आदरांजली...
पुण्यात कल्याणी नगर येथे घडलेले 'हीट अँड रन' प्रकरण बरंच चर्चेत आहे सध्या...!सुरुवातीला मुलाला शिक्षा म्हणून 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला आणि समज देऊन सोडून दिलं ही चर्चा खूपच रंगली...! आपल्या मद्यपान केलेल्या अल्पवयीन मुलाला..., जो नशेत अतिशय वेगाने गाडी चालवत होता...आणि त्याच्या हातून घडलेल्या अपघातात दोघांचा जीव गेला...त्याला वाचवण्यासाठी आजोबा आणि वडील गैरमार्गाचा वापर करत होते... पैशाने कायद्याला...माणुसकीला विकत घेऊ पहात होते...!
या पार्श्वभूमीवर एक घटना खूपच विचार करण्यासारखी आहे...! 31 मे...राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती...!सर्व देशभर ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...! त्यांच्याच जीवनात घडलेला एक प्रसंग या पार्श्वभूमीवर अतिशय बोलका आणि डोळ्यात अंजन घालणारा आहे...!
हा प्रसंग जरी त्या वडिलांना आणि आजोबांना सांगितला असता, तरी निबंध लिहिण्यापेक्षा आहे तो परिणामकारक झाला असता.... असं मात्र वाटत रहातं...!
"राजमाता अहिल्यादेवी होळकर...!"एक आदर्श व्यक्तिमत्व ...! दानशूर...कुशल प्रशासक ... वीरांगना...अतिशय न्यायप्रिय... दूरदृष्टी असलेल्या... पुरोगामी विचाराच्या... शिवभक्त...आणि... प्रजाहितदक्ष...पुण्यश्लोक... महाराणी अहिल्यादेवी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एक प्रसंग...
अहिल्यादेवी यांचा पुत्र मालोजी रथामधून जात असताना रस्त्यामध्ये एक वासरू बागडत उड्या मारत रथासमोर येते... वासराला त्या रथाची धडक बसते आणि ते वासरू मृत्यूमुखी पडते...!मालोजीराव तसेच पुढे निघून जातात...! जवळच त्या वासराची आई... म्हणजेच गाय उभी असते...! आपलं बाळ गेलेलं तिच्या लक्षात येते... अतिशय दुःखी अशी ती गाय त्या वासराभोवती गोल गोल फिरते आणि शेवटी त्या वासराच्या बाजूला बसून राहते...! काही वेळाने त्याच रस्त्यावरून अहिल्यादेवीचा रथ जातो... त्यांना हे दृश्य दिसते... आणि लक्षात येते की कुठल्यातरी अपघातामध्ये हे वासरु गेलेले आहे...! त्यांना अतिशय वाईट वाटते... चौकशी केल्यानंतर कळते की हे कृत्य आपल्या मुलाच्या हातून घडले आहे...! त्या अतिशय संतापतात...! आणि अतिशय रागात घरी येतात...आपल्या सुनेला विचारतात...."जर एखादया आईसमोर तिच्या बाळाला कोणी आपल्या रथाखाली चिरडलं ... आणि ती व्यक्ती न थांबता तशीच निघून गेली....तर काय न्याय द्यायला हवा...?"
सून म्हणते...," ज्या पद्धतीने त्या व्यक्तीने वासराला चिरडले ...त्या पद्धतीनेच त्या व्यक्तीला देखील मृत्युदंड द्यायला हवा...!"
अहिल्यादेवी दरबारामध्ये मुलाला बोलून घेतात आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावतात...!तो मृत्यू देखील ज्या पध्द्तीने वासराला चिरडले गेले...त्याच पध्द्तीने...! मालोजीरावांना हात पाय बांधून रस्त्यावर टाकण्यात येते...! परंतु मालोजीरावांच्या अंगावर जो रथ घालायचा...त्याचे सारथ्य करायला कोणीच तयार होत नाही...! मालोजीरावांना माफ करावे म्हणून प्रजाजन अहिल्यादेवींना खूप विनंती करतात...! परंतु आता त्यांचा निर्णय झालेला असतो... त्यांनी एकदा दिलेला निर्णय परत बदलायचा विषयच नसतो...!
शेवटी अहिल्यादेवी स्वतः हातात लगाम घेतात ... त्या रथावर चढतात आणि त्या रथाचे सारथ्य करतात...! परंतु एक अद्भुत घटना त्या वेळेस घडते...! अहिल्यादेवींच्या रथासमोर ती गाय येऊन उभा रहाते...!कितीही हाकलून दिले तरी ती गाय पुन्हा पुन्हा त्या रथाला आडवी येते... ! जणू ती सांगते की...' हे अपत्य विरहाचे दुःख फार वाईट आहे... एका आईच्या हातून आपल्या बाळाचा मृत्यू होऊ नये ...आणि आईला हे दुःख सहन करायला लागू नये ...! '
ह्या घटनेने सर्वजण अवाक होतात...! अहिल्यादेवींची समजूत काढतात...! शेवटी अहिल्यादेवी आपल्या मुलाला माफ करतात...!
ही घटना ऐकून अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात...! प्रत्येक स्त्रीमध्ये एक 'आई 'असते...! त्या आईने दुसऱ्या आईला न्याय देण्यासाठी आपल्या स्वतःच्या मातृत्वाचा देखील विचार केला नाही...! आपल्या पोटच्या पोराला इतकी कठोर शिक्षा त्यांनी सुनावताना मातृत्वावर कर्तव्याने विजय मिळवला होता...! परंतु त्या क्षणी त्यांच्या मनामध्ये विचारांची किती वादळे उठली असतील...? मन किती खंबीर करावं लागलं असेल...! खरंच विचार करण्यापलीकडेच आहे सारे ...!
आज अशा न्यायाची खरंच खूप गरज आहे...पैशाने न्याय विकत घेऊ पाहणाऱ्यांसाठी...!
आणि अशा इतिहास घडविणाऱ्या इतिहासातल्या घटना समाजापुढे ठेवण्याची गरज आहे... पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींची जयंतीच्या निमित्ताने...!
हीच खरी अहिल्यादेवींनी वाहिलेली आदरांजली ...आणि हेच कदाचित समाज प्रबोधनही असेल...!
डॉ सुनिता दोशी✍🏻
No comments:
Post a Comment