TechRepublic Blogs

Monday, February 10, 2025

आठवण

 श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट. 

 लेखांक -६.

लेखांक - सहावा.

************************

 नामाचेही असेच आहे. जसे दुधात लोणी लपलेले असते पण ते प्राप्त करण्यासाठी त्या दुधातील सायीवर रई लावून ते सतत घोटावे लागते त्याप्रमाणेच अगदी नामातच नामाचे प्रेम व ईश्वर दडलेला असतो. जर आपण सातत्याने व भावपूर्ण अंत:करणाने नामाचा अभ्यास केला की नामाचे प्रेम आपोआप येते. प्रपंचात जसे अभ्यास, कर्म, कर्तव्य ह्यांना महत्त्व आहे तेवढेच महत्त्व या परमार्थात नामस्मरणाला आहे. हा प्रपंच केवळ स्वामींचाच आहे व आपण केवळ त्यामधे निमित्त आहे असे गृहीत धरून प्रपंच करावा म्हणजे तो छान होतो. तेवढ्याच प्रेमाने तो करताना वाचेने अक्षय-अव्याहत गोड स्वामीनाम घ्यावे. एकदा का आपण स्वामींचे होऊन स्वामी नामात दंग झालो की नाम आपले काम करतेच करते व त्याच्या प्रभावाच्या सुंदर खुणा अनुभूतीच्या रूपाने आपल्या अंत:करणात उमटतात. महाराजच आपल्या नकळत ह्र्दयासनावर येऊन बसतात. ते आपला योगक्षेम तर पहातातच पण त्याचबरोबर अनेक दुर्धर प्रसंगात, संकटात-दु:खात आपली काळजी घेऊन 

" भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे "

ह्या आश्वासनाची प्रचीती देतात व आपल्यावर कृपा करतात आणि त्याचबरोबर आपल्याजवळच असल्याची खुणगाठ " नामावताराने " देतात. एक महान ग्रंथ म्हणजे " श्रीगुरुलीलामृत  " हा आहे. श्री स्वामीसमर्थ, अक्कलकोट स्वामींच्या सर्व भक्तांना ज्ञात असलेला असा हा सोपा, सुबोध ग्रंथ आहे. या ग्रंथात वामनबुवा वैद्य यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीलांचे वर्णन केले  आहेत. त्यात ग्रंथामध्ये श्री स्वामी महाराजांचे चमत्कार व स्वामी लीलांच्या कथांचाही समावेश आहे. वचनबोध पाहताना चमत्कार कथांचा फारसा उल्लेख केलेला नाही. कारण हे चमत्कार सिद्ध पुरुषांचे असले तरी ते ज्याचे त्याला उपकारक असतात. मात्र एक प्रसंगाचा  येथे मुद्दाम उल्लेख केला आहे. त्यात व्यापक स्वरूपात प्रापंचिक माणूस आणि सद्गुरू कृपा यांच्या समन्वयाचे एक रूपक दडले असल्याने त्याविषयीची प्रतिकात्मकता येथे स्पष्ट केली आहे. प्रसंग असा आहे की, मुंबई-ठाण्याकडील राहणारा एक लक्ष्मण नावाचा कोळी होता. तो खलाशी होता. त्याचा व्यापारही फार मोठ्या प्रमाणावर होता. समुद्रातून जहाज / आगबोट याद्वारे तो व्यापार करीत असे. एकदा जहाजात पुष्कळ माल भरलेला होता आणि त्याचबरोबर काही प्रवासीही होते. वाटेत मोठे वादळ सुटले आणि जहाज समुद्रात बुडू लागले. लक्ष्मण कोळी खरंतर एक मोठा धैर्यवान व्यक्ती जरी होता तरी पण तो यावेळी मात्र अतिशय घाबरला व त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले कारण प्रसंग तर मोठा दुर्दैवी ओढवला होता.


 दैववशात त्यासि झाले स्मरण । 

श्रीमददत्तात्रेय  स्वामीस अनन्य शरण । होऊनि म्हणे त्रैलोक्यात तारण । आपणाविण नसेचि ॥ 

नवस केले देवाधिदेवी । 

करू लागला योगीश्वरांचा धावा ।

 वदे गुरू मायबापा धावा हो धावा ।

 पावा मज संकटी ॥ 

त्याच काळी अक्कलकोटात । 

प्रिय भक्त चोळाप्पाचे सदनी स्थित ।

 आनंद खेळत असता अवधूत ।

एकाएकी गडबडून उठले ॥ 

त्वरेने उजवा हात खाली घालून ।

 आवेशाने ‘हुं-हुं-हुं’ ऐसे म्हणून । 

तात्काळ दिधले उचलून ।

 आश्चर्य जन पाहाता ते ॥ 

जैसें हनुमंते पृथ्वीत घालून कर । 

द्रोणागिरी उचलिला सत्वर ।

 तैसे दत्तात्रेय स्वामींनी अभयकर ।

 त्वरे उचलिलि जहाजे तदा ॥’

 (अ. ४१ ओवीबंध २४ ते २८)


अशा तऱ्हेने तो लक्ष्मण कोळी तरला तर  लोकही वाचले. पुढे आठ दिवसांनी लक्ष्मण कोळी अक्कलकोटला आला. स्वामी समर्थांना त्यांनी साष्टांग दंडवत घातले. स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन तो आपल्या गावी परतला. आता त्यातले रूपक पाहू या.

