TechRepublic Blogs

Friday, February 14, 2025

लिफ्ट

 "लिफ्ट अन ती"


हल्ली हल्लीच 'ती' सुभाषला दिसू लागली होती. लिफ्ट मधे..


लिफ्ट मधे कोणी सोबत असेल तर ती दिसायची नाही. पण तो एकटा असेल तेंव्हाच दिसायची...


सुभाष अन राखीचा फ्लॅट बाराव्या मजल्यावर होता. त्यामुळे लिफ्टने जाण्याशिवाय त्याला पर्याय नव्हता. 


लिफ्टच्या मागच्या बाजूला, ब-याच लिफ्टमधे हल्ली असतो तसा, एक आरसा होता. येता जाता त्या आरशात स्वतःला पहात आपले केस ठीक आहेत का? शर्ट व्यवस्थित 'इन' आहे का? बेल्ट बरोबर 'सेंटर'ला आहे का? हे तो त्या आरशात पहायचा, खात्री करायचा. 


चार दिवसापूर्वी रात्री तो उशीरा सोसायटीत आला. साधारण दीड वाजला होता. सुभाष ऑफीसची पार्टी आटोपून आला होता. चार पेग झाल्याने थोडी किक बसली असली तरी तो तसा 'कंट्रोल' मधे होता. 


गाडी पार्क करुन तो लिफ्ट जवळ आला. लिफ्ट आठव्या मजल्यावर होती ती त्याने कॉल केली. दिवसभर कामाचा डोंगर, घेतलेले ड्रिंक्स व झालेला उशीर यामुळे त्याचं शरीर व मन दोन्ही थकलं होतं. लिफ्टमधे शिरुन त्याने लिफ्टचा पंखा सुरु केला व डोळे मिटले. लिफ्टवर बाराव्या मजल्याचे बटण दाबण्याआधीच कुणी तरी लिफ्ट कॉल केली व लिफ्ट वर जाउ लागली. 


'काय भेंडी..रात्री दिड वाजता कोण लिफ्ट कॉल करतय..' असे चिडून स्वतःशीच म्हणत त्याने बाराव्या मजल्याचे बटण परत दाबले 


पण आधी कॉल केल्याने आठव्या मजल्यावर लिफ्ट थ़ांबली. 

लिफ्ट उघडली. पण परत बाहेर कुणीच नव्हतं. 


लिफ्टच्या दाराकडे पाठ ठेउन परत त्याने चिडून एक सणसणीत शिवी हासडली व लिफ्ट बंद करण्याचे बटण दाबले. 

अन त्याला 'ती' दिसली..


त्याच्या समोर, त्या आरशात, लिफ्टच्या बंद होणा-या दरवाजामधे त्याला ती गाउन मधे उभी बाई दिसली. तिने सुभाष कडे अगदी अगतीकपणे पाहिले. जणू तिला लिफ्टमधे यायचं होतं पण कुणी तरी तिला त्या लिफ्टमधे येण्यापासून रोखत होतं. 


एक अपरिचीत स्त्री, तीही गाउनवर, रात्रीच्या दिड वाजता, लिफ्टच्या बाहेर..अन  तिच्या  चेह-यावर एक करुण अगतीकता होती..


सुभाषला ला दरदरुन घाम फुटला. 

त्याची चढलेली सारी दारु खाडकन उतरली. 


बाराव्या मजल्यावर लिफ्ट पोचताच तो सटकन लिफ्टमधून बाहेर आला व मागे वळून न पाहता आपल्या फ्लॅट कडे गेला. त्या घाबरलेल्या अवस्थेत त्याला खिशातून 'लॅच की' देखील पटकन काढता येईना. 


शेवटी चावी मिळाली,  व कस़बसं लॅच उघडून तो घरात शिरला. राखी बेडरुममधे झोपली होती. शांतपणे आवरुन, राखीला न उठवता तो बेडच्या दुस-या अंगाला झोपी गेला. 


अन आता हे तीनदा झालं होतं. 

तो आठवड्यातल्या ज्या दिवशी ड्रिंक्स घेउन यायचा त्या दिवशी 'ती' बाई त्याला आठव्या मजल्यावर दिसायची... तशीच..भकास चेह-याने.. गाउनवर उभी...


अन आज परत तेच झालं..

आठव्या मजल्यावर ती लिफ्ट थांबली. 


यावेळी मात्र ती बाई लिफ्टमधे घुसली. 

सुभाषकडे पहात तिने एक सुस्कारा सोडला व शांतपणे  म्हणाली..

'ड्रिंक्स घेउन आलाय ना? किती दिवस झाले दारु पिउन. नेहमी तुम्ही एकटे एकटे पिउन येता. माझ्यासाठी थोडी शिल्लक आहे का?'


सुभाषने मानेनेच नाही म्हणून उत्तर दिलं. 


तिने चक् असा विचीत्र आवाज काढला. त्याच्या नजरेत आपली नजर मिसळून थंडपणे म्हणाली..

'पुढच्या वेळी याल तेंव्हा माझ्यासाठी सुद्धा दारु घेउन या. टेरेसवर जाउन दोघेही पिउत. मी तुम्हाला कंपनी देइन..काय? ' 

त्याने परत मानेनेच होकार दिला. 

त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. 


लिफ्ट अजून जागेवरच म्हणजे आठव्या मजल्यावरच होती. 

तिने आठव्या मजल्याचे बटण बोटाने दाबून ठेवलं होतं..


आता मात्र तिने लिफ्ट उघडायचे बटण दाबले. 

लिफ्ट उघडली..

ती लिफ्टमधून बाहेर आली..

तिने त्याच्याकडे परत एकदा थंडपणे पाहिलं..

दार बंद झाले व लिफ्ट बाराव्या मजल्यावर आली.. 


या घटनेनंतर सुभाषचं ड्रिंक्स घेणं बंद झालय. 

योगायोगानं ती बाई त्याला दिसायचंही आता बंद झालय..


बाकी तुम्हाला सांगायला हरकत नाही..

आठव्या मजल्यावरच्या आपल्या मैत्रीणीला, अस्मिताला, व तिच्या सिनेमा नाटकात छोटे छोटे रोल करणा-या बहिणीला, अंकिताला, सुभाषच्या बायकोनं म्हणजे राखीनं नुकतीच एक छानशी पार्टी दिली. 


लिफ्टमधे सुभाषला दारुची डिमांड करणा-या अंकिताने त्या दिवशी राखीच्या पार्टीत मात्र दारु पिण्याची आपली मनीषा, मस्तपैकी रेड वाइन पिउन पूर्ण केली. 


®© सुनील गोबुरे



No comments:

Post a Comment