TechRepublic Blogs

Friday, February 21, 2025

किती योग्य?

 *पादुकांवर अनुग्रह -  किती योग्य ?* -- भाग १.

      आज एका श्रीभक्ताचा मेसेज आला - मी साई शक्तिपीठात सांगितलं की मी गोंदवलेकर महाराजांचा समाधीवर अनुग्रह घेतला आहे, तर त्यांनी विचारलं समाधीवरचा अनुग्रह हा काय प्रकार आहे ? अनुग्रह प्रत्यक्ष गुरूकडून घ्यायचा असतो, गुरुमंत्र हा गुरुमुखांतून संथा घेऊन शिकायचा असतो.

      ह्या श्रीभक्तासारखीच स्थिती इतरही काही भक्तांची होण्याची शक्यता आहे. ज्यांना अनुग्रह घ्यायचा आहे, त्यांच्याही मनात श्रीमहाराज देहरूपाने नसल्यामुळे समाधीपुढे श्रीमहाराजांच्या पादुकांवर मस्तक ठेवून मंदिरातील पुजार्‍यांकडून मंत्र घेणे कितपत योग्य आहे अशी शंका येण्याची शक्यता आहे. श्रीमहाराजांचे श्रेष्ठ साधकच ह्याबाबतीत प्रकाश पाडू शकतील याची खात्री आहे. पण तरीही माझ्या अल्प मतीप्रमाणे शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करतो.

       आपण आजारी पडलो की डॉक्टरच्या दवाखान्यात जातो. डॉक्टर तपासून बाहेर थांबायला सांगतात. थोड्या वेळाने डॉक्टरांचा कंम्पौंडर आपल्या हातात गोळ्यांच्या काही पुड्या देऊन त्या कशा घ्यायच्या ते समजावतो. आपण त्या गोळ्या घेऊन आजारातून बरे होतो. आपल्याला कोणी विचारलं," औषध कोणी दिलं ?" तर आपण डॉक्टरचं नांव सांगतो, कंम्पौंडरचं नाही, खरं ना ? जरी कंम्पौंडरने गोळ्या दिल्या तरी आपण डॉक्टरचं नांव सांगतो कारण आपली खात्री असते की डॉक्टरने सांगितलेल्या गोळ्याच कंम्पौंडरने दिल्या असणार. आपण ते औषध घेतो कारण आपल्याला आजारातून बरे व्हायचे असते म्हणून.

      तद्वतच भवरोगापासून मुक्त होण्यासाठी आपण गुरू करतो. गोंदवल्यास आपण अनुग्रह घेतो तेव्हां समाधीमंदिरात श्रीमहाराजांच्या पादुकांवर आपण मस्तक ठेवतो. आपल्या डोक्याला व पादुकांना झाकण्यासाठी वर एक वस्त्र टाकलं जातं आणि गुरुजी आपणास त्रयोदशाक्षरी मंत्राची दिक्षा देतात. आता हा मंत्र मिळतो तो प्रत्यक्ष श्रीमहाराजांकडूनच मिळतो अशी आपली भावना असते. मी अनुग्रह घेतला तेव्हां कोण गुरुजी होते ते मला ठाऊक नाही आणि तसे जाणण्याची कधी आवश्यकताही वाटली नाही, कारण श्रीमहाराज मला अनुग्रह देत आहेत अशी माझी खात्री होती आणि अजूनही खात्री आहे.

      समाधीमंदिरातील गुरुजींची नियुक्ती पंचमंडळी करतात. आणि मुख्य म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच  गोंदवल्यात फक्त चार पंच नेमले जातात. श्रीमहाराज हे पाचवे आणि मुख्य पंच आहेत ही जाणिव आणि खात्री सर्वांनाच आहे. तर मग गुरुजींची नियुक्ती मुख्य पंच श्री गोंदवलेकर महाराजांनीच केली असे होत नाही का? मग ज्याप्रमाणे कंम्पौंडरने दिलेले औषध डॉक्टरनेच दिले असे आपण म्हणतो, त्याप्रमाणेच गुरुजींच्या माध्यमातून श्रीमहाराजच अनुग्रह देतात म्हटलं तर त्यात काहीच चूक नाही.

      आपल्याला पोस्टमनने मनीऑर्डरचे पैसे दिले, तरी कोणी पैसे दिले विचारल्यावर बाबांनी पैसे दिले असे म्हणतो, पोस्टमनने असे म्हणत नाही. तद्वतच अनुग्रह हा श्रीमहाराजच देत असतात, गुरुजी नव्हे.

            ----   डॉ. मनोहर वर्टीकर

No comments:

Post a Comment