चिंतन
श्रीराम,
आपले मन जर निःस्वार्थी असेल, समाधानी असेल तर आपल्याला आयुष्यात कधीच कमी पडणार नाही किंवा दुसऱ्याचे सुख बघून आपल्याला कधीच दुःख होणार नाही. दुसऱ्यांच्या सुखामध्ये सुख मानणे ही गोष्ट निरोगी मानसिक आरोग्याचे लक्षण आहे. ज्यांचे चित्त प्रसन्न असते त्यांचे मन शांत असते. इतरांबरोबर त्यांना छान जुळवून घेता येते. आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचे आहे ते त्यांचे ठरलेले असते. त्यांच्या मनावर त्यांचा पूर्ण ताबा असतो. तसेच जीवनातले ताण - तणाव, काळजी सहन करण्याची त्यांची क्षमता असते. हे सर्व गुण आत्मसात करायचे असतील तर ईश्वरापाशी शरणागती असावी लागते. हे आणि असेच अनेक सत्वगुणांचे स्वभाव विशेष माझ्या मध्ये आहेत का? ह्याचे आत्मपरीक्षण वेळोवेळी करावे लागते.
मन शुद्ध आणि प्रसन्न ठेवायचे असेल तर पहाटे उठून निसर्गाचा आनंद घेता आला पाहिजे. सकाळच्या फ्रेश हवेत ईश्वराच्या नामस्मरणाने दिवसाची सुरुवात झाली पाहिजे. म्हणून समर्थ सांगतात, प्रभाते मनी राम चिंतीत जावा...
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment