TechRepublic Blogs

Wednesday, March 27, 2024

अखंड नाम*

 श्रीराम समर्थ


               *अखंड नाम*


          जबलपूरच्या जवळ भेडाघाटावर एक महात्मा पडलेले असत. एकदा हृषिकेशचे महामंडलेश्वर स्वामी चैतन्यगिरि स्नान करण्यास नर्मदेकडे निघाले. तेव्हां हा तरुण साधु वाटेत पडलेला त्यांना आढळला. स्वामी त्याला म्हणाले *'अरे महात्मा ! तूं घरदार सोडून साधु झालास आणि नुसते भजनसुद्धा करीत नाहीस, स्वस्थ पडला आहेस !'* स्वामींचें बोलणें ऐकून त्या साधूनें डोळे उघडून किंचित स्मित केलें. त्यानें स्वामींना जवळ बोलावलें आणि आपला हात त्यांच्या कानावर ठेवण्यास सांगितलें. स्वामींनीं त्याचा हात आपल्या कानावर ठेवला. तेव्हां *त्यांच्या हातातून भगवंताचें नाम अखंड चाललेलें स्वामींना ऐकूं आलें.* नंतर त्या साधूनें आपलें डोकें, आपली छाती, आपले पाय यावर स्वामींचे कान ठेववले. *त्याच्या प्रतेक अवयवातून भगवंताच्या नामाचा स्पष्ट ध्वनि स्वामींना ऐकूं आला.* चैतन्यगिरिस्वामी तर चकित होऊन गेले. *हा कांहीं चमत्कार नाही. भगवंताच्या एकाच नामाचा चिकाटीनें अभ्यास केला तर शरीरातील पेशी तें नाम शोषून घेतात. मग त्या नामाची स्पंदनें शरीराच्या अवयवांमधून उमटतात.*


               ---------- *प्रा के वि बेलसरे*


               **********

संदर्भ: *साधकांसाठी संतकथा हें त्यांचेच पुस्तक पान ५६/५७*

संकलन: श्रीप्रसाद वामन महाजन

No comments:

Post a Comment