ह्या खुणेच्या लाटा परत संथपणे पाण्यात सामावल्या जात आहेत! आपोआप!! (आप म्हणजे पाणी.) जळी जळ मिसळावे तसे मनही शरयूत मिसळून जात होतं. समोरच कोणी भल्यामोठ्या आरत्यांमधे वाती लावण्यात , कोणी शरयूच्या छोट्या मूर्तीला सजवण्यात, कोणी वेगवेगळी देवगीते लाऊडस्पीकरवरून लावण्यात, लहान मुले त्यावर नाचण्यात, कोणी झांजांचे वाटप अशा कामात गढून गेलेले. भास्कराने निरोप घेतला. त्या गूढ जललतिकेचे बदलते रंग बघतांना समोरच्या गडबडीचा त्रास होत नव्हता पण आपण लोक फारच आवाजी आहोत. काही गोष्टी शांतपणे केल्या तर -----! दुसर्‍यांच्या श्रद्धेला बाध नाही आणत. अशा वेळी माझ्यापुरता  माझ्या मनातील  शांत वाहणार्‍या जललतेचा कॅनव्हास मी माझ्यापुरता उघडून बसते. मोठ्या मोठ्या झांजांच्या आवाजात आरती सुरू झाली आणि संपली. झांझावाती आरतीनंतर अंधारात बस शोधण, तिच्यापर्यंत पोचणं हे आवश्यक कार्य होतं. 


                  रामललाचं दर्शन इतकं समाधान देऊन गेलं की,  कनक महाल आणि बाकीची स्थळे पाहिलीच पाहिजेत असं वाटलं नाही. कनक महाल हा कैकयीने सीतेला विवाहानंतर बक्षिस दिेलेला महाल. श्रीराम व सीता ह्याच महालात राहत असं म्हणतात. नदी वाहत असते. प्रत्येकानी आपल्या ओंजळीत येईल तेवढे पाणी प्यावे. जेवढं पहायला मिळालं त्यावर मन समाधानी होतं. जातांना हनुमानगढीसमोरील भव्य मंदिर रामदरबार न कळत माझ्या सोबत कायमचा आला. 


                               उद्या परत पहाटेच शरयू भेटीचा आनंद मिळणार होता. कोणी पहाटेच गुप्तार घाटावर जाणार होते. शरयूवरील लक्ष्मण घाट, जटाय़ू घाट, अहिल्याबाई घाट, धौरहरा घाट, जानकी घाट अशा 51 घाटांपैकी गुप्तारघाट अत्यंत नयनरम्य! हिरवीगार झाडी, पांढर्‍या मऊशार वाळूचे किनारे, मंदिरांची किनार!---- श्रीरामांनी येथेच जलसमाधी घेतली. अयोध्येला गेला तर हा घाट नक्की बघावा. फार कमी जणांना माहित असलेली गोष्ट म्हणजे तेथे बाबा की समाधी  म्हणून एक समाधीस्थळ आहे ती खरोखरची नेताजी सुभाषचंद्र बोसांची समाधी आहे. शेवटचे काही दिवस सुभाषबाबू वेश पालटून गुप्तपणे तेथे राहत होते. असं  तेथील  स्थानिकांचं म्हणणं आहे.   

🌷🌿🌷🌿🌷🌿🌷

#लेखणीअरुंधतीची

Tuesday, June 25, 2024

नाम

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*जो नाम घेतो त्याच्या मागे राम येतो*


 *राम व त्याचे नाम हे एकरुप आहे ते जो घेईल त्याच्यामागे राम येइल नव्हे रामाला यावेच लागेल.* 


*श्रीराम जयराम जय जय राम

*हे नाम भक्तशिरोमणी हनुमंत रायांनी सतत घेतले व राम त्यांच्या ह्रदयात विराजमान झाला. हेचं नाम समर्थ रामदास स्वामीनी घेतले व रामाने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले. या नामाच्या जपाने वाल्या कोळीचा महर्षी वाल्मिकी झाला. तेच नाम संत तुलसीदास, ब्रह्मचैतन्य महाराज, 

ब्रह्मानंद महाराज, प्रल्हाद महाराज यांनी अहोरात्र घेतले व ते नाममय झाले. त्यामुळे राम त्यांचे जीवनाच्या अविभाज्य भाग झाला. "रामा तुझे कोमल नाम घेता, संतोष वाटे बहु फार चित्ता" अशी त्यांची अवस्था झाली. "नाम घ्यावे, गावे भावे, जनासी सांगावे, हाचि सुबोध गुरुंचा, नामापरते सत्य न मानावे" असे हे अमृतासारखे गोड नाम आपण गुरुकृपेने घेतले तर राम आपल्याही मागे येईल. यांचे प्रमाण समर्थानी दिले आहे "जप संख्या होता तेरा कोटी, प्रत्यक्ष भेटतील राम जगजेठी". त्यासाठी सद्गुरु कृपेची आस व नाम साधनेची कास भक्तीने धरावयास हवी.*

 *जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला."*


*श्रीराम जयराम जय जय राम*

विठोबा

 एकदा पुंडलिक नावाचा तरुण काशीच्या प्रवासाला निघाला होता, तो जंगलातून जात असताना त्याचा रस्ता चुकला, तेव्हा त्याला वाटेवर एक आश्रम दिसलं… ते आश्रम एका कुकुटस्वामीचे होते... आश्रमात पोहोचल्यानंतर पुंडलिकाने महर्षी कुक्कुटांना काशीला जाण्याचा मार्ग विचारला.

 

तेव्हा ऋषींनी सांगितले की आजपर्यंत ते कधी काशीला गेले नाही आणि त्यामुळे त्यांना मार्गही माहीत नाही, हे ऐकून पुंडलिक ऋषींची खिल्ली उडवत म्हणाला, “तुम्ही कसले ऋषी आहात??, जे स्वतःला ऋषी समजता आणि एकदाही काशीलाही गेले नाही.'' कुक्कुट ऋषीची खिल्ली उडवून पुंडलिक पुढच्या प्रवासाला निघाला.


पुंडलिक आश्रमापासून थोड्याच अंतरावर गेला असताना त्याला काही स्त्रियांचा आवाज ऐकू आला. आवाज कुठून येत होता... हे इकडे तिकडे बघितल्यावर त्याला कळले की आवाज आश्रमातूनच येत आहे, आश्रमात एकही बाई नव्हती… म्हणून तो पुन्हा आश्चर्यचकित होऊन आश्रमाच्या दिशेने निघाला…जेव्हा तो आश्रमात पोहोचला तेव्हा त्याला दिसले की 3 स्त्रिया पाण्याने आश्रमाची स्वच्छता करत आहेत, जेव्हा त्याने त्यांना विचारले तेव्हा त्याला कळले की त्या तीन स्त्रिया आई गंगा, आई सरस्वती आणि आई यमुना आहेत.

 

पुंडलिक आश्चर्याने स्तब्ध झाला… काशीचे दर्शन सोडा तेथे जाण्याचा मार्गही माहित नसणार्‍या ऋषींच्या आश्रमाचे पावित्र्य हे तिघे कसे राखत आहेत. तेव्हा आई गंगा, यमुना आणि सरस्वती यांनी त्याला सांगितले की "मनात पवित्रता आणि पूज्यता असल्यावर आपण पवित्र स्थळांना भेटी द्याव्यात किंवा कर्मकांड करावेत, हे आवश्यक नाही.''


 

''कुक्कुट ऋषींनी आपल्या जीवनात पवित्र चित्ताने आपल्या आई-वडिलांची सेवा केली आहे. त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पित केले आहे. आणि म्हणूनच त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढी योग्यता प्राप्त झाली आहे.” 

 

पुंडलिक आपल्या वृद्ध आई-वडिलांना सोडून काशीसाठी निघाला होता, यामुळे त्याचे डोळे उघडले कारण त्याने आपल्या आई-वडिलांची त्यांना काशीत घेऊन जाण्याची विनंती पूर्ण केली नव्हती आणि स्वत: मोक्षासाठी भटकत होता. तो घरी आपल्या आई-वडिलांकडे परतला आणि त्याने त्याच्या पालकांना काशीत आणले. 

 

या घटनेनंतर पुंडलिकचं आयुष्यच बदलून गेलं... आता त्यांचा जीव आईवडिलांच्या सेवेत जात असे. पुंडलिकाची मातृ-पितृभक्ती इतकी अमर्याद होती की एकदा भगवान श्रीकृष्णालाही पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह झाला. 


भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी पोहोचले तेव्हा पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करत होता. देव आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेला पाहून त्याला खूप आनंद झाला, पण त्याचे मन जराही विचलित झाले नाही, त्याने आपल्या जवळ पडलेली एक वीट देवाला उभं राहण्यासाठी दिली आणि तो आपल्या आई-वडिलांच्या सेवेत लीन झाला.

 

आई-वडिलांची सेवा केल्यानंतर पुंडलिक भगवान श्रीकृष्णांसमोर गेला आणि त्यांच्याकडे क्षमा मागितली, त्यांची मातृ-पितृ भक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी पुंडलिकाला वरदान मागायला सांगितले.

 

पुंडलिक म्हणाला, "देव स्वत: माझी प्रतिक्षा करतात तेव्हा मी आणखी काय मागू ?" पण भगवान श्रीकृष्णांनी आग्रह केला, तेव्हा पुंडलिक म्हणाले की, "तुम्ही पृथ्वीवर राहा आणि भक्तांची काळजी घ्या, तुमच्या भक्तांवर तुमची सावली असू द्या" तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण तेथे निवास करण्यास राजी झाले आणि ती जागा म्हणजे पंढरपूर.

 

आपण विठोबा म्हणून ओळखले जाऊ असे त्यांनी सांगितले. विठोबाचा अर्थ "विटेवरी उभा देव" असाही आहे. पंढरपुरात असलेली विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू आहे, ती कोणत्याही शिल्पकाराने कोरलेली नसून ती अस्तित्वातच त्याच आकारात आली आहे.


!! श्री महाराज !!


!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!


          !! श्रीराम समर्थ!!

चिंतन

 चिंतन

          श्रीराम,

     मी बरोबरच आहे.. मी चुकतच नाही असा अहंकार स्वतःच्या चुका शोधू देत नाही. कोणी चुक दाखवली तर आपणच कसे बरोबर आहोत, हे सांगण्यासाठी वाद-भांडण सुरू करतात.

              समर्थ म्हणतात - अहंता गुणे वाद नाना विकारी |तुटे वाद संवाद तो हितकारी ||

               हे  सर्व टाळून शांत, आनंदी, समाधानी, तृप्त जीवन जगायचे असेल तर माझ्यात अहंकार आहे हे आधी स्वतःच्या मनाला सांगावे लागते. मी काही अहंकारी नाही हे वाटणे हा देखील एक अहंकारच आहे.

               भक्तीमार्गावरून चालताना 'अहंकाराचा वारा न लागो मनाला' असं समजावलं की जगणं उज्जवल होतं. अहंकारात अहं म्हणजे'' मी 'प्रभावी असतो. व्यक्ती स्व भोवती फिरते तेव्हा अहंकार पोसला जातो. हा मी इतरांना तुच्छ मानू लागतो. मी' चं आपण होणं म्हणजे अहंकाराला थोडंसं दूर करणं. अहंकारावर विजय मिळवायचा असेल तर रामकर्ता हा जप सतत करावा. मी 'कोणीच नाही ही भावना असावी, असे आपले संत सांगतात. अहंचा त्याग केला की आपण सोऽहं च्या मार्गावरून जातो. 

                ||श्रीराम ||

Sunday, June 23, 2024

माहेर

 एक अतिशय भावुक सुंदर लेख मैत्रीच्या सुंदर नात्याला समर्पित......


 *# माहेर मैत्रीणीचे ...*


काल अगदी सकाळी एका मैत्रिणी चा फोन आला "मी आज दिवसभर तुझ्याकडे रहायला येतेय" आणि  सकाळी 9 वाजता  ती आली.  सकाळीच डबा करायचा असतो तेंव्हाच स्वयंपाक  होऊन जातो त्यामुळे ती आली तेंव्हा माझी  बरीच कामं होऊन मी गप्पा मारायला मोकळी झाले होते.  


ती येतेय म्हणून तीला आवडणारी  गरम थालिपिठं ,लोणी, मिरचीचे लोणचे ब्रेकफास्ट साठी तयार केले . थालिपिठं 1 घास खाल्ले आणि म्हणाली "अगदी माझी आई  करायची तसेच झालेत  ग" मस्करी, बडबड करत, गाणी ऐकत  ब्रेकफास्ट केला.  मग  सध्या काय वाचन चालू आहे पासून नवीन काय खरेदी केलीस असे  विचारत आधी तुझ्या  सुन्दर साड्या बघू दे  म्हणत साड्यांच्या कपाटाकडे मोर्चा वळवला  आणि  एक दिवस मी तुझ्या साड्या पळवून नेणार हे सांगून टाकलं. नातेवाईक , राजकारणी आणि राजकारण ,शिक्षण  ,सोशल मीडिया त्यावरचे  फ्रॉड  या सगळ्या वर पूर्ण अधिकार वाणी ने  तावातावाने मते मांडून झाली त्यातले कळते किती हा भाग सोडा 😃. 


मी इंस्टा वर नाही म्हणून फेसबुक वर active असते म्हणून मला 'तू आज के ज़माने की नहीं है "असे   नेहमीप्रमाणे चिडवून ,बघू नवीन काय लिहिले आहेस असे म्हणून फेसबुक उघडून माझ्या पोस्ट वाचत बसली तुझे बरेच पोस्ट छान असतात ग मला खूप आवडतात तुझे सर्व पोस्ट .


 आज तुझ्या झाडांना मी पाणी घालते असे म्हणत पाणी घालायला घेतले आणि  म्हणाली " काय जादू करता ग   माझ्या आई ची पण तुझ्या सारखीच सदा फुलांनी बहरलेली बाग असायची, माझ्याकडे नाही येत अशी इतकी फुलं "  तिची अखंड बडबड चालू असताना मला  मात्र कुठे तरी  तीच काही तरी बिनसले आहे असे वाटत होते. 


दुपारी तीला आवडते म्हणून daliya ची खिचडी , 2/3 प्रकारची फळे होतीच घरात  मग  fruit custard  केल ... जेवताना  मला काही तरी  जाणवलं  म्हणून उठून तिच्या जवळ जाऊन  तिच्या पाठीवर हात ठेवून  म्हंटलं  "आईची आठवण येतेय ना "  हे ऐकल  आणि मला मिठी मारून तीने इतका वेळ अडवलेल्या डोळ्यातील पाण्याला वाट करून दिली.  


शांत झाल्यावर म्हणाली " आधी  बाबा  गेले  आणि  3 वर्ष झाली आई  गेली , दादा  अमेरिकेत .. 

1 दिवस  कुठल्याही  जबाबदारी शिवाय  लहान होऊन  जगावं  ते माहेर राहिलेच नाही ग ... काल पासून अस्वस्थ होते मग  म्हंटलं  मैत्रीण आहे ना  ... 

आणि बघ  आई कडे गेल्यावर आई माझ्या आवडीचे जे पदार्थ करायची  त्यातले पदार्थ केलेस  ... मी  मस्त लोळून tv पाहिला  , insta  वर टाईमपास केला  ..  गाणी ऐकत गप्पा मारल्या ... आणि विशेष म्हणजे मी  डिस्टर्ब आहे  आणि कशाने डिस्टर्ब आहे हे तू ओळखलेस , आणि  आता  मनातले  दुःख बोलून  मन हल्का हो गया मेरा. तुझ्याकडे मी 1 दिवसाच  माहेरपण enjoy केलं . 


एक दोन दिवस राहा बोलली तरी ऐकले नाही माझे

 खूप हट्टी अगदी लहानपणापासून च 

 संध्याकाळी घरी जातांना मला एक घट्ट मिठी मारली आणि अश्रू नकळतपणे डोळ्यात तरंगत होते दोघीच्या ही    माहेरी म्हणून माझ्याकडे आलेली माझी माहेरवाशीण मैत्रिण आनंदाने घरी गेली. 


वय कितीही असू द्या,  घरी कितीही मोकळ वातावरण ,ऐश्वर्य असू द्या पण  माहेरी जो आनंद, समाधान मिळते त्याची सर कुठल्याही ऐश्वर्या ला  नाही हेच खरं  💞

Saturday, June 22, 2024

न मम'

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*




*'मना'ला उलटे केले की 'नाम' हा शब्द तयार होतो. याचा अर्थ असा की, नाम घेणे म्हणजे मनाची विषयाकडे असलेली ओढ उलटी फिरविणे. नाम म्हणजेच 'न मम'. प्रपंच माझा नाही म्हणून करणे म्हणजेच नाम घेणे. मी जितकी प्रपंचाची काळजी घेतो तितकी नामाची घेतो का, याचा प्रत्येकाने विचार करावा.

 प्रपंचातले आपले कर्तव्य अगदी मनापासून केल्यावर, जी परिस्थिती निर्माण होईल तिच्यामध्ये अत्यंत समाधानाने राहून नामस्मरणात काळ घालवावा.*


 *🪷 श्रीमहाराज 🪷*

Friday, June 21, 2024

मानसहोळी

 ।। मानसहोळी ।। संत जनाबाई यांची!


कराया साजरा । होलिकेचा सण ।

मनाचे स्थान । निवडीले ।।


ऐसे ते स्थान । साधने सरावले ।

भक्तीने शिंपिले । केले सिद्ध ।।


त्या स्थानी खळगा। समर्पणाचा केला।

त्यात उभा ठेला । अहंकार एरंड ।।


रचलीया तेथे। लाकडे वासनांची ।

इंद्रीयगोवऱ्याची। रास भली ।।


गुरुकृपा तैल । रामनाम घृत ।

अर्पिले तयात । ऐसे केले ।।


रेखिली भोवती । सत्त्कर्म रांगोळी ।

भावरंगाचे मेळी । शोभिवंत ।।


वैराग्य अग्नीसी । तयाते स्थापिले । 

यज्ञरूप आले । झाली कृपा ।।


दिधली तयाते। विषय पक्वान्नाहुती ।

आणिक पुर्णाहूती । षड्रिपु श्रीफळ।।


झाले सर्व हुत । वैराग्य अग्नीत ।

जाणावया तेथ । नूरले काही ।।


वाळ्या म्हणे जनी । 

व्हावी ऐसी होळी ।।

जेणे मुक्तीची दिवाळी।

अखंडित ।। 🙏🙏🙏



Thursday, June 20, 2024

समाधान

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*




*प्रपंच  हा  परमार्थाला  साधन  म्हणून  वापरावा .*


आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे, आणि ते मिळण्यासाठी भगवंताचे प्रेम आम्हांला लागणे जरूर आहे. ते प्रेम आपल्याला कसे मिळेल याचा आपण विचार करू. वास्तविक, आईचे तिच्या मुलावरचे प्रेम स्वाभाविक असते, तिला मुलावर प्रेम कर म्हणून शिकविण्याची जरूरी नसते; त्याप्रमाणे भगवंतावर आपले प्रेम असणे जरूर आहे. मनुष्यजन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे.

 ईश्वराने एवढी सृष्टी निर्माण केली, पण मनुष्यदेह निर्माण केल्यावर त्याला फार आनंद झाला. त्याला वाटले, खरोखर या योनीमध्ये जन्म घेणाऱ्याला माझे प्रेम मिळविता येऊन मला ओळखता येईल. असे असताना मनुष्यप्राण्याला भगवंताचे प्रेम स्वाभाविक का बरे असू नये ? मनुष्यप्राणी हा नेहमी आनंदासाठी धडपडत असतो; मग या धडपडीतून भगवंताचे प्रेम त्याला का बरे येऊ नये ? 

मला वाटते, ज्या ध्येयासाठी आपण ते ध्येय ठरविताना आम्ही चुकत असलो पाहिजे खास. आमचे ध्येय असे असले पाहिजे की, त्यातून आम्हांला शाश्वत आनंद मिळविता आला पाहिजे. तो आनंद जर एवढया कष्टाने, मेहनतीनेसुद्धा आम्हांला मिळत नसेल, तर आमचे ध्येयच चुकले असे म्हणायला कोणती अडचण आहे ? तुम्ही सांगा. 

आज प्रपंच आम्हांला हवासा वाटतो, प्रपंचातल्या नाना तऱ्हेच्या गोष्टी आम्हांला सुख देतील असे वाटत असते, आणि त्या मिळविण्यासाठी आम्ही अहर्निश झटत असतो. वस्तूसाठी चाललेली आमची धडपड ही खरे पाहता त्या वस्तूसाठी नसून, त्यातून मला आनंद मिळेल या कल्पनेने, त्या आनंदासाठी, आम्हांला ती वस्तू हवी असते. 

त्या वस्तूत मला समाधान मिळेल ही कल्पना नाहीशी व्हायला पाहिजे. आज प्रपंचात मला समाधान मिळेल असे वाटते; ती माझी कल्पना नाहीशी होणे जरूर आहे. ही प्रपंचाची आस जोपर्यंत आहे तोवर भगवंताचे दास आम्हांला होता येणार नाही, आणि शाश्वत समाधान आम्हांला मिळणार नाही. "तूं जगाची आस सोडून दे, मी तुला शाश्वत आनंद देतो, " असे भगवंत आम्हांस सांगत आहे. ही जगाची आस, हे प्रपंचाचे प्रेम, आम्हांला कसे सुटेल ? प्रपंच सोडल्याशिवाय भगवंताचे प्रेम आम्हांला येणारच नाही का ? 

प्रपंच सोडून देण्याची आज आमची तयारी नाही. तो न सोडता भगवंताचे कसे होता येईल, ह्यासाठी संतांनी मार्ग सांगितला आहे. त्या मार्गाने आम्ही जाणे जरूर आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या या खिशातील पैसे त्या खिशामध्ये ठेवतो, त्याचप्रमाणे प्रपंचातील आपले मन आपण काढून भगवंताकडे लावावे.

 तसे करण्यात समाधान आहे. भगवंताला अशी प्रार्थना करावी कीं, " देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. "


*८४ .   दिवा  जळायला  हवा  असेल  तर  त्यामध्ये  सतत  तेल  घातले  पाहिजे ,  तसे  भगवंताचे  अनुसंधान  सारखे  राहण्यासाठी  त्याचे  नामस्मरण  आपण  सतत  करीत  असावे .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Wednesday, June 19, 2024

सत्संगती

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩* 



*सत्संगतीचे  दोन  प्रकार .*


सत्संगती अती अपूर्व काम करणारी आहे. संतांची संगत दोन प्रकारे होऊ शकते. एक, संतांच्या देहाची; दुसरी, संतांनी सांगितलेले साधन करीत राहण्याची. ह्यांपैकी पहिली, म्हणजे संताच्या देहाची संगती लाभणे फार कठीण आणि दुर्मिळ. कारण संत जरी खरा असला तरी त्याला ओळखणे कठीण असते, आणि पुष्कळदा त्याच्या बाह्य वागणूकीवरून मनात विकल्प येण्याचा संभव असतो; आणि एखाद्या भोंदूशीच गाठ पडली तर त्याच्या संगतीपासून नुकसान हे ठरलेलेच. म्हणून पहिला, म्हणजे संताच्या देहाच्या संगतीचा मार्ग, हा पुष्कळदा धोक्याचा ठरण्याचा संभव असतो. दुसर्‍या मार्गाने जाण्यात, म्हणजे त्याने सांगितलेले साधन करण्यात, बिलकूल धोका नसतो; कारण खरा संत काय किंवा भोंदू साधू काय, कोणीही झाला तरी तो दुसर्‍याला सांगताना खरे आणि बरोबर असेल तेच सांगेल. तो भोंदू असला तरी, आपला भोंदूपणा लपविण्याकरिता, जे बरोबर असेल तेच सांगणे त्याला जरूर असते. साधकाने शुध्द भावनेने ते साधन केले की सत्संगतीचा फायदा मिळून त्याचे काम होते. खर्‍या संताच्या देहाच्या संगतीचा लाभ जर दैववशात्‌ प्राप्त झाला तर मात्र काम बेमालूम होते. त्या वाहनाचा वेग हा आपला वेग होतो; फक्त त्या वाहनात निश्चल बसून राहणे एवढेच आपले काम असते. तसे आपण खर्‍या संताजवळ नुसते पडून राहावे. संताच्या संगतीत आपली कृती अशी काहीच नसते, नुसते अस्तित्त्व असते. त्यामुळे अहंकाराला वाव न राहून वासनेचा क्षय व्हायला फार मदत होते. तुकाराम महाराजांनी देवाजवळ धनसंपदा मागितली नाही, मुक्तीदेखील नको असे म्हटले, फक्त संतसंगती दे असे म्हटले.


संतसंगाने नाम घेण्याची बुद्धी येते. बुद्धीची स्थिरता ठेवणे हे फक्त नामानेच साधेल. नाम जरूर तेवढे ठेवते आणि बाकीचे नष्ट करून टाकते. आपण अनन्यभावाने नाम घ्यावे. नाम घेता घेता बुद्धीला स्थिरता येते; आणि मग मनात विकल्प न येता संतांच्या देहाच्या संगतीचा खरा फायदा घेता येतो. सत्संगतीत कष्टाशिवाय ईश्वरप्राप्ती होते. संतसंगतीत साधने आपोआप होत असतात. त्यांच्या पूजनाबरोबर पूजन, भजनाबरोबर भजन, श्रवणाबरोबर श्रवण, स्मरणाबरोबर स्मरण आपोआप होते. सत्संगतीत स्वतःची विस्मृती होते आणि नामस्मरण घडते. म्हणून प्रयत्‍नाने संतसंगती करावी. तिथे प्रारब्ध आणू नये. सत्संगतीत राहून नाम घेतले तर देहबुद्धीच्या कोंडीतून बाहेर पडता येते.


*९३ .   संतांना  जे  आवडते  ते  आपल्याला  आवडणे  म्हणजे  त्यांचा  समागम  करणे  होय .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

प्रयत्‍न

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*


*स्वतःला  सुधारण्याचा  प्रयत्‍न  करावा .*


वास्तविक काही न करणे, आपण काही करतो आहोत किंवा आपल्याला काही करायचे आहे असे न वाटणे हाच परमार्थ. देहाने, मनाने एकसारखी चळवळ करायची आपल्याला सवय लागली आहे. देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण, मनाला स्वस्थ बसायला लावणे त्यापेक्षा कठीण, आणि देहाने कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसविणे हे अत्यंत कठीण. मनाला खरे म्हणजे स्वास्थ्य हवे; पण ते मिळविण्याकरता साधन, म्हणजे प्रयत्‍न करणे जरूर आहे. मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणे तीन, एक आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे; दोन, मागच्या बर्‍यावाईट कर्मांची आठवण होणे; आणि तीन, उद्याची काळजी लागणे. आता, जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार, मग सर्व तुमच्या इच्छेप्रमाणे कसे चालतील ? तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच. तेव्हा स्वास्थ्य बिघडू न देण्यासाठी, आपली इच्छाच नाहीशी करावी; अमुक गोष्ट मिळावी ही बुद्धीच नाही ठेवू; हाव सोडावी, लोकांची आस सोडावी; जे काही होते ते 'रामाच्या इच्छेने झाले' म्हणावे. प्रत्येक गोष्ट 'रामाने केली' म्हणणे, म्हणजे अखंड भगवंताच्या अनुसंधानात रहणे.


आपला अहंपणा किती खोल गेला आहे पाहा ! समोर दिसत असलेल्या गोष्टीकडे बेमालून डोळेझाक करून, आपण आपल्या दोषांचे खापर बिनदिक्कत दुसर्‍यावर फोडायला तयार होतो. अमक्या तमक्याच्या नादाने आपला मुलगा बिघडला असे आपण म्हणतो, कारण आपलाच मुलगा खराब हे म्हणवत नाही ! ते म्हणण्याची लाज वाटते, म्हणून दुसर्‍याच्या मुलाला आपण वाईट म्हणतो. आपला मुलगा आपल्या डोळ्यादेखत संगतीच्या योगाने एवढा बिघडतो, तर मग संगतीचा परिणाम केवढा असला पाहिजे ! संगतीचा परिणाम जर एवढा मोठा आहे, तर संतसंगतीत असताना आपल्यात सुधारणा का दिसू नये ? संतसंगतीने मग आपण निश्चित सुधारायला पाहिजे ! पण तसे तर दिसत नाही; मग नडते कुठे ? याचे मुख्य कारण म्हणजे, आपण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्‍नच करीत नाही. आपल्याला सर्व समजते, परंतु प्रयत्‍न करायला नको ! वासनेच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्‍न करीत नाही. त्यामुळे वासनेतच आपण जन्माला येतो, आणि वासनेतच आपला अंत होतो. याकरिता एकच खात्रीचा उपाय आहे, आणि तो म्हणजे भगवंताला अनन्यभावाने शरण जाणे. "रामा, तुझ्यावाचून माझी यातून सुटका नाही. तू ठेवशील त्यात मी आनंद मानीन. तुझे प्रेम मला लागू दे," असे कळकळीने रामाला सांगावे, आणि सदैव त्याचे नाम हृदयात ठेवावे. तो उदार परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री बाळगा.


*१३४ .   वासना  मारायला  भगवंताचे  अधिष्ठान  हा  एकच  उपाय  आहे .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Monday, June 17, 2024

वैराग्य

 श्रीराम समर्थ


         विवेकातून वैराग्य आले तरच त्या विवेकाचे महत्व. असे वैराग्य आले की नामात गोडी वाटू लागेल. *विवेकाचे इंजिन चालण्यासाठी त्याला भावनेची, तळमळीची वाफ पाहिजे असे श्रीमहाराज म्हणत.* तळमळ हे परमार्थाचे मर्म आहे कारण त्यातून शरणागती येते. पण हे सर्व गुरुकृपेने होते. तुम्ही म्हणाल, असे जर आहे तर आपल्या प्रयत्नांना काही अर्थ आहे की नाही ? प्रयत्नांना निश्चित महत्व आहे कारण *प्रयत्न केल्यानंतरच प्रयत्नाने काही होत नाही हे समजून येईल.* आधी प्रयत्न, त्यातून शरणागती व मग गुरुकृपा. प्रयत्नांती परमेश्वर खरेच आहे. आज प्रयत्न करणे येवढेच आपल्या हातात आहे. *खरोखर सगुणाचे महत्व पटणे व त्याविषयी प्रेम वाटणे कठीण आहे. वामनपंडितांना सगुणाचे महत्व पटवून देताना समर्थांनी शेवटी हनुमानाचे रूप धारण केले तेव्हा कोठे त्यांचा सगुणावर विश्वास बसला !*


               ---------- *प्रा के वि [पू बाबा] बेलसरे.*


               *********


Sunday, June 16, 2024

शरणागती

 *शरणागतीत अपेक्षेला स्थान नाही.*


*ll श्रीराम जयराम जय जय राम ll*


शरण जाणे किंवा शरणागत होणे ही क्रिया मुळीच कठीण नाही. किंबहुना ह्यासारखे परमार्थात सोपे काही नाही. पण खरी परीक्षा शरण गेल्यानंतर सुरु होते. तो प्रवास खडतर असतो.


मी आजपासून शरणागत झालो असे ह्या क्रियेस काळात, वेळेत बांधता येत नाही. शरणागत झालो म्हणजे माझे सगळे प्रोब्लेम्स, संकटे एकामागोमाग पटापट सुटणार. कारण आता मला चिंता करायची गरजच नाही. माझा सद्गुरुच मला ह्यातून बाहेर काढणार. ही प्रवृत्ती बरेचदा आढळते. वरील सर्व वाक्यात आपल्याला जाणवेल एक आणि बऱ्याच अपेक्षांचा जन्म झालाय. एका गोष्टींची कृपया गाठ बाधून ठेवा. शरणागतीत अपेक्षेला स्थान नाही.


शरणागती ही क्रिया नाही. ते काम नाही. ती मनाची एक स्थिती असते. ज्यात आपण स्वतःला विसरून, आपल्या सद्गुरूस स्वतःला अर्पण करतो. मग अर्पण केलेल्या गोष्टीचे काय करायचे हे सद्गुरु ठरवतो आणि जे तो ठरवेल ते चांगले ही भावना जोपासणे म्हणजे थोडक्यात शरणागतीची पहिली पायरी म्हणता येईल.


देवाला श्रद्धापूर्वक भजावे. चांगले आचरण, प्रयत्न, देवावर विश्वास ठेवावा. देव माझा मी देवाचा ही भावना सतत बाळगावी.


*ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे त्याच्या मुखात नाम येते. अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात.*


!! श्री महाराज !!


!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!


          !! श्रीराम समर्थ!!

Friday, June 14, 2024

उपदेश

 पू.श्री.गुरुदेव रानडे कधी कधी सहसजपणे एखादे वाक्य उच्चारीत. "सहज बोलणे हित उपदेश | करुनी सायास शिकविती ||" अशा पद्धतीचे बोलणे असे. जरी ते  सहज असले तरी त्याचा साधकांवर परिणाम होत असे.  अनेकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळत असत. एकदा श्री.वामन ना. कुलकर्णी , गुरुदेवांचे शिष्य परमार्थ बैठकीत त्यांच्या समोर बसले होते. ते कसल्यातरी विचारात होते त्यामुळे त्यांचे नेमात जपात लक्ष नव्हते. 

अन्यथा त्यांच्या समोर बसल्यास नेमात लक्ष जात असे. गुरुदेव त्यांच्या जवळ जाऊन म्हणाले ' काय महाराज ?' त्यांना काय बोलावे ते कळेना. ते हात  जोडून त्यांना म्हणाले "ठिक आहे." श्री.गुरुदेवांना सगळीकडे महाराजच दिसत असत. ते सतत सद्गुरूंच्या अनुसंधानात असत. त्यामुळे त्यांनी त्यांना महाराज म्हटले असावेत असे वाटले. एक दिवस परमार्थ बैठकीच्या वेळी काही साधक मंडळी त्यांची वाट बघत बसली होती.

 समोर श्री.भाऊसाहेब महाराज उमदिकरांचा फोटो होता. तेवढ्यात श्री.गुरुदेव आले येऊन बसले व श्री.महाराजांच्या फोटोकडे हात दाखवून म्हणाले "कोणाला काय हवे असेल ते  मागा. प्रत्यक्ष श्री.महाराज आले आहेत."

 त्यांचा बोलण्याचा आवेश व आत्मविश्वास एवढा जबरदस्त होता की कोणाला काही मागण्याचे सुचले नाही. त्यादिवशी गुरुदेव महाराजमय झाले होते.

Thursday, June 13, 2024

मन

 चिंतन 

          श्रीराम,

  हा जो शून्य अंतराचा, शून्य अंतरीचा प्रवास आहे, ह्यात सगळ्यात मोठी अडचण निर्माण करणारे मन आहे. हे मनच आहे जे अविद्येच्या बंधनातून मोकळे करते. हे मोकळे होणे म्हणजेच मोक्ष प्राप्त होणे. आपले संत सांगतात की सायुज्यता मुक्ती प्राप्त करण्यातच मिळालेल्या नरदेहाचे सार्थक आहे.

               आपण, आपल्याला जी मोकळीक हवी असते त्याला मोक्ष म्हणतो.. आणि आपल्या बुद्धीने आपल्याला जे हवे ते करत राहतो. संतांना हे अपेक्षित नाही. ते सांगतात की, जीवाला स्वतःच्या बुद्धीच्या गाढवावर बसून भवसागर कधीच पार करता येत नाही. कारण कोणत्या क्षणी तो गटांगळ्या खाईल आणि बुडेल हे त्याचे त्याला देखील समजणार नाही. म्हणून परमार्थाच्या अभ्यासात, मला काय वाटते हे महत्वाचे नसून संतांना काय अपेक्षित आहे.. सद्गुरूंना काय अपेक्षित आहे.. आणि त्यांच्या विचारांवर आपण साधना करत आहोत का? हे फार फार महत्वाचे असते.

                             ||श्रीराम |¦

साम्यावस्था

 श्रीगोंदवलेकर महाराज म्हणाले "माणसात द्वैत आहे" द्वैत म्हणजे दोन. आदी शंकराचार्य तर अद्वैत म्हणतात. मग हे द्वैत काय आहे ? श्रीगोंदवलेकर महाराज म्हणाले 

" द्वैत काय आहे तर एक थोरला मी आणि एक धाकटा मी" मुंडक उपनिषदांमध्ये एक मंत्र आहे. " द्वा सुपर्णा सयुजा सखाया." म्हणजे  दोन चांगले पंख असलेले पक्षी  एकत्र राहतात. ते सखे आहे . सखे म्हणजे हा आला की तो आला. ते दोघे एकच आहे. त्यांच्यात भेद नाही. उद्धव व अर्जुन हे कृष्ण परमात्म्याचे सखे आहेत. हे पक्षी सखे आहेत म्हणजे जीव आला की ईश्वर आला. त्याला शिव म्हटलेले आहे. एकाच झाडावर वर म्हणजे एकाच देहात दोघे राहतात. 

श्रीमहाराज म्हणाले की एक मोठा मी आहे एक धाकटा मी आहे. जीव आणि शिव. ईश्वराला जीवाची जरूर काय आहे ? यावर श्रीमहाराज म्हणाले " ईश्वर म्हणजे शासन करणारा, नियमन करणारा. तर जीव नसला तर नियमन कोणाचे करणार ?"  म्हणजे जीव आला की ईश्वर आलाच. जीव ईश्वराला केव्हा खरे मानतो तर साम्यावस्था झाली की.

 या आठांची, (पंचमहाभूत, मन बुद्धी अहंकार) साम्यावस्था म्हणजे " जे आहे ते उत्तम आहे. जे आहे ते पूर्ण आहे. याच्यापेक्षा चांगलं असणं शक्य नाही असं वाटलं पाहिजे." ही ती साम्यावस्था. म्हणजे बास तृप्ती. साम्य तेव्हाच येईल तृप्ती आली की. माझ्या मनाविरुद्ध झालं, दुःख आलं अपमान झाला तर मी काय शिकावं यांच्या पेक्षा चांगलं असणं शक्य नाही ही दृष्टी ठेवली ना तर कडू औषध माणूस बरं होण्यासाठी घेतो तसं होईल. 

मग सद्गुरूंना म्हणावे आपल्याला मला बनवायचे आहे तसे बनवा. मग मला दुःख द्या, आणखी द्या. पोलाद असत ना त्याला तापवल्याशिवाय ते वळत नाही. तसे आपण आहोत. आपल्याला तापवायला दु:खाशिवाय पर्याय नाही. आपण जरा तापलो की सुख मागतो.

