TechRepublic Blogs

Wednesday, December 3, 2025

नामस्मरण

 *जयश्रीराम 🙏🏻*


*सत्संग व साधना*


आपण सर्व साधक परमार्थाच्या वाटचालीत आहोत. परमार्थाच्या या वाटचालीत देवप्राप्तीचे साधन म्हणजे "सत्संग" होय. संताचा भक्तमेळा म्हणजे सत्संग. आपण म्हणतो कधी कधी वाण तसा गुण. हा चांगला गुण येण्यासाठी सत्संग जरूरीचा असतो. सत्संग हा देवाचा, गुरूचा,संताचा  धरावा. या जगात सत्संग सामर्थ्यवान आहे. जेथे दया,मैत्री व विनय ही लक्षणे वास करतात तेथे संत, साधू व सदगुरू यांचा सत्संग लाभतो. त्यांचा सहवास, त्यांची कृपा हा सत्संग होय. सत्संग हा परमार्थाचा पाया आहे ज्यामुळे आपण सर्व साधक परमार्थाची उच्च पायरी जी साधना आहे ती गाठू शकतो. कारण त्यामुळे आपला अहंकार गळून पडतो तर विनय, क्षमा, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान या गोष्टी कडे आपला कल असण्यास मदत होते. 

सत्संगाने मनुष्य देहाची दुर्लभता कळून येते आणि मग त्यातून भक्तीमार्ग जवळ करून ईश्वरप्राप्तीचे ध्येय निश्चित करतो. यासाठी सद्गुरू, परंपरा व साधना याचा  स्विकार करतो व आपली "साधकावस्था" सुरू होते. म्हणूनच साधना मार्गावरचा महत्वाचा टप्पा म्हणजे सत्संग.  

सत्संगाने ईश्वर प्राप्ती होते म्हणून सत्संग स्विकारताना दुःसंगाचा त्याग केला पाहिजे. दुःसंगाचा म्हणजे काय तर परमार्थावर विश्वास नाही, ज्याच्या मनात कायम शंका, द्वेष,अधर्म आहे, बाहेरून विनय आहे पण अंतःकरणात संताविषयी द्वेष आहे याची संगती म्हणजे दुःसंग. हा सगळा दुःसंग सत्संगाने नाश होण्यास मदत होते. 

यासाठी आपल्या वाणीला   नामाचे साधन द्यावे. नाम हे सत्संगाचे खरे स्वरूप आहे. नामस्मरण या साधनप्रक्रीयेत देव व सद्गुरू उपस्थित असतात.

नामस्मरण हाच सत्संग व नामस्मरण हीच साधना !!!


*🚩🍂जय श्रीराम 🍂🚩*


*सौ. निलिमा कुलकर्णी*

Tuesday, December 2, 2025

मुळापासून सुधारणा

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*


*वेदाप्रमाणे  नामही  अनादी ,  अनंत ,  अपौरुषेय  आहे .*

शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की, कृतयुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने, आणि द्वापारयुगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते. परंतु कलियुगामध्ये त्यांपैकी काहीच साध्य होणे शक्य नसल्याने, भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते.

 शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वत: अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की, साडेतीन कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते; आणि तेरा कोटी जप केला असता, भगवंताचे दर्शन होते. मला आपण महत्त्व देऊ नका; पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो, ते ज्ञानेश्वरमहाराज, एकनाथमहाराज, तुकाराममहाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील, हे शक्यच नाही. 

वेदांना जे परमात्मस्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्रूपत्वाने जाणतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली आहेत, म्हणून संतांनी कळवळून ‘ नाम घ्या ’ असे सांगितले.


वेद भगवंताचे वर्णन करतात. नामदेखील भगवंताचेच अस्तित्व प्रकट करते. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी ‘ हरि: ॐ ’ असते, ते नामच आहे. जसा वेद हा अनादि, तसे नाम हे अनादि. जसा वेद हा अपौरुषेय, तसे नाम हे अपौरुषेय. जसा वेद हा अनंत, तसे नाम हे अनंत आहे.