" तुम्ही आम्ही सर्वजण प्रापंचिक आहोत. लक्ष्मण कोळीप्रमाणेच या भवसागरात आपली देहनौका हाकीत आहोत. कधीकधी दु:ख , संकटे व प्रतिकूलता यांच्या वादळ-वाऱ्यात आपली देहनौका सापडते. मन वैतागते. बुद्धी डळमळीत होते. " 

अशावेळी आपण काय करतो ? तर उपासनेचे जे दैवत असेल, वा सद्गुरू असतील, त्यांना आर्तपणाने हाक मारतो. साद घालतो. त्यावेळी भक्ताचा धावा ऐकून देव त्याच्या साहाय्यासाठी धावून येतो. अशा वेळी प्रत्यक्ष देव धावून येतो. म्हणजे काय? तर, कुणाच्या ना कुणाच्या रूपात येऊन तो आपल्याला संकटातून सोडवतो. संसारीकाला ही देवकृपा म्हणा वा सद्गुरूकृपा म्हणा अशा दैविय शक्ती नेहमीच साहाय्य करत असतात. अशावेळी आपण मनोमन देवाचे किंवा आपल्या सद्गुरूंचे ऋण मान्य करतो. त्यांचे ऋण फेडण्यासाठी वा उतराई होण्यासाठी त्यांच्या दर्शनार्थ जातो. सेवा म्हणून तन-मन-धन अर्पण करतो. लक्ष्मण कोळ्याने शतरौप्यमुद्रा, वस्त्रालंकार, फळे या स्वरूपात श्रीस्वामी समर्थांच्या पायी अर्पण करून ऋण मान्य केले व ते अंशत: का होईना फेडण्याचा प्रयत्न केला. 

 यात धन, वस्त्रे, फळे यांचे महत्त्व नाही पण आपण भाव भक्तीने जे काहीही अर्पण करतो तो भाव मात्र महत्त्वाचा आहे. आपणही आपल्यापरीने पूजा-नैवेद्य-प्रसाद या स्वरूपात देवाचे / सद्गुरूंचे ऋण मान्य करून उतराई होण्याचा प्रयत्न करतो. प्रपंच म्हटला की, त्यात सुख-दु:ख आलेच, त्यातही

 " सुख जवा एवढे व दु:ख पर्वताएवढे " 

हा बहुतेकांचा अनुभव आहे. मग अशा दु:खप्रसंगी व संकटप्रसंगी आपण त्यांचे निवारण व्हावे म्हणून कुलदेवतेला व गुरूदेवतेला नवस बोलतो पण नवस बोलला असेल, तर आपण दु:ख-संकटांचा परिहार झाल्यावर तो लक्षात ठेवून अगदी कटाक्षाने फेडला पाहिजे. अन्यथा त्याची ‘आठवण’ घडेल अशाप्रकारची ‘प्रतिकूल परिस्थिती’ निर्माण होते. म्हणून बोललेला नवस हा फेडलाच पाहिजे असेही स्वामी समर्थांचे सांगणे आहे. देवदर्शन घडण्यासाठी सद्गुरूंची कृपा कार्यास येते परंतु त्याच्यासाठी आचार, विचारांची शुद्धता अपेक्षित आहे.  

श्री स्वामींनी आपल्या एकूण प्रकट वास्तव्यातील ४० पैकी २१ वर्षे अक्कलकोट येथे घालवली. शके १८०० मध्ये त्यांनी वडाखाली समाधी घेतली व ते निजानंदी निमग्न झाले. समाधीपूर्वी  एक वर्ष अगोदरपासूनच त्यांनी आपल्या अवतार समाप्तीची चर्चा भक्तमंडळीत सुरू केली होती. अवतारसमाप्तीचे आधी आठ दिवस त्यांनी ‘अखंड नाम-भजन’ सुरू ठेवले. देहप्रकृती ही नाशवंत असल्याने पुढे त्यांना ज्वर भरला. त्यांनी अन्नत्यागही केला. नंतर मंगलस्नान करून ते ध्यानमग्न झाले. त्यावेळी भक्तांनी त्यांना विचारले की, आपण बरे केव्हा व्हाल? तेव्हा स्वामी उत्तरले,

" जेव्हा पंढरी जळेल । 

अथवा डोंगर बोलतील । 

तेव्हाच आराम पडेल । 

दु:ख विव्हळ का होता”


म्हणजेच देहसमप्तीनंतर त्यांचे जगदोद्धाराचे कार्य आणखी अनेक वर्षे चालू राहणार आहे. भक्तांची समजूत घालून श्रीस्वामींनी त्यांना दु:खी कष्टी होऊ नका असे सांगितले व गीतेतील श्लोकांचा उच्चार केला.


‘अनन्याश्चिंतयंतो मां ये जन: पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्’


अनन्यभावाने शरण येऊन जो माझी भक्ती करतो, नामस्मरणात्मक भक्तियोग आचरितो त्याचा योगक्षेम मी चालवेन, असे अभिवचन स्वामींनी आपल्या भक्तास दिले आहे. हा श्लोक म्हणत त्यांनी ध्यानमग्न अवस्थेत त्यांनी आपल्या शाश्वत देहाचा त्याग केला. त्या दिवशी मंगळवार, चैत्र वद्य त्रयोदशी ही तिथी होती.

~ प्रस्तुती व निवेदन :-

 श्री वामन रूपरावजी वानरे.


No comments:

Post a Comment