श्रीब्रह्मचैतन्य

 


         श्रीब्रह्मचैतन्य म्हणजेच गोंदवलेकर महाराज स्वतःविषयीं कमी बोलत. पण आपल्या प्रेमांतील घरगुती मंडळी जवळ बसली असता कोणी प्रश्न विचारला तर स्वतःबद्दल माहिती सांगत.

प्रश्न -  *'महाराज ! आपण आपल्या आईबद्दल कांहीं सांगा.'* 


उत्तर - *'आई हें दैवत आहे यांत शंका नाही. आईवर ज्याचें प्रेम नाही त्याचें भगवंतावरही प्रेम नाही.* तुमच्या प्रश्नाचें उत्तर मी कसें देऊ ? *ज्याची देहबुद्धि नाहीशी झाली त्याची आईची जाणीव कमी होते.* सगळ्याचा विसर पडल्यावर सर्वांची आठवण करणें कठिण जातें. [ या ठिकाणी श्रीमहाराज थोडेसें थांबले व मग पुनः बोलले ] कसें सांगूं तुम्हाला ? *तुम्हाला संत होणें हें जितकें अवघड आहे तितकें मला देहबुद्धीत येणें अवघड आहे.* भगवंताचा अवतार जरी झाला तरी, तो अयोनिसंभव असला तरी आई त्याला आपल्या मुलाप्रमाणेंच पहात असणार. *आपण आंबा खाल्ल्यावर तो आंब्याच्याच झाडाला आलेला आहे. बाभळीच्या झाडाला तो नक्की आलेला नसणार, हें आपण सहज समजतों. तसेंच इथें समजावें.* माझी आई फार उदार होती. भगवंताकरता ती लोकांना मदत करीत असे.' 


               *********

संदर्भः *संतांचें आत्मचरित्र* हे प्रा के वि बेलसरे यांचे पुस्तक पान २६६

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

Tuesday, June 11, 2024

संकल्प

 परमार्थ मार्गात पुष्कळ लोक सत्पुरुषांकडे जातात. पण सगळेच खऱ्या अर्थाने चिकटत नाहीत. कोण किती चिकटला हे फक्त सत्पुरुषांनाच कळते. ह्या मार्गात स्थिर होण्यास येणाऱ्या तीन अडचणी .पहिली अडचण अशी आहे की आपलं मन आणि शरीर थकून जातं. कारण हा सगळा सूक्ष्माचा प्रांत आहे. या प्रपंचात राहणाऱ्याला, दृश्यात राहणाऱ्याला सूक्ष्मात राहणे झेपत नाही. नको वाटते. तो खालीच येतो. 

दुसरं जर असेल तर मनाची संकल्प विकल्प करण्याची जी कला ते संकल्प विकल्प यायला लागतात. मी करतो आहे ते बरोबर का ! अत्ता पर्यंत जे काही केले त्याचा परिणाम दिसत नाही. आपलं सगळं जे  करतो ते ईश्वराच्या दर्शनाकरता करतो ही मनात खोल इच्छा असतेच. 

संकल्प करताना त्याच्या फळाची आशा सोडूनच संकल्प करायचा. मला माहित नाही माझ्या गुरूंनी सांगितलं आहे म्हणून मी करतो. हा प्रकार कमी असतो.श्रीमहाराज उदाहरण देत. एका राजाकडे एक साधू येत असे. त्यांना राजा म्हणाला " मला काही परमार्थ सांगा." तर ते साधू बर म्हणाले. संध्याकाळी दोघेजण गावाबाहेर टेकडी होती त्या  टेकडीवर गेले. त्या टेकडी पलीकडे खड्डा होता.

 साधूने राजाला सांगितले की टेकडीवरचे दगड ह्या खड्ड्यात टाक. मी आठ दिवसांनी येतो. ते साधू आठ दिवसांनी आले. तर राजा म्हणाला " हे दगड इकडून तिकडे टाकण्याचा परमार्थाशी संबंध काय? " ते म्हणाले "आणखी आठ दिवस दगड टाक." 

पुन्हा आठ दिवसांनी आले आणि विचारलं " राजे साहेब ! कसं काय चालले आहे." राजाने परत तेच विचारले " याचा परमार्थाला उपयोग काय?" ते म्हणाले " आणखी आठ दिवस दगड टाक." ते साधू परत आठ दिवसांनी आले आणि राजाला विचारलं की " काय कसं काय आहे?" तर राजा म्हणाला " तुम्ही सांगितलं आहे ना दगड टाक तर टाका. मी विचार करणं सोडून दिलं आहे." तेव्हा साधू म्हणाले "आता  पुरे ." म्हणजे फळाची आशा नाही. करा म्हटलं आहे ना तर करा.

 तिसरी अडचण असेल फळ. तर मला फळाची कल्पनाच  नाही. तुम्ही सांगितलं आहे ना, तुम्हाला आवडलं ना, तर करा. मला काय मिळेल याचा विचार नाही. या तीन गोष्टी अडचणी पार करील तो पुढे जाईल.

बाय नथिंग

 Buy Nothing!


निशा कामाहून घरी येताना सायकलच्या दुकानात थांबली. तिच्या आठ वर्षाच्या मुलाला नवी सायकल घ्यायची होती. निळ्या रंगाची, गिअर असलेली फॅन्सी सायकल व हेल्मेट घ्यायचं होतं पण दुकानातील अनेक प्रकारच्या महागड्या सायकली बघून ती गोंधळून गेली.


बॅास्टन जवळच्या एका छोट्या गावात तिनं व रविने संसार थाटला होता. दोघेही IT मधे काम करत होते. सेल वर गोष्टी आल्या की पैसे वाचतात म्हणून ती बऱ्याच गोष्टी घेऊन ठेवत असे. घरात हळूहळू करत इतकं सामान जमलं की कपाटं कमी पडतं. पर्सेस, चपला, बूट,फ्लावरपॅाटस्, खरी व खोटी फुलं, फुलझाडे, पुस्तकं, कॉफी मेकर, कपडे, टोप्या, फ्रेम्स, खेळणी अशा हजारो गोष्टींनी घर भरून वहात होतं.


ती सायकली बघत असताना दोन बायकांची कूजबूज तिच्या कानावर आली. एवढे पैसे पाच वर्षाच्या मुलाच्या सायकलवर नको टाकायला! “बाय नथिंग” कडे नक्की मिळेल लहान मुलांची सायकल. तिने कान टवकारले.. ती बाई म्हणाली की मुलगा जेव्हा मोठा होईल तेव्हाच मोठी सायकल घ्यावी.

तोपर्यंत “बाय नथिंग”! 


तिने त्यांना “बाय नथिंग” हा काय प्रकार आहे विचारलं. त्या म्हणाल्या, “हा पत्ता व फोन बाय नथिंगचा. . रिबेका भेटेल तिथे. ती सगळी माहिती देईल."


निशा कुतूहलाने “बाय नथिंग” चा पत्ता शोधत गेली.  एका ५० वर्षाच्या हसऱ्या चेहऱ्याच्या बाईनं तिचं स्वागत केलं. 


“माझं नाव रिबेका. वेलकम टू बाय नथिंग!” ती म्हणाली. 


निशानं विचारलं “बाय नथिंग हा नक्की काय प्रकार आहे?”


रिबेका चष्मा नाकावर आणत म्हणाली,” हा फेसबुक ग्रूप मी व माझ्या मैत्रीणीनी सुरू केला. माझी सहा सात वर्षांपूर्वी पैशाची फार चणचण होती. मी मला लागणाऱ्या गोष्टी कोणी काही काळापुरत्या देतील का असं लोकांना विचारायला सुरूवात केली. अगदी जेवण सुध्दा दिलं लोकांनी! माझी परिस्थिती सुधारल्यावर मी हा ग्रूप जीवनावश्यक गोष्टींसाठी बनवला. 


ह्या लोकल बाय नथिंग ग्रूप मधे हजाराहून जास्त मेंबर्स आहेत. मेंबरशिपसाठी अगदी नॅामिनल पैसे घेतात व काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. (हा भाग मी परत चेक करून कळवेन.)

तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर हजार लोकांमधे कुणाकडे तरी असतेच. ती गोष्ट वापरा व काम झालं की परत करा. 


अजिबात काहीही खरेदी करण्याची जरूर नाही. तुम्ही जी गोष्ट वापरत नसाल ती ज्याला हवी त्याला द्या आणि तुम्हाला हवी ती एखाद्या कडून घ्या. यानं पैसा तर वाचतोच पण जगातील कचरा कमी होतो, पर्यावरण सुधारते, ओळखी होतात. पर्सनल हायजीन साठी लागणाऱ्या गोष्टी फक्त विकत घ्या. आपल्या गावाचा हा जसा ग्रूप आहे तसे अनेक गावात हे ग्रूप आहेत. जवळजवळ १६ लाखाहून जास्त मेंबर्स आहेत सध्या!"


निशानं फेसबुक बाय नथिंग ग्रूप तिथेच जॅाईन केला व निळी, गिअरची सायकल आहे का विचारले. लगेच ३०-४० उत्तरं व सायकलीचे फोटो आले. तिने त्यातून एक सायकल निवडली. सात गियरची! लोक एकमेकांची बेबी क्रिब्ज,बीच चेअर्स, व्हील चेअरस्, मुलांची खेळणी, पुस्तकं वगैरे हजारो गोष्टी एकमेकाकडून घेत होते. देवाण घेवाण एक पैसा न वापरता होत होती त्यामुळे भांडणं नव्हती!


रिबेका म्हणाली,”माणसांकडे लक्ष द्यायला शिकायचं. वस्तूवरचं प्रेम कमी करायचं! एवढं लक्षात ठेवायचं.” 


हे विश्वची माझे घर चा खरा अनुभव घेत तिनं निळी सात गिअरची सायकल घेतली व ती घरी आली. रवी थक्क झाला. 