 प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले, म्हणून ते अनादि साधन आहे. इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहारविहाराची बंधने आहेत, भगवंताच्या नामाला ती नाहीत. नाम हे आगंतुक नाही. आदिनारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ॐ चा ध्वनी केला तेच नाम होय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की, आपण नाम घेत जावे.

 किंबहुना, आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे. वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करीत असताना, म्हणजे वेद म्हणत असताना, आपले लक्ष शब्दांकडे नसावे, त्यांच्या अर्थाकडे असावे. अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावे.

 आपण नेमके तेवढेच विसरतो. नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्याविरुद्ध वर्तन करू नये. आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे. 

भगवंताला लबाडी खपत नाही. आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवितो. इतक्या तन्मयतेने नाम घ्या की, ‘ मी नाम घेतो आहे ’ हे सुद्धा विसरून जा.


*२०३ .  इतर  साधनांनी  लवकर  साधल्यासारखे  वाटेल  पण  ते  तात्पुरते  असते .  नामाने  थोडा  उशीर  लागेल ,  पण  जे  साधेल  ते  कायमचे  साधेल ,  कारण  नामाने  मुळापासून  सुधारणा  होते .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Sunday, November 30, 2025

नाम सत

 नामाच्या बाबतीत त्याच्या खरेपणाची जाणीव कां होत नाही ? आपण स्थळ, काळ आणि निमित्त किंवा कार्यकारणभाव ह्या तीन बंधनात वावरतो. नाम हे त्याच्या पलीकडे आहे. नाम घेताना काळाचा विसर पडणे ही पहिली पायरी. नामाला बसला की की बसला कितीवेळ नाम चाललं आहे याचं भानच राहणार नाही. दुसरी पायरी स्थळाचा विसर पडणे. 

या दोन्हीही पायऱ्या साधणे एकवेळ शक्य आहे पण तिसरा कार्यकारणभाव नाहीसा होणे कठीण आहे. मी नाम घेतो, त्यातून अमुक व्हावे , समाधान मिळावे , ज्ञान व्हावे असे काहीतरी राहतेच. नाम घेण्याला काही कारण नाही असे होत नाही.  विचार केला तर माझ्या "असण्याला" काही कारण नाही. 

मी आहे म्हणजे आहे. त्याला दुसरे कारण नाही . माझे असणे सिद्ध करायला दुसऱ्या कशाची जरुरी नाही. मी का जगतो प्रश्न निराळा.त्याचे काहीतरी उत्तर मिळेल. पण मी का आहे याला उत्तर नाही. तसे नाम केवळ आहे. माझे असणेपण जसे मला जाणवते तसे नामाचे असणेपण जाणवणे , म्हणजेच नामाचे नसणेपण कधीही नसणे ही नामाची वास्तव्यता , सत्यता आहे. 

मी जसा जिवंत आहे तसं नाम जिवंत आहे . ते सत आहे तसेच ते चितही  आहे . हा नामाचा वेगळा चैतन्यमय पैलू आहे . नाम सत आणि चित आणि तसेच ते आनंदमय ही आहे. आनंदाशिवाय  त्यात काही नाहीच.

Saturday, November 29, 2025

पर्यवसान

 *🍁🌹!!श्रीराम समर्थ!!🌹🍁* 


*भिकाऱ्याला पैसे द्यावेत का?*


*भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे? यासाठी भिकाऱ्याला पैसे देतांना उगीच वाद घालू नये. तसे करणे म्हणजे काहीही न करण्याची बुद्धी होय. तेव्हा भिकाऱ्याची योग्यता आणि आपली कुवत बघून पैसे द्यावेत, पण कधी नाही म्हणू नये.*

