TechRepublic Blogs

Thursday, March 14, 2024

निष्ठा

 श्रीराम समर्थ


          गोंदवल्यास दांडेकर* आडनावाच्या एक वृद्ध नामनिष्ठ बाई रहात असत. एक दिवस दुपारचे जेवण झाल्यावर ब्रह्मानंद महाराज दांडेकर बाईंच्या खोलीत विश्रांती घेत होते तेव्हां त्यांना बाईंच्या कण्हण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी पाहिले तर बाईंच्या अंगात खूप ताप होता. आता ताप सहन होत नाही असे त्या म्हणाल्या. म्हणून ब्रह्मानंद महाराजांनी श्रीमहाराजांना बोलावून आणले. *श्रीमहाराज म्हणाले, बाई, हे देहाचे प्रारब्ध आहे ते सोसले पाहिजे. यावर बाई म्हणाल्या की पण ते सोसवेल असे करा. श्रीमहाराज म्हणाले, करतो, पण तीन दिवसांऐवजी सहा दिवस ताप येईल. त्या ठीक म्हणाल्या आणि सहा दिवसांनी त्यांना बरे वाटू लागले !*


         ब्रह्मानंद महाराजांनी ही घटना कोणासच सांगितली नाही. तरीदेखील कर्णोपकर्णी ही गोष्ट लोकांना समजली. तेव्हां श्रीमहाराज भाऊसाहेबांना म्हणाले, 'भाऊसाहेब सबंध दुपार मी तुमच्याबरोबर होतो ना ! आणि पहा, लोक काय वाटेल ते उठवतात.'


         बरे झाल्यावर दांडेकर बाई श्रीमहाराजांना म्हणाल्या की 'महाराज,आपण सदैव माझ्याबरोबर असावे.' तेव्हां *श्रीमहाराज म्हणाले, 'मी नेहमी असतोच. तुमची निष्ठा असली तरच माझे अस्तित्व जाणवते.'* 


         हे सांगून पू बाबा म्हणाले की ही निष्ठा येण्यास शरणागतीसारखा उत्तम उपाय नाही.


                *********

*श्रीआईसाहेबांच्या समाधीवर सीताबाई दांडेकर यांच्या पुढाकाने १९३५ चे सुमारास दगडी मंदिर बांधण्यात आले असा उल्लेख चैतन्य स्मरण १९८८ या स्मरणिकेत आहे. [पान २१]. वरिल गोष्टीतील दांडेकर बाई यांच असाव्यात असा अंदाज आहे.


               *********

संदर्भः *अध्यात्म संवाद भाग पहिला पान ५१ - ५२* 

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

No comments:

Post a Comment