*॥श्रीहरिः॥*
हे सर्व विश्व आत्मस्वरूप वासुदेव असले, तर तसे ज्ञान अन्य देवतांच्या उपासनेने का होत नाही, असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण सांगतात,
॥ॐ श्री परमात्मने नमः ॥
अथश्रीमद्भगवद्गीता सप्तमोध्यायः
*कामैस्तैस्तैर्हृतज्ञाना:*
*प्रपद्यन्तेऽन्यदेवताः ।*
*तं तं नियममास्थाय*
*प्रकृत्या नियताः स्वया ॥*
*॥७.२०॥*
(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग ७.२०)
*भावार्थ:- आणि हे अर्जुना ! ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहेत, ते अन्य देव-देवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात.
*अर्थार्थी आणि आर्त* भक्त हे कोणत्या ना कोणत्या कामनेच्या पूर्ततेसाठी ईश्वराची भक्ती करतात, हे आपण या पूर्वीही वाचलं आहे. आपल्या इच्छा किंवा दुःखांमध्येच ते इतके मग्न असतात, की खऱ्या ज्ञानाकडे त्यांचं लक्षही जात नाही. सर्वत्र वासुदेवच भरून आहे, हे जग वासुदेवमय आहे हे जाणूनही लोक अन्य *'देवदेवतांची'* पूजा करताना दिसतात.
*कुणी* सोमवारी शंकराला जातात; तर कुणी मंगळवारी देवीचं किंवा गणपतीचं दर्शन घेतो. कुणी दत्तांचा उपासक असतो तर कुणी मारुतीरायाचा भक्त असतो.लोक ही अशी दर दिवशी वेगवेगळ्या देवतांची पूजा कशासाठी करतात?
*याचं उत्तर देताना भगवंत सांगतात की,*
"प्रत्येकजण जन्मत:च प्रकृतीबरोबर आपला स्वभाव घेऊन येतो. प्रकृतीनुसार त्याला इच्छा-आकांक्षा होतात.त्या इच्छा-आकांक्षा पूर्ती करण्यासाठी हे लोक त्या त्या देवतांची नियमानुसार पूजा करतात."
*ज्यांना* बुद्धी हवी असेल ते गणपतीची भक्ती करतात.ज्यांना धनधान्य हवं असतं ते लक्ष्मीची पूजा करतात. संगीतामध्ये यश मिळवण्यासाठी सरस्वती देवीची आराधना करतात. बलोपासना करणारे मारुतीची भक्ती करतात. अध्यात्म क्षेत्रातले दत्तात्रयांची उपासना करतात. एखादी मागणी ताबडतोब पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर भोळासांब शंकर तयार आहेच,लग्न होत नसेल तर गौरीला (पार्वतीला) शरण जा,अडचणींनी घेरलेले असाल तर नक्कीच शनी देवाचा प्रकोप तर कोणी बुवा- महाराजांना शरण जातात.
*वेगवेगळ्या विभागांचे* जसे वेगवेगळे मंत्री असतात, त्याचप्रमाणे विविध कामनापूर्तीसाठी निरनिराळ्या देवी- देवता कल्पिल्या गेल्या आहेत. शिवाय त्या सर्वांच्या वेगवेगळ्या पूजा पद्धती आणि नियमदेखील बनवले गेले. ज्याचा जसा स्वभाव, ज्याची जशी आवश्यकता, तसा तो त्या विभागाच्या देवाला शरण जातो.
*परमेश्वर* हा केवळ मोक्षदाता आहे, संसारात लागणाऱ्या ज्या ज्या वस्तू किंवा इच्छा आहेत त्या त्या वस्तू किंवा इच्छांची पूर्ती करण्याची शक्ती देवतांमधेच असते, म्हणून देवतांचीच उपासना केली पाहिजे, अशी सामान्य जनांची समजूत असते. तथाकथित आध्यात्मिक पुरुष केवळ देवतांचीच नव्हे; तर एखाद्या बुवा - महाराजांचीही उपासना करायला सांगतात. पुष्कळ जण स्वतःचीही पूजा करून घेतात!
*श्रद्धेनुरूप किंवा परंपरेनुरूप*
जे श्रद्धास्थान असतं त्याची उपासना अशा रीतीनं केली जाते. मग त्या त्या देवतांच्या उपासनेसंबंधी जे जे नियम असतात ते पाळले जातात. कुणी त्या देवतेचा जप करतो, कुणी पोथी वाचतो तर कुणी प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प करतो.कुणी कोटी बिल्वपत्र, लक्ष तुलसीपत्र वाहण्याचा संकल्प करतो तर कुणी प्रतिदिनी दर्शनविधी करतो. कुणी उपास-तापासानं देह झिजवतो तर कुणी कडक व्रताचरण करतो.
*अशातऱ्हेनं* जे लोक (केवळ स्वार्थासाठी) भक्ती करतात ते आर्त अथवा अगतिक किंवा अर्थार्थी असतात. त्यांना परमतत्त्वाशी काही घेणं-देणं नसतं.कर्मशुचितेशी काही कर्तव्य नसतं. आपला भौतिक उत्कर्ष कसा होईल आणि आपले सांसारिक प्रश्न कसे मिटतील, मन:शांती कशी मिळेल एवढ्यापुरतंच त्यांचं अध्यात्म असतं.
*एक सत्य हकीगत आहे.*
एका मंत्र्याचा स्वीय सहाय्यक एका कंपनीत नोकरी करायचा. रोज कंपनीत जाऊन तो मस्टरवर सही ठोकून यायचा. कधी कधी दोन-तीन दिवसाच्या सह्याही एकदाच करून यायचा. कारण पेन्शन वगैरेसाठी ते करणं आवश्यक असायचं. त्याला कुणी बोलत नसे; कारण मंत्र्याचा पी.ए.!
*पण* दत्तजयंतीच्या आधी नऊ दिवस अगदी न चुकता पोथीचं पारायण मात्र करायचा! म्हणजे कामचुकारपणा करायचा आणि पुण्य मिळवल्याच्या भ्रामक आनंदात रहायचं - धार्मिक म्हणून मिरवायचं! अशी भक्ती फलद्रूप होईल का?
*प्राप्त, नियत कर्म* टाळायचं आणि पगार मात्र फुकटात पदरात पाडून घ्यायचा. वर गुरुचरित्राचं पारायण करून धार्मिक म्हणून मिरवायचं आणि असल्या विचारहीन कर्मकांडातून पुण्याची अपेक्षा बाळगायची! यातला खोटेपणा, कामचुकारपणा परमेश्वराला कळत नाही का?
*हृदयात बसून जीवाचा हेतू आणि कर्माची नोंद तो करत असतो. पण अडाणी उपासकाला मात्र त्याचा पत्ताच नसतो! मेल्यावर त्याला केलेल्या कुकर्माची जाणीव होते. मग कर्मानुसार फळ मिळतं.*
*सारांश:*
*ज्याची जशी श्रद्धा तसा त्याचा देव असतो. स्वभाव आणि प्रकृतीनुसार मनुष्य त्या त्या देवतांची उपासना करतो. धार्मिक स्थळांचे उंबरठे झिजवतो. वरसंशोधनासाठी वरपिता जसा हिंडत असतो तसा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आर्त आणि अर्थार्थी भक्त इष्ट देवदेवतांची उपासना करीत हिंडत फिरतो.*
श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीता भाष्य.
*।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।*
No comments:
Post a Comment