*हाक मैत्रीची*नक्की वाचा..
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. मी रात्री जेवून निवांत बसले होते. दहा वाजले असतील. माझ्या एका जवळच्या मैत्रिणीचा फोन आला.
‘हलो, काय करते आहेस?’
‘काही नाही. बसले आहे. काय विशेष?’, मी म्हणाले.
‘आत्ता लगेच येऊ शकशील का घरी?’
‘हो, येते.’ आणि मी फोन बंद केला.
मी कपडे बदलले आणि गाडी बाहेर काढायला निघाले. मैत्रीण दुसऱ्या गावी रहात होती. जायला दीड दोन तास लागणार होते. लगेच बोलाविले आहे म्हणजे काहीतरी कारण नक्की असणार. काही पैसे, कॅश लागणार आहे का, बरोबर कोणाला घेऊन येऊ का, हे विचारण्यासाठी मी मैत्रिणीला परत फोन लावला.
‘हलो, आग मी स्टार्टर मारते, काही घेऊन यायला पाहिजे आहे काय?’
यावर ती काही बोलली नाही. पण रडू लागली. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काय घडले आहे कळेना. मी विचारले, ‘काय झाले?’ पण काही बोलेना. नुसतीच रडू लागली. मी गोंधळून गेले. काय करावे कळेना.
एवढ्यात फोनवर दुसरे कोणीतरी बोलले. मला अपरिचित आवाज होता. बहुदा मैत्रिणीची मैत्रीण असावी
‘अहो ताई, काही झालेले नाही. काळजीचे कारण नाही. तुमची मैत्रीण आनंदाने रडत आहे.’ मी अधिकच गोंधळून गेले.
‘थांब तुम्हाला सगळे सांगते म्हणजे समजेल,’ मैत्रिणीची मैत्रीण बोलत होती.
‘आम्ही सात आठ जनी बसलो आहोत. मैत्रीवर चर्चा चालू होती. बोलता बोलता एक पैज लागली. आत्ता प्रत्येकीने तिच्या बाहेर गावच्या मैत्रिणीला फोन करायचा. आणि लगेच ये म्हणून सांगायचे. ती मैत्रिण येते म्हणायला पाहिजे. *आणि पैजेतील महत्त्वाची अट म्हणजे त्या मैत्रिणीने, काय, कशाला, एवढ्या रात्री काय, सकाळी आले तर चालेल का, असे काहीही विचारता कामा नये.* आम्ही सगळ्यां जणींनी मैत्रिणींना फोन केले. पण प्रत्येकीने काय, कशाला म्हणून विचारले.
फक्त तुम्हीच काहीही शंका न घेता येते म्हणालात. आणि काय आणू का विचारलेत. आम्ही स्पीकर फोनवर ऐकले. तुमच्या प्रेमा मुळे गहिवरून येऊन ती रडत आहे. ती पैज जिंकली आहे. तुम्ही या परीक्षेत पहिल्या नंबरने पास झाला आहात. तुमच्या मैत्रीला सलाम.’
आता मी रडू लागले. पहिल्या नंबरने पास झाल्याच्या आनंदात...
अशी मैत्रीण एक तरी असावी.
माझ्या सर्व मैत्रिणींना समर्पित.
लेखिका अज्ञात
No comments:
Post a Comment