निशाच्या डोक्यात रिबेकाचे शब्द घुमत होते..

“कशासाठी जमवायचं एवढं? बरोबर थोडच नेणार आहे?”


निशानं एक एक करत तिच्या संग्रही असलेल्या अनेक गोष्टी 

बाय नथिंग फेसबुक ग्रूप वर पोस्ट केल्या. अनेकांना त्या  वापरायला द्यायला सुरूवात केली. आता तिच्या गावात बऱ्याच ओळखी झाल्या आहेत. विचारांची देवाण घेवाण होत आहे. भारतापासून लांब रहात असताना एखादी मावशी, काकू, दादा भेटत राहतात तिला हल्ली. नाती जुळत आहेत. 


माणूस आयुष्यभर गोष्टी जमवत राहतो. जाताना यातलं काहीही बरोबर नेता येणार नाही हे माहित असूनही! त्यापेक्षा स्नेह, मैत्री, दुवा जमवण्याचा तिनं निश्चय केला आहे!


आपणही “बाय नथिंग” तत्व आचरणात आणूया ना?


Give something

Grow something

Create something

Donate something

Buy Nothing!


©️®️ ज्योती रानडे

Monday, June 10, 2024

प्रपंच

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩 श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*




*प्रपंच  केवळ  कर्तव्यकर्म  म्हणून  करा .*


एका माणसाला विडी ओढण्याचे फार व्यसन होते. तो आजारी पडल्यावर त्याने डॉक्टरांना सांगितले, "मला तुम्ही औषध दिले तरी मी विडी सोडणार नाही." त्याचा डॉक्टर फार हुशार होता. त्याने त्याला एक गोळी देऊन, विडी ओढण्यापूर्वी ती तोंडात धरीत जा म्हणून सांगितले. त्या गोळीमुळे विडीच्या तंबाखूचे विष त्याला बाधत नसे. तसे आपण प्रपंच करताना वागले पाहिजे. प्रपंच आम्हांला सुख देईल ही आमची कल्पनाच नाहीशी झाली पाहिजे. म्हणजे प्रपंचाची हावही कमी होईल, आणि नंतर कर्तव्यापुरतेच आम्ही प्रपंचात राहू. जोपर्यंत प्रपंचाकडे आमची दृष्टी आहे तोपर्यंत आम्हाला समाधान कालत्रयीही मिळणे शक्य नाही. प्रारब्धाने प्रपंच आला आहे, तो कर्तव्यकर्म म्हणून करीत जा, पण त्यात सुख मिळणार आहे या कल्पनेने तो करू नका. प्रपंची लोकांचा स्वभाव फार विचित्र आहे; त्यांना खरे सांगितले तर ते आवडत नाही. वास्तविक आपण प्रपंचातले संबंधी लोक कामापुरते एकत्र जमलो आहोत. ज्याप्रमाणे आगगाडीत पुष्कळ प्रवासी एकत्र जमतात, त्याप्रमाणे प्रपंचात आपण एकत्र जमतो. पाचजण मिळून प्रपंच बनतो. त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो. मग सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे ? नुसता प्रपंच तापदायक नाहीं, आकुंचित प्रपंच तापदायक आहे.


आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे ही खूणगाठ पक्की बांधून प्रपंचात वागा. ज्याप्रमाणे व्यापारात नफा व्हावा म्हणून व्यापार करतात, तो होत नसेल तर व्यापारात काहीच तथ्य नाही, तसेच प्रपंचात समाधान हा नफा आहे; तो जर मिळत नसेल तर प्रपंचाचा लोभ धरण्यात काय फायदा आहे? "तुझ्या असमाधानाचे कारण नक्की सांग," असे जर आपण एखाद्याला विचारले, तर त्याला खात्रीलायक कारण सांगता येणार नाही. याचा अर्थ असा की, तत्त्वदृष्टया समाधान व्हायला खरोखरीच कशाची जरूरी नाही; पण ही गोष्ट कुणाला पटत नाही. आहे त्या अवस्थेमध्ये आपले समाधान टिकत नाही, आणि पाहिजे ती वस्तू मिळाली तरी आपण पूर्ण सुखी होत नाही. कैदेतल्या माणसाला 'मी सुखी आहे' असे वाटणे कधी शक्य आहे का ? तशी प्रपंची माणसाची अवस्था आहे. खरोखर, प्रपंचात समाधान, आनंद, मिळत नाही हे अगदी सर्वांना कळते; परंतु शहरातले लोक केवळ अभिमानामुळे, आणि खेडयातले लोक अज्ञानामुळे, जसे वागायला पाहिजे तसे वागत नाहीत. या प्रपंचात राहूनसुद्धा भगवंताचे प्रेम आणि समाधान आम्हांला कसे मिळविता येईल, याचा आपण आधी विचार करायला पाहिजे. नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम आपोआप नष्ट होईल, आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचेही प्रेम कमी होईल, आणि पुढे त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल.


* प्रपंच  सुखाचा  करणे  याचेच  नाव  परमार्थ  होय .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Sunday, June 9, 2024

साधक

 एकदा एका साधकाने पु.श्रीरामकृष्ण परमहंसांना विचारले " मी इतकी धर्मचर्चा करतो चिंतन मनन ही करतो, असे असून माझ्या मनात वाईट विचार का येतात ?"

  पु.श्री.रामकृष्ण म्हणाले " एका माणसाने एक कुत्रे पाळले होते.रात्रंदिवस तो त्या कुत्र्याचे लाड करीत असे. तो त्याला कधी मांडीवर घेऊन बसायचा, तर कधी त्याच्या तोंडाला तोंड लावून बसायचा.

 त्याचे हे वेडेपणाचे वागणे पाहून एक दिवस एका शाहण्या माणसाने त्याला त्या बद्धल हटकले आणि समजावले " बाबा रे कुत्र्याला इतके आंजारणे गोंजारणे चांगले नाही . काहीही झाले तरी शेवटी तो पशु आहे. 

एखादे दिवशी तो चावला म्हणजे पंचाईत होईल." हे म्हणणे त्या माणसाला पटले. त्याने लगेच त्या कुत्र्याला मांडीवरून दूर लोटले आणि पुन्हा कधी त्याला मांडीवर न घेण्याची शपथ घेतली. पण हे कुत्र्याला कसे समजणार ? तो तर मालकाला पाहताच धावत यायचा आणि त्याच्या मांडीवर चढण्याचा प्रयत्न करायचा. पुष्कळ दिवस मालकाने त्या कुत्र्याला मारठोक केल्यानंतरच त्याची ती सवय गेली. तुमची (साधक) देखील हीच दशा आहे.

ज्या कुत्र्याला तुम्ही इतके दिवस आंगाखांद्यावर घेतलेत त्याच्यापासून आता तुम्ही आपली सुटका करून घेऊ इच्छित असला तरी तो सहजासहजी तुम्हाला कसे बरे सोडील ? पण काही हरकत नाही . आता यापुढे त्याचे लाड करू नकोस आणि तो मांडीवर चढू लागताच त्याला चांगला ठोकून काढ. असे केल्याने थोड्याच दिवसांत तू वाईट विचारांच्या कचाट्यातून पूर्णपणे सुटशील."

Saturday, June 8, 2024

पुण्यसंचय

 *प्रपंच आम्हांला सुख देईल ही आमची कल्पनाच नाहीशी झाली पाहिजे. म्हणजे प्रपंचाची हावही कमी होईल, आणि नंतर कर्तव्यापुरतेच आम्ही प्रपंचात राहू. जोपर्यंत प्रपंचाकडे आमची दृष्टी आहे तोपर्यंत आम्हाला समाधान कालत्रयीही मिळणे शक्य नाही.* *नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम आपोआप नष्ट होईल, आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचेही प्रेम कमी होईल,आणि पुढे त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल.प्रपंच सुखाचा करणे याचेच नाव परमार्थ होय....

*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*




*🌹पुष्कळ माणसे पुष्कळ नाम घेतात. त्याने पुण्यसंचय झाल्याशिवाय राहात नाही. पण नाम अध्यात्माच्या भूमिकेवर चालणे म्हणजे काय हे समजणे जरूर आहे. भगवंताचे नाम घेताना आपण भगवंताचे नाम घेत आहोत हे भान सारखे टिकत नाही. तसेच नामापरते सत्य नाही ही जाणीव राहात नाही. म्हणून जेथे जिवंत नाम चालते तेथे त्याच्याबरोबर भगवंताच्या अस्तित्वाची जिवंत जाणीव वास करते. 🌹*


*🌸परमपूज्य बाबा बेलसरे🌸*

Friday, June 7, 2024

वासना

 श्रीराम समर्थ 


वासनेचे चार प्रकार 


श्रीगोंदवलेकर महाराज  म्हणाले, *'जगात चार प्रकारचे लोक असतात.*


*पहिला प्रकार*

पाप वासना अगर वाईट विचार मनात आल्या बरोबर त्यांचे हातून लगेच कुकर्म घडते. तिथे विवेक अजिबात गैरहजर असतो.


*दुसरा प्रकार-* 

वाईट वासना मनात येतात परंतु विवेकाने त्या दाबल्या जातात. त्यामुळे पापकर्म हातून सहसा घडत नाही.


*तिसरा प्रकार-*

ज्या वासना येतात त्या सद्वासनाच असतात.


*चोथा प्रकार-* 

भगवंताखेरीज अगर सद्गुरुखेरीज त्यांच्या चित्तात दुसरा विचारच येत  नाही.असे पुरुष हे सिध्द पुरूष असतात. त्यास संत म्हणतात.


