" चाळीशीच्या उंबरठ्यावर."
" मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे.." या ओळी वाचल्या किंवा नुसत्या कानावर जरी पडल्या तरी डोळ्यासमोर स्त्री सौंदर्य उभे राहते. व.पुं.नी एक विचार व्यक्त केला आहे, " फुलांचा सडा कसाही पडला तरी चांगला दिसतो.." तसंच, साडी नेसलेली, लांब केशसंभार, व त्यावर गजरा किंवा फुल असं परिधान केलेली स्त्री ही मेकअपचा थर जरी नसला तरी छानच दिसते.
तारुण्य हे क्षणैक असते असं मला वाटतं. कारण, तारुण्यात जोश असतो, उमेद असते आणि महत्वाचे म्हणजे शरीर साथ देत असते. हे वाक्य पुरुष व स्त्री दोघांनाही लागू पडते. तारुण्यात प्रवेश केल्यावर लग्न, नोकरी या सर्व कसोट्यांवर उतरताना एक प्रकारचा उत्साह जाणवतो पण.. आता मुळ विषयाकडे वळू, जेव्हा तुम्ही चाळीशीत पदार्पण करता तेव्हा का कुणास ठाऊक पण शरीरात एक प्रकारचा जडपणा जाणवतो. आत्ता पर्यंत डॉक्टर तुमच्या मागे लागले नसतील पण काही ना काही पथ्य सुरू होतात.. आयुष्याभर केलेले कष्ट, मिळालेले अनुभव हे सर्व त्या वयात आठवतात.
व.पुं.नी अजून एक विचार मांडला आहे, " आयुष्यातले काही दिवस अगदी स्वतः साठीच जगावे.." मला सांगा, तुम्ही समजा वयाच्या पंचवीस वर्षांपासून नोकरी करताय, म्हणजे ती नोकरी मिळण्यासाठी धडपड करताना अनेकदा चांगला पगार मिळतो म्हणून कुटूंबाच्या सुखासाठी देखील आपल्या हौसांचा त्याग करावा लागतो, पुढे लग्न होते, मुलं होतात, मग त्यांच्या शिक्षणाचा खर्च या सगळ्यात आपलं स्वतःसाठी जगणेच राहून जाते. हे झालं पुरुषांचं. स्त्री म्हटलं की अनेक जबाबदाऱ्या या आल्याच. आता इथे व.पुं.नी लिहिलेला आणखीन एक विचार मांडते, " बाई हा विषयच मुळात सुंदर. आणि कामात दंग झालेली बाई तर विलक्षण देखणी दिसते.." यामध्ये, आपल्या सारख्या मध्यमवर्गीय स्त्रीयांना चाळीशीत अनेक समस्या भेडसावतात. एक स्त्री वेळेला दोन व्यक्तींचं आयुष्य जगत असते. नवरा हा जर साथ देणारा असला तर तिचा त्रास कमी होतो पण त्याची साथ नसेल तर मात्र स्ट्रेस, काळज्या यामुळे ती पिचून जाते. अशी वर्ष जेव्हा सरत जातात तेव्हा कळतं अरेच्चा आपली चाळीशी पार होते आहे. मग " मेनोपाॅझ " सुरू झाला आहे हे लक्षात येते. अशा वेळी वजन वाढणे, स्वभावात चिडचिडेपणा येणे, अन्न नको वाटणे या दिव्यातून ती जात असते. म्हणून मला वाटते, वयाचा विसर पडायला लावणारा चित्रपट म्हणजे आयुष्य..
पुरुष असो किंवा स्त्री, चाळीशी ओलांडताना दोघांनाही काही प्रमाणात त्रास होतो. पण अशा वेळी गरज असते ती आधाराची. मग व.पु. परत म्हणतात, " माणसाला बळ देतं ते दुसरं माणूसच.." पुरुष आपल्या व्यथा चारचौघात सांगू शकत नाहीत. पण जेव्हा पत्नीचा आधाराचा हात पाठीवर पडला की ते देखील सुखावतात. तसं म्हटलं तर, दोघांनाही असे वाटते की, कोणीतरी म्हणावं, थांब, श्वास घे. मेहनत करणाऱ्या या दोन प्रवाशांना असं एक मुक्कामाचं ठिकाण हवं असतं जिथे ते विसावा घेऊ शकतात. बऱ्याचदा, काही लोकं म्हणतात, चाळीशी आली तरी अजून स्थिर नाही. पण स्थिर होण्यासाठी करावी लागणारी मेहनत ही त्या व्यक्तीलाच माहित. कारण, नंतर जरी स्थिर झाले तरी आयुष्यातले मौल्यवान क्षण वाळू प्रमाणे निसटून गेले ही सल मनात राहते.
" बाईपण भारी देवा.." या चित्रपटात एक डायलॉग आहे, ३६५ दिवसांपैकी एक दिवस सेलिब्रेशन ते असतं वाढदिवसाला आणि उरलेले ३६४ दिवस फक्त काळज्या, स्ट्रेस एवढंच.. म्हणूनच ही चाळीशी प्रत्येकाला काही ना काही शिकवून जाते हे खरं..
.. मानसी देशपांडे
No comments:
Post a Comment