*मला जो पैसा मिळतो तो सारा माझ्या श्रमाचा असतो असे नाही. तेव्हा कोणी आपल्याकडे भीक मागू लागला म्हणजे भगवंताने दान करण्याची संधी मला दिली या भावनेने त्याला काही द्यावे. त्याला वाईट बोलू तर नयेच, दिल्याची आठवण राहणार नाही इतकेच द्यावे. देत गेल्याने देण्याची सवय लागते. भगवंताला सर्वस्व देण्यात शेवटी त्याचे पर्यवसान होते.*


*!! श्रीराम जयराम जय जय राम !!* 


*परमपूज्य सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज*

Thursday, November 27, 2025

 श्रीराम



प्रति, 

प.पू. सद्गुरू श्रीमहाराज

(माझे सद्गुरू गोंदवलेकर महाराज),


शिरसाष्टांग प्रणिपात.


उद्या गुरू पौर्णिमा आहे. त्यामुळे आपले स्मरण मला होणे अगदीच स्वभाविक आहे. 


आपले एक प्रसिद्ध वचन आहे. *"जेथें नाम, तेथें माझा प्राण। ही सांभाळावी खूण।।"* हे वचन माझं तोंडपाठ आहे, परंतु माझी तितकी साधना नसल्याने, मी देहबुद्धीच्या आधीन असल्याने मला या वचनाची अल्पशी अनुभूती देखील नाही. मला गोंदवल्यात यायला आवडते, आपल्या घरचे अन्न (भोजनप्रसाद ) खायला आवडते. आपल्या सहवासात राहायला आवडते. पण तो योग अनेक दिवसांत आला नाही. आज आपली आठवण अनावर झाली, म्हणून हे पत्र लिहीत आहे. हे पत्र प्रातिनिधिक आहे, आपल्या प्रत्येक भक्ताच्या मनात कमीअधिक प्रमाणात माझ्या सारखीच भावना असेल...!


प्रपंच करताना दिवस कसे पटापट निघून जातात ते कळत देखील नाही. कालच गोंदवल्यात जाऊन आलो असे म्हणता वर्ष कधी होत ते लक्षात देखील येत नाही. आम्ही बेमालूमपणे प्रपंचात गुरफटले जात असतो.....


*आपण म्हणता की अनुसंधान ठेवत जा, पण खरं सांगू महाराज, नेमके तेच मला जमतं नाही. सुखाचा प्रसंग आला की मी किती आणि कसा मोठा झालो आहे असे वाटते आणि दुःखाचा प्रसंग आला की मला आपली आठवण येते. आपण मला अनुग्रह देऊन कृपांकित केले आहे, परंतु मला तसे कायम वाटत नाही. माझी देहबुद्धि मला फसवते आणि ती माझ्यावर स्वार होते. सर्व कळलं असं वाटतं, पण प्रत्यक्ष आचरणात काहीच येत नाही. मी नामस्मरण या विषयावर खूप छान चर्चा करतो, चांगलं व्याख्यानही देतो, परंतु माझं नामस्मरण किती होतं, हे आपल्याला माहीत आहेच. जो सर्वज्ञानी आहे, त्यापासून काय लपुन राहणार...?*


*मी या पत्रात काय लिहिणार आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत आहे, परंतु आपल्याशी बोलून माझं मन हलकं होतं, म्हणून हा प्रयत्न.....!  आई पुढे चूक मान्य केली, तिची क्षमा मागितली की आई जवळ घेते, मायेने कुरवाळते आणि आपलं बाळ 'द्वाड' आहे हे माहीत असूनही म्हणते, बाळ माझं गुणांचं!!!  हे मायेचे बोल ऐकण्यासाठी माझे कान व्याकुळ झालेत हो महाराज!!* आपण अखिल ब्रह्मांडाच्या माऊली आहात. आपल्या मुलाला जवळ घ्या. मी अनेक वेळा चुकतो, करू नको ते करतो , अनेकांची मने दुखावतो, आपल्याला भूषण होईल असे वागत माही. हे सर्व खरं आहे. पण काय करू महाराज, मला सर्व कळतं पण वळत काहीच नाही हो...... आणि जेव्हां कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते....