               *मनापासून नामस्मरण केल्याने हलके हलके या जिन्याच्या पायऱ्या चढता येतात.*


               *******

संदर्भः *पू.श्री.ल ग तथा बापूसाहेब मराठे यांचे हस्तलिखित*

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

Thursday, June 6, 2024

li.आनंदी°पहाट.il

 ⚜🚩⚜️🔆🕉🔆🚩⚜️⚜


      🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻


            *एकजीवतेच्या रंगाची*

               

               


🌹🌻🌹🧡🛕🧡🌹🌻🌹


        *धुळवड. खेडेगाव असो वा महानगरे लोकांनी घरासमोर होलीका दहन केले. सज्जन शक्तीमागे परमेश्वर उभा ठाकतो. चहूबाजूनी वेढलेल्या ज्वाळातूनही भक्त प्रल्हाद सुखरुप राहीला. हा होता भक्तीचा महिमा. सज्जन शक्तीच्या..भक्तीचा हा विजय. याचे स्मरण म्हणून लोक आजही होलीकेचे पूजन करतात.*

        *भक्त प्रल्हाद अग्नी ज्वाळातून सुखरुप असल्याचे बघताच लोक आनंदाने बेभान झाले. कुणी एकमेकांवर फुले उधळली.. एकमेकांना गुलाल लावला, तर काहीना काहीच उधळायला न सापडल्याने त्यांनी होलीका दहनाची राख एकमेकांवर उधळली. अशी प्रारंभ झाली धुळवड प्रथा. आमच्या संत मंडळीनी होलिका दहनाचा सर्वासाठी जीवनोपयोगी मतितार्थ सांगितलाय.*

        *होळीत मनातील राग, व्देष.. मत्सर.. अहंकार.. नकारात्मक.. भेदाभेद भावनेचे दहन करायचे. मग देहावरचे हे मळभ दूर होत मनुष्याचे मन निरंहकारी.. सहनशील.. अहिंसक.. निर्मोही होते. त्याची कर्मफल अपेक्षा संपते. भेदाभेद संपतो. अंतःकरणात जगताविषयी शुद्ध.. पवित्र भाव उरतो. मग या शुद्धात्म्याच्या भक्तीवर रंग चढतो. असे झाले की जगदगुरु तुकोबा म्हणतात,*

    *दैन्य दुःख आम्हां न येती जवळी*

    *दहन हे होळी होती दोष*

    *सर्व सुखें येती मानें लोटांगणीं*

        *आम्हांला मोक्षाचीही चिंता नाही केवळ संतसहवास हवा.. तो विठ्ठल दृष्टीसमोर हवा हेच काय ते मागणे.*

        *मनात शुद्ध भावना जागली.. विठ्ठल भक्तीत रंगले की भक्तीचा रंग चढतो. रागलोभ.. व्देष विरहीत परस्परांवर प्रेम करणारे मूळ शुद्धात्मा स्वरुप मानवाला अनुभवता येते. मग या सज्जनवृत्तीसमोर कोणत्याही राक्षसी मनोवृत्तीचा निभाव लागत नाही.*

        *होलिकेत मनातील षड्रिपुंचा दहन केलेली ही रक्षा कपाळावर लावल्या जाते. म्हणून हे परस्पर प्रेमभाव जागविणारे धुलीवंदन.*


❤🍃🌸🧡🌺🧡🌸🍃❤


  *अवघा रंग एक झाला*

  *रंगि रंगला श्रीरंग ॥*


  *मी तूं पण गेले वायां*

  *पाहतां पंढरीच्या राया ॥*


  *नाही भेदाचें तें काम*

  *पळोनि गेले क्रोध काम ॥*


  *देही असोनि विदेही*

  *सदा समाधिस्त पाही ॥*


  *पाहते पाहणें गेले दूरी*

  *ह्मणे चोखियाची महारी ॥*


  *अवघा रंग एक झाला*  

  *रंगि रंगला श्रीरंग*


🌷🌿🌸☘🌺☘🌸🌿🌷


  *रचना : संत सोयराबाई*  ✍

  *संगीत : किशोरी आमोणकर*

  *स्वर : किशोरी आमोणकर* 


  🎼🎶🎼🎶🎼   🎧


      *li.धुलीवंदनाच्या°शुभेच्छा.il* 


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

                *२५.०३.२०२४*


❤️🌻🧡🌸🛕🌸🧡🌻❤️

Wednesday, June 5, 2024

पवित्र अंतःकरण

 🙏🏻🌿  *||नामप्रभात||*  🌿🙏🏻


*श्रीराम!* 🙏🏻


समाजामध्ये नीतीचे आचरण करणारी माणसे आढळतील; परंतु पवित्र अंतःकरण असणारी माणसे दुर्मिळ असतात. माणसाच्या वासना, त्याचे विकार, त्याचे दृश्याचे प्रेम त्याचे अंतःकरण दूषित करतात. परंतु कर्तेपणाचा अभिमान अंतःकरण अतिशय घाण करतो. त्या घाणीतून बाहेर पडण्यास मोठी शक्ती लागते. तेथे जीवाची शक्ती कामास येत नाही. तेथे कर्तेपणाचा अभिमान आपल्या हाताने जाळून पवित्र झालेल्या संताचे सामर्थ्यच उपयोगी पडते. ते सामर्थ्य देण्यात सुद्धा खुबी आहे. 


संत माणसाला भगवंताचे नाम देतो. त्या नामामध्ये संताची सारी तपश्चर्या भरलेली असते. त्या नामाच्या अभ्यासाने जिवामध्ये सुप्त असलेली भगवंताची शक्ती जागी होते. ती शक्ती जीवाला दृश्याच्या पकडीतून सोडवते. 


🙏🏻🌿 *प. पू. बाबा बेलसरे* 🌿🙏🏻

Tuesday, June 4, 2024

नाम

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*पू. बाबा :  येथे (गोंदवले) नामस्मरण चांगले होते हा येथील वातावरणाचा परिणाम आहे. एका बँकेतले अधिकारी इंग्लंडमधील शाखेत सहा वर्षे होते. संध्याकाळी ऑफिसातून आल्यावर आंघोळ करून ते जपास बसत. पण तरीदेखील त्यांचा जप सकाळच्या जपाइतका चांगला होत नसे. नाम हे फार नाजुक आहे.*


*साधन करतांना सुरुवातीला फार जपावे लागते, कारण त्या काळात वातावरणाचा आपल्या साधनावर फार परिणाम होतो. आपण नाम घेतो पण व्यवहारात उतरलो की नामाची पातळी टिकत नाही. गैरसोयी सोसून देखील माणसे येथे येतात त्याअर्थी त्यांच्यामधें परमार्थाचे बीज आहे. म्हणून आलेल्या या संधीचा फायदा कसा करून घ्यावा ते समजले पाहिजे. संधी कशी हुकते याची त्यांनी काही उदाहरणे दिली.*


*-- अध्यात्म संवाद*

Monday, June 3, 2024

अनुभव

 एकदा श्री.काकासाहेब तूळपुळे यांनी श्री.गुरुदेव रानडे यांना विचारले की "सद्गुण वाढविण्यासाठी आपण काय करता ?" त्यावर श्री.गुरुदेव म्हणाले "त्यासाठी मी काहीही करीत नाही. काही सुध्दा करत नाही. फक्त नामस्मरण करतो. नामस्मरणाने चित्त शुद्ध होते व ईश्वराचे दर्शनही होते. दोन्ही गोष्टी एका नामस्मरणाने घडतात." पुढे त्यांनी विचारले की "उपासनेने अनुभव येतो. 

अनुभव आहे तितकाच असताना त्यापासून कधी आनंद होतो तर कधी होत नाही असे का ?" त्यावर श्री.गुरुदेव म्हणाले " याचे कारण जेव्हा आनंद होतो त्यावेळेस तो तेजरुपात अधिक प्रकाश असेल  किंवा नादरुपात अधिक झणझणात असतो. अधिक आनंद हा अनुभवाच्या गुणवत्तेवर असतो." 

एकदा सूक्ष्म अहंकाराविषयी श्री.गुरुदेव म्हणाले "अहंकार जितका सूक्ष्म गोष्टीबद्दल असतो तितका सोडायला कठीण होतो. सर्वात सूक्ष्म अहंकार मी "साक्षात्कारी पुरुष आहे" हा. तो कोणीच खोटा ठरवू शकत नाही. हा अभिमान फार भयंकर. तो उत्पन्नच होऊ देऊ नये."

Sunday, June 2, 2024

ध्येय

 *जीवनातील ध्येय*


*जीवन फक्त धनसंचय तसेच भोग भोगण्यापुरतंच सीमित नाही. भोग भोगताना त्यापासून* *आनंद मिळवणे  हाच मुख्य उद्देश असतो.* *आनंदासाठीच भोग हवे हवेसे वाटतात. सुख हंव हंवस वाटतं. प्रशंसा परोक्ष किंवा अपरोक्ष कानावर आली की कसं कुरवाळल्या सारखं वाटतं.* *गोंजारल्यासारखं वाटतं. आनंद मिळतोच. मनुष्य जीवन जगताना दैनंदिन व्यवहारासोबत नकळत सुखप्राप्तीचे, म्हणजे पर्यायाने आनंद प्राप्तीचे, प्रयत्न करीतच* *असतो. सुख भोग भोगताना आनंद प्राप्त होतो. एवढा एकच रस्ता माहीत आहे. असंख्य पिढ्या मनुष्याची तीच वहिवाट आहे. शोधल्यास अनेक मार्ग मिळतील. परंतु वहिवाटीचा रस्ताच बरा, असा विचार करून  मनुष्य राजरस्ताच स्विकारतो.*  *भोगप्राप्तीसाठी आयुष्यभर प्रयत्न करतो. भोग केवळ प्रस्तुत जन्मापुरतेच नव्हे मृत्यू पश्चात् स्वर्गप्राप्ती द्वारे दिव्य भोग भोगायला मिळण्यासाठी* *पण प्रयत्न असतात. विचार स्वर्गप्राप्ती या संकल्पने पेक्षां उंच  झेपावत नाहीत. तसेच झेपत नाहीत. भिती वाटते.*


