*॥श्रीहरिः॥*
विविध देव-देवतांची उपासना करणार्या सकाम भक्ताविषयी भगवंत सांगतात..
॥ॐ श्री परमात्मने नमः ॥
अथश्रीमद्भगवद्गीता सप्तमोध्यायः
*यो यो यां यां तनुं भक्तः*
*श्रद्धयार्चितुमिच्छति ।*
*तस्य तस्याचलां श्रद्धां*
*तामेव विदधाम्यहम् ॥*
*॥७.२१॥*
*स तया श्रद्धया युक्तस्-*
*-तस्याराधनमीहते ।*
*लभते च ततः कामान्*
*मयैव विहितान्हि तान् ॥*
*भावार्थ:- जो जो सकामी भक्त ज्या ज्या देवतेच्या स्वरूपाला श्रद्धेने पूजण्याची इच्छा करितो त्या त्या भक्ताची मी त्याच देवतेच्या ठिकाणी अद्धा स्थिर करतो.*
*अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करत असतो.*
*-----------------------------*
*भगवान श्रीकृष्ण सांगतात,*
जो मनुष्य ज्या देवतेला ईश्वरस्वरूप मानून पूजा करतो, त्याच देवासाठी मी त्याच्यामध्ये श्रद्धा स्थापित करतो. ज्यामुळे तो अधिक भ्रमित होऊ नये. मग त्या देवतांच्या माध्यमातून, मी त्याच्या इच्छित कामना पूर्ण करतो.
*भक्त* ज्या रूपाची आराधना करतात त्या रूपातच भगवान त्यांची श्रद्धा दृढ करतात. ही श्रद्धा टिकवण्यामागे भगवंतांचा हेतू मनुष्याला सश्रद्ध करण्याचा असतो. मनुष्यामधे अनेक रस मुळातच असतात.भक्तिरस हा मात्र निर्माणच व्हावा लागतो.तो अंत:प्रेरणेनं निर्माण होतो. ईश्वरानंच तशी व्यवस्था केली आहे.तो कोणत्याही कारणानं निर्माण झाला तर सर्वप्रथम तो स्थिर करावा लागतो - मग श्रद्धा कुठे का बसेना!
*मनुष्याचं क्षुद्रत्व नष्ट व्हावं आणि त्याचा अध्यात्ममार्गावर प्रवास प्रारंभित व्हावा हाही हेतू त्यामागे असतो.*
*भगवंत म्हणतात,*
वास्तवात भक्ताला फळ मीच देतो. परंतु तो मला जाणत नसल्याने त्याला वाटतं, अमुक देव प्रसन्न झाल्याने मला फळ मिळालं. त्यामुळे तो श्रद्धापूर्वक त्यांची पूजा करतो.
*जसं,*
एका घरात पाण्याचा सोर्स म्हणजे छतावर असणारी पाण्याची टाकी आहे आणि घरातील दोन सदस्य वेगवेगळ्या बाथरूममध्ये अंघोळ करत असतात. तेव्हा एका नळातून अचानक पाणी यायचं बंद होतं. त्यावेळी तिथला मनुष्य ओरडतो,
'माझ्या नळातून पाणी येत नाहीये..'
त्याचवेळी दुसरा मोठ्या आवाजात म्हणतो,
'पण माझ्या नळातून तर येतंय...'
आता ज्याच्या नळातून पाणी येत नाही तो नळालाच दोष देऊ लागतो.
'या नळामध्येच काहीतरी बिघाड आहे. उद्या दुसऱ्या बाथरूममध्ये अंघोळ करेन. तिथला नळ तर चांगला आहे.'
प्रत्यक्षात अडथळा तर वर पाण्याच्या टाकीमध्येच असतो. मात्र लोकांना फळ मिळतं त्यावेळी त्यांना वाटतं, की आपल्या आराध्य देवानेच ते दिलं, प्रत्यक्षात फळ ईश्वराकडून व्हाया (via) देवतेकडून येतं.
*मनुष्य* जेव्हा अंतःकरणापासून एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो, तेव्हा ती ईश्वरापर्यंत पोहोचते आणि पूर्णदेखील होते. ईश्वराची हीच इच्छा असते, की कमीत कमी या देवतांच्या मूर्तीच्या माध्यमातून तरी मनुष्यामध्ये श्रद्धा, प्रेम, भक्ती, विश्वास जागृत होऊन तो समर्पित व्हावा. परंतु अज्ञानी मनुष्याला असं वाटतं, की तो ज्या ईश्वराच्या मूर्तीची पूजा करतो, त्याच ईश्वराने त्याची प्रार्थना ऐकली आहे.वास्तविक ईश्वर किंवा परमात्मा हा एकच असून ईश्वराच्या विविध मूर्ती हा त्या सत्याकडे केला गेलेला केवळ संकेत आहे, मात्र या गोष्टीपासून तो अनभिज्ञ राहतो.
*मनुष्याने* एखाद्या देवतेकडे काही याचना केली आणि त्याची ती इच्छा पूर्ण झाली नाही तर तो दुसऱ्या देवतेला शरण जाण्यासाठी तयार होतो. काही लोक असेही असतात जे म्हणतात,
'अरे! तुझं ते काम झालं नाही का? मग अमुक मंदिर ट्राय कर... अमुक देवीच्या दरबारात जाऊन ये...' असे सल्ले देतात!
लोकांकडे देवी-देवतांची इतकी भलीमोठी यादी असते, की प्रत्येक दिवशी त्यांना वेगवेगळ्या देवाची पूजा करता येईल. कारण ते देवतांनाच ईश्वर मानतात. जितक्या देवता तितके ईश्वर! वास्तविक यालाच अज्ञान म्हणतात.
*तसं* बघितलं तर प्रत्येक ठिकाणी ईश्वराच कार्य करत असतो.भक्तामध्ये प्रार्थनेची अवस्था जागृत करणारा, त्याच्यात श्रद्धा स्थापित करणारा- देखील ईश्वरच आहे. तसंच त्याची प्रार्थना पूर्ण करणारा किंवा न करणारादेखील तोच एकमेव आहे.
*जसजशी* उपासना, साधना वाढत जाते. ईश्वराविषयीची समज वृद्धिंगत होत जाते तसतसा त्याच्याविषयीचा प्रेमभाव, श्रद्धाभाव वाढीला लागतो आणि त्या श्रद्धेची फळं त्यांना त्या त्या देवतांच्या रूपानं परमेश्वरच देतो.
*सारांश:-*
*जशी ज्याची श्रद्धा असते तसे त्याला फळ मिळते. देवता कोणतीही असो फळ देणारा परमेश्वरच असतो.*
श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीता भाष्य.
*।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।*
No comments:
Post a Comment