*श्रीमहाराज, एक करा.... तुम्हीच काहीतरी करा, जेणेकरून मला यातून बाहेर पडता येईल.... प्रपंचाच्या मोहात पडून अधिकाधिक बुडणारा मी, मला फक्त आपला आधार आहे. ज्याला जगाने दूर लोटलं, त्याला आपण मात्र स्विकारले.... आता आपणच माझे मायबाप!!* 


प. पू. श्रीसद्गुरुंच्या समोर कसं बोलावं, कोणता विधिनिषेध पाळावा याचं ज्ञान आणि भान मला नाही. आपण माझ्या माऊली आहात आणि आईशी कसेही बोललं तरी ती माऊली लेकराला समजून घेत असते, साऱ्या जगाने अंतर दिलं, तरी आई कधीच लेकराला अंतर देत नाही. आणि याच भावनेने हे पत्र लिहिण्याचे धाडस मी केलं आहे....! 


या पत्रामागील माझा भाव आपण शुद्ध करून  समजून घ्यावा आणि मला आपल्या चरणांशी स्थान द्यावे ही प्रार्थना!!!



आपला,


दासचैतन्य

सूक्ष्मदृष्टी

 !!!  गोंदवलेकर महाराज  !!!

                 

              महाराजांना प्राणिमात्रांविषयी विशेषतः गाई बद्दल फार प्रेम होते. म्हसवडच्या बाजारात गाई विकायला यायच्या. भाकड गाई कत्तलखान्यात दिल्या जात. महाराज त्या गाई विकत घेऊन सोडवून आणत व कोणालातरी पाळायला देत असत. किंवा स्वतःच्याच गोठ्यात ठेवत. एकदा कसाही म्हणाले, आम्ही तुम्हाला गाई देणार नाही. पण का? मी पैसे देतो ना? तरी ते कबूल होईना. महाराज ठाम असल्याचे पाहून ते कसाई म्हणाले, तुम्हाला जर गाईं विषयी एवढेच प्रेम आहे तर, तुम्ही गाईंना हाका मारा. त्या जर तुमच्याकडे आल्या तर आम्ही निघून जाऊ. महाराजांनी होकार भरला आणि...

         ते प्रेमाने गाईंना हाकारू लागले... गंगे ये.. गोदे ये... यमुना ये... कृष्णा ये... आणि काय आश्चर्य त्या अनोख्या सर्व गाई महाराजांकडे आल्यात. मुक्या जनावरांनाही कळते प्रेम ही आंतरिक ओढ आहे.

              महाराजांकडे एक लंगडी गाय होती. ज्या दिवशी महाराज तिला दिसले नाही, तिच्या पाठीवरून हात फिरवला नाही, प्रेमाने हाक मारली नाही तर, ती अतिशय व्याकुळ होत असे. तसाच बत्ताशा नावाचा घोडा होता. त्याच्यावरून महाराजांनी रपेट मारली की, त्याला छान वाटत असे. केवढे हे भूतमात्री प्रेम?

              महाराज अबूच्या जंगलातून नर्मदेच्या कडेकडेने माहेश्वरी आले. महाराजांचा अधिकार जाणून सर्वच लोक त्यांना मान देत असत. त्यांचा होत असलेला थाटमाट पाहून तिथल्या दोन मांत्रीकांना वाटले की, यांना काही मंत्र सिद्धी प्राप्त आहे. आपण शिकलो तर आपलेही महत्त्व वाढेल. म्हणून ते महाराजां जवळ येऊन म्हणाले, अहो बुवा, तुमच्या जवळचा मंत्र आम्हालाही शिकवा की! महाराज म्हणाले, माझ्याकडे एकच तेरा अक्षरी मंत्र आहे. मांत्रिकांना खोटे वाटले. महाराज सहजासहजी मंत्र देणार नाही याची खात्री झाल्यावर, ते महाराजांना डोंगरावर घेऊन गेले. व धमकी देत म्हणाले. बर्‍या बोलाने मंत्र सांगा. नाहीतर परिणामला सामोरे जा.