*अध्यात्मशास्त्रानुसार परमेश्वरप्राप्ती, भगवप्राप्ती, हेच उच्चतम ध्येय ठरवावे अशी शिफारस केली आहे.*


*परमेश्वराचे अस्तित्व आहे किंवा नाही? येथ पासूनच संभ्रम आहे. परमेश्वरप्राप्ती हा केवळ* *कल्पनाविलासच वाटतो. हे खरं असू शकेल यावर विश्वास ठेवलाच जात नाही.* *बुध्दीच्या जोरावर पटत नसेल. परंतु समस्याग्रस्त मनुष्य मानसिक आधारासाठी, तसेच सर्व भौतिक प्रयत्न करून* *थकल्यावर शेवटी मदतीसाठी,  परमेश्वराकडेच धाव घेतो. त्यावेळेस भावनेला महत्व देऊन परमेश्वराचे अस्तित्व मान्य* *केले जाते. तेव्हां अशा उलट सुलट विचारांच्या संभ्रमात अडकून पडू नका. परमेश्वरप्राप्ती हे वास्तवच* *आहे. कल्पनाविलास नव्हे. असंख्य संत सत्पुरुषांनी या अवस्थेचा अनुभव घेतलेला आहे. अनुभव घेत घेत स्वत:चे ऊर्वरित जीवन व्यतित केले आहे.*


*परमेश्वरप्राप्ती हे ध्येय निश्चित करा. ते स्वप्न सत्यात उतरवण्याचे* *अटोकाट प्रयत्न करा. त्यानुसार मानसिकता* *बदला, विचारसरणी बदला. मग जीवनात कसा आनंद फुलतो त्याचा स्वत: अनुभव घ्या. जीवन आनंदाचा आस्वाद घेत जगायचं असतं. रडत खडत जीवनाचा गाडा ओढायचा नसतो.*

 *संकलन आनंद पाटील*

Saturday, June 1, 2024

सात्त्विकादी

 *॥श्रीहरिः॥*


श्रीभगवंताच्या  विविध अशा पंधरा अंशविभूति ८ ते ११ श्लोकात सांगून झाल्या.. पुढे सांगताना श्रीभगवंत म्हणतात, 


*-----------------------------*


॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता सप्तमोध्यायः


*ये चैव सात्त्विका भावा* 

*राजसास्तामसाश्च ये ।*

*मत्त एवेति तान्विद्धि* 

*न त्वहं तेषु ते मयि ॥*

*॥७.१२॥*


(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग ७.१२) 


*भावार्थ :- सात्त्विक, राजसिक किंवा तामसिक, हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मीच हे सर्व करत आहे. परंतु तरीदेखील मी स्वतंत्र आहे. प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत.*


जे जे सात्त्विक, राजस आणि तामस म्हणून जे पदार्थ (भाव) आहेत, ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असं जाण. मी त्यांच्या आश्रयानं नाही; परंतु; ते मात्र माझ्या आश्रयानं आहेत. 


*-----------------------------*


*प्रस्तुत* श्लोकामध्ये मनुष्याच्या तीन प्रकृतींचा म्हणजेच सत्, रज आणि तम यांचा उल्लेख केला आहे. सर्वप्रथम यांच्याविषयी समजून घेऊया. 


*मनुष्यामध्ये तीन मूळ गुण आहेत-* 

सत्त्व, रज आणि तम. 


हे तीन गुणच मनुष्याला कर्म करण्यासाठी प्रेरित करतात. परंतु तीनही गुणांचे भाव वेगवेगळे असतात.


*तमोगुणी* शरीराला आराम करायला आवडतो. सुस्ती, ग्लानी, अतिनिद्रा,आळस,कामचुकारपणा, बेपर्वाई, राग ही तमोगुणाची लक्षणं आहेत. 


*रजोगुणी* स्वभावाचा मनुष्य अविरतपणे कामामागे सतत धावत असतो. मात्र धावताना थोडं थांबून तो असा विचारही करत नाही, की तो जे करतोय ते कशासाठी? या कामाचं, या जीवनाचं नेमकं उद्दिष्ट काय आहे? त्याच्या आजूबाजूला काय घडतंय किंवा त्याच्या आतमध्ये नकळत कोणत्या गोष्टी प्रवेश करत आहेत, हे त्याला जाणवतच नाही. एक काम पूर्ण होतं न होतं तेच पुढचं काम कोणतं करायचं, केवळ याचेच विचार त्याच्या मनात सुरू असतात.


*सत्त्वगुण* हा तम आणि रज यांच्यापेक्षा उत्कृष्ट मानला जातो. कारण या गुणांनी युक्त असणारं शरीर चांगली कार्यं करतं. 


अशा गुणांनी युक्त असणारे लोक समाजसेवा करतात, गरिबांमध्ये अन्न, वस्तू इत्यादींचं वाटप करतात,भंडारा, लंगर यांचं आयोजन करतात, धर्मशाळा बांधणं,दान देणं यांसारखी कार्यं करतात. यामुळे अशा प्रकारच्या लोकांना समाजामध्ये प्रतिष्ठा, मानसन्मान मिळतो. परंतु या मानसन्मानामुळे त्यांचा अहंकार देखील वाढू शकतो.



*मनुष्याच्या/प्राण्यांच्या* कर्मामुळे जे सात्त्विक, राजस आणि तामस भाव उत्पन्न होतात ते सर्व माझ्या- पासूनच निर्माण होतात. त्या सर्वांचं मूळ कारण पर-अपर प्रकृतीच्या द्वारे मीच आहे, असं भगवंत अर्जुनाला सांगतात.


(१४व्या अध्यायात या त्रिगुणांच्या वैशिष्ट्यांविषयी भगवंतांनी अधिक विवेचन केलं आहे.)


*सात्त्विकादी* सर्व पदार्थ जरी परमेश्वरापासून निर्माण झालेले असले तरी संसारी लोक परमेश्वरा- ऐवजी या त्रिगुणांमध्येच अधीन झालेले असतात.परमेश्वरापासूनच निर्माण झालेल्या पदार्थांमध्ये परमेश्वर मात्र अधीन होत नाही. उलट ते पदार्थ त्याच्या अधीन होतात. कारण तोच एक सत्य आहे.ते पदार्थ कल्पित आहेत.त्यामुळे त्या पदार्थांच्या गुणदोषांचा परमेश्वरावर परिणाम होत नाही.


*ते* त्रिगुणात्मक पदार्थ परमेश्वराच्या अधीन झालेले असतात. परंतु परमेश्वर त्यांच्यामध्ये नसतो. म्हणजे भूतसृष्टीतील जे जे वाईट आहे ते चांगल्याबरोबर त्याच्यात सामावलेलं असतं. कारण परमेश्वरच त्यांच्या उत्पत्तीचं आदीकरण असतो.असं असूनही त्यांच्या बऱ्यावाईटात परमेश्वर भागीदार नसतो किंवा सहभागी नसतो. परमेश्वर दोन्ही बाजूंनी बोलतो असं इथे वाटण्याचा संभव आहे. पण त्याच्या बोलण्यातला गहन अर्थ ध्यानात घ्यायला हवा.


*भगवान श्रीकृष्ण म्हणतात,* 

या तीन गुणांमुळे निर्माण होणारे भाव हे वास्तविक माझ्यामधूनच उत्पन्न होतात. प्रत्येक गुण, प्रत्येक भावना यांचा स्रोत मीच आहे. परंतु तरी- देखील मी त्यांच्यापलीकडे आहे, म्हणजे वेगळा आहे. अर्थात, त्यांच्याशी आसक्त, लिप्त नाही. प्रत्येक भाव, गुण, विचार... सगळ्यांचा स्रोत चैतन्यच आहे. तरीदेखील चैतन्य त्यांच्याशी बद्ध नाही किंवा त्यांच्याशी आसक्तही नाही.



*उदाहरण घ्यायचं झालं तर सागराचं घेता येईल.* 


*सागरापासून* शंख-शिंपल्यांची निर्मिती होत असते. पण त्या शंख-शिंपल्यात सागर सामावलेला नसतो. 

*अग्नीपासूनच* धूमाची निर्मिती होते. परंतु त्या धूमात (धुरात) अग्नी नसतो. 

*समुद्रमंथनातूनच* हलाहल विष निर्माण झालं. पण त्या हलाहलात समुद्र सामावलेला नसतो. *आकाशातून* उल्कापात होतो. परंतु त्या उल्केत अनंत आकाशाचं दर्शन कधी घडत नाही. 


*अलीकडचं उदाहरण घ्यायचं झालं तर,* 

कॅमेरामुळे फोटो निघतो; पण फोटोत कॅमेरा नसतो! 


*त्याप्रमाणे त्रिगुणात्मक प्रकृतीच्या चांगल्या-वाईटात परमेश्वर नसतो.*


परमेश्वरापासून निर्माण झाल्यावर जो तो प्राणी आपापल्या सत्त्व-रज-तम आदी भावगुणांनुसार कर्म करीत असतो; आणि आपल्या कर्मानुसार आपलं अनेक जन्मांचं भविष्य ठरवीत असतो.

*आपल्यापासूनच निर्माण झालेल्या या यंत्रणेत परमेश्वर हस्तक्षेप मात्र करीत नाही.*



*सारांश:* 

*सात्त्विक-राजस-तामस हे त्रिगुणात्मक पदार्थ परमेश्वरा- पासूनच निर्माण झाले असले तरी त्या पदार्थांच्या चांगल्या-वाईट कर्मामध्ये परमेश्वर नसतो. ते त्रिगुण मात्र परमेश्वरामध्ये सामावलेले असतात.*


*-----------------------------*


गीताशास्त्र - श्रीमद्भगवद्गीता भाष्य. 

संपूर्ण भगवद्गीता - सरश्री. 


*।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।*