         मांत्रिकाने आपल्या मंत्राने नाग उत्पन्न केले. नागांनी सर्व बाजूंनी महाराजांना बांधून टाकले. तीन दिवस महाराज तसेच बसले. चौथ्या दिवशी मांत्रिक म्हणाले, जीव प्यारा असेल तर, आता तरी खरे सांगा. महाराज म्हणाले, माझे रक्षण करायला राम समर्थ आहे. पण तुम्हाला मात्र आपल्या मंत्राला मुकावे लागेल. त्यांना वाटले हा बुवा उगाच गप्पा मारतो. थोड्या वेळाने महाराजांनी जय जय रघुवीर समर्थ म्हणून खाली उडी मारली. सर्व साप मरून पडले. मांत्रिकाची विद्या निष्पळ ठरली. तेव्हा ते दोघेही महाराजांना शरण आले. महाराजांनी त्यांना माफ करून अनुग्रह व राममंत्र दिला. एकाला नर्मदा काठी बारा वर्षे तपश्चर्या करायला सांगितली. व दुसऱ्याला बरोबर घेतले.

          काही दिवसानंतर महाराज उज्जैनला आले. तिथे एक समर्थ भक्त  सरकारी अधिकारी होता. त्याने महाराजांना पाहिले. पण विश्वास बसत नव्हता. त्याने परीक्षा पाहायचे ठरवले. त्याचवेळी त्याचा मुलगा विषमज्वराने आजारी पडला. पाचव्या दिवशी त्याचे जास्तच झाले. नाडी सुटत चालली. त्याला कल्पना सुचली. तो महाराजांकडे घेऊन म्हणाला, महाराज, उद्या आपण माझ्याकडे प्रसादाला यावे.

          मध्य रात्रीच्या सुमारास मुलगा मरण पावला. प्रेत तसेच झाकून ठेवले. दुसऱ्या दिवशी महाराज ५०-५५ लोकांसह ११.३० च्या सुमारास त्या अधिकाऱ्याच्या घरी आले. पंगती वाढल्या गेल्या. आता जेवायला बसणार, तोच त्या अधिकाऱ्याची बायको मुलाला घेऊन आली. म्हणाली, महाराज, हा रात्रीच गेला असताना आपण अन्नग्रहण कसे करणार?

           महाराजांनी त्या मृत मुलाला मांडीवर घेतले. त्याच्या छातीवर हात ठेवल्यावर म्हणाले, हा तर जिवंत आहे. देवाचे तीर्थ अंगारा आणावला. मात्रा चाटवली आणि आश्चर्य म्हणजे तो मुलगा हालचाल करू लागला.  वातावरण एकदम आनंदित झाले. अधिकाऱ्याने महाराजांना क्षमा मागितली. साष्टांग नमस्कार केला. महाराजांनी त्याला दास नवमीला सज्जनगडावर जायला सांगितले.

         महाराजांवर किती किती प्रकारचे कठीण, कडू प्रसंग आलेत. पण सर्वातून ते सही सलामत पार पडले. हे संत लोक स्वानंदातच मग्न असतात. काहीही झाले तरी, निवारण्यास राम समर्थ आहे याची त्यांना पक्की खात्री झालेली असते. त्यांना एकच ध्यास असतो....

" बुडती हे जण देखावे डोळा। 

  म्हणून कळवळा येतो मज।।"

       त्यांना दुसऱ्यांची दुःख पहावत नाही." जगाच्या कल्याणा संताच्या विभूती " अशी या संतांची वृत्ती असते. महाराजांना सूक्ष्मदृष्टी प्राप्त झाल्याने त्यांना पुढचे मागचे कळत असे. ते कोणालाही क्षमा करीत. 

           महाराज इंदूरला असताना भैय्यासाहेब मोडक राजा तुकोजी होळकरांना महाराजांचे भेटीसाठी घेऊन आले. होळकर वेश पालटून आले. मनी ठरवले जर यांनी ओळखलं तर हा खरा साधू! महाराजांनी तुकोजींना मोठ्या प्रेमाने आपल्याजवळ बसवले.  उपदेशपर गोष्टी सांगितल्या. तुकोजींचा भ्रमनिरस झाला. ते महाराजांना शरण गेले.

          साताऱ्याहून पंढरपूरला जाताना मध्ये गोंदवले लागते. त्यामुळे बरेच लोक गोंदवल्याला मुक्कामी असायचे. त्यांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची सर्व व्यवस्था महाराज स्वतः जातीने करीत असत. त्यासाठी मारुती मंदिर व घर अपुरे पडे. म्हणून महाराजांनी मंदिर बांधायचे ठरवले......

        क्रमशः 

संकलन व लेखन,

 मिनाक्षी देशमुख.

Wednesday, November 26, 2025

प्रवचन

 श्रीगुरुपौर्णिमेचे प्रवचन १ व २


ईश्वराला साक्ष ठेवून मी असे सांगतो की, माझ्यापाशी अनुग्रह घेणार्‍यामध्ये सुद्धा मी रामच पाहून वागलो. जर सर्व ठिकाणी राम भरला आहे, तर शिष्यामध्ये तेवढा तो नाही का ? तो माझ्यापेक्षा लहान आहे, हीन आहे, दीन आहे, अज्ञानी आहे, हे पूर्ण जाणूनसुद्धा मी त्याला रामरूप पाहिला. मला वाईट मनुष्य असा दिसतच नाही; नाहीतर तो मनुष्य होऊन जन्माला आलाच नसता. माझे कोणी ऐकत नाही असे मला वाटत नाही. तसेच, मी कुणाचे रक्षण करतो आहे असे मला वाटत नाही. माझे मला रक्षण करता आले नाही, ते भगवंताने केले, तिथे मी जगाचे काय रक्षण करणार ? लहान मुले आणि पेन्शन घेतलेली माणसे मला आवडतात. कारण ती मोकळी असतात; त्यांना बंधन नाही. विद्वानांच्याबद्दल मला आदर आहे, पण प्रेम नाही. त्यांच्यामध्ये असणाऱ्या सरस्वतीबद्दल मला आदर आहे. श्रीमंतांच्याबद्दल मला तिटकारा आहे, कारण पैशाच्या आधारावर ते भगवंताला विसरतात. मला विद्वानापेक्षा अडाणी आवडतो, आणि श्रीमंतापेक्षा गरीब आवडतो. तसेच, मला शहरात राहण्यापेक्षा खेड्यात राहणे आवडते. मला काय आवडते ते मी सांगितले. हा एकेकाचा स्वभाव असतो. सगळ्या साधूंना असेच आवडेल असे काही नाही. एखाद्या मनुष्याला सांगितले की, 'तुझा डोळा घरी ठेवून तू मजकडे ये,' तर तसे त्याला करता येणार नाही; त्याचप्रमाणे मला नामाशिवाय राहता येत नाही. जिथे नाम आहे तिथेच मी आहे. माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर हेच की आपण काळजी करायची नाही; परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावे. मुलांना आणि मुलींना माझे सांगणे असे की, तुम्ही आईबापांची आज्ञा पाळावी, जे करायचे ते मनापासून करावे, प्रामाणिकपणा सोडू नये, आणि भगवंताला विसरू नये. लहान रोपटे चांगले खतपाणी घालून नीट सांभाळले तर ते मोठे होऊन अनेकांना सावली आणि आश्रय देते. तसे, लहानपणी चांगले वागले तर पुढे खरे मोठेपण येईल. मला भेटायला येणाऱ्या मनुष्याच्या मनात काय येते ते सर्व मला समजते; पण व्यवहाराच्या उलट चमत्काराचा प्रकार दाखविणे बरे नाही; म्हणून मी ते प्रकट करीत नाही. मी तुम्हा सर्वांच्या कानाने ऐकतो. आपल्यापैकी कुणीही मनुष्य दुश्चित्त झाला की माझे मन अस्वस्थ होते, आणि नंतर, ही अस्वस्थता कोठून आली याचा शोध करू लागलो की दुश्चित्त माणसाचा मला पत्ता लागतो. माझ्या माणसाने उगाच काळजी करू नये. मी ज्याची हमी घेतली आहे त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी. माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो की, भगवंताच्या इच्छेने प्रपंच केला तर त्यामध्ये काही बिघडत नाही. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा, कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतला आहे. 'मी तुमच्याजवळ आहे' असे मी सांगतो त्यावेळी ती व्यक्ती नसून' परमात्मस्वरूप तुमच्याजवळ आहे' असा त्याचा अर्थ असतो. मी तुमच्याकरिता सर्व काही करतो आहे; तुम्हांला जे काही होईल, ते तुम्ही करा, पण तळमळ करू नका. मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला प्रेरणा करतो असे का मानीत नाही ? वास्तविक जे जे काही तुम्ही करताहात ते मीच करतो आहे, माझीच तशी इच्छा आहे, असे मनी दृढ धरून वागावे. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धारच होणार.


श्रीगुरुपौर्णिमेचे प्रवचन - २


आशीर्वाद. गेले सात दिवस चाललेला उत्सव पाहताना मला असे खरे वाटते की आता तुम्हांला सांगायचे राहिलेच नाही काही ! ज्याची आपण पूजा‍अर्चा करतो, त्याचा हेतू लक्षात घेऊनच, त्याचे म्हणणे आपल्याला पटले आहे म्हणूनच, आपण त्याची पूजा‍अर्चा करतो. तुम्हाला सांगतो, तुमच्या आज जेवढ्या म्हणून अडचणी असतील, ज्या परिस्थितीत तुम्ही गुंतून गेला असाल, ती परिस्थिती कायम ठेवूनसुद्धा, तिच्यात बिघाड न करता, कसे वागावे हेच मी शिकविले - आणि तुम्ही ते आचरणात आणता असा माझा समज आहे, बरे का ! आपल्याला प्रपंचाशिवाय गत्यंतर नाही ही गोष्ट खरी आहे. मनुष्य जन्माला येतो तोच पराधीनतेत येतो, आणि जातो तोही पराधीनतेतच, हे आपण पाहतो. मग, मनुष्य पराधीन असताना, आपण आपली वृत्ती कशी करावी की ज्याने परमात्मा आपलासा करून घेता येईल ?


ज्या गोष्टीची आपल्याला अत्यंत आवड असते तेच आपण भगवंताजवळ मागणार; आणि अत्यंत आवड जर कोणती असेल, तर ज्यात माझा घात आहे तीच आवड मला निर्माण होते आहे, हे आपण पाहतो. म्हणून, मला सांगायचे असेल तर एकच; मी भगवंताजवळ काही मागण्यापेक्षा, "भगवंता, तू दाता आहेस, तू सर्व उचित करणारा आहेस, योग्य तेच करणारा आहेस, तेव्हा मी तुझ्याजवळ काही मागण्यापेक्षा, परमात्मा, तुला योग्य वाटेल ते तू दे, " असे म्हणणे जरूर आहे. "ज्यात माझे कल्याण असेल तेच तू करशील यात शंका नाही; मग मी काहीतरी मागून माझ्याच पायावर मी धोंडा पाडून घेण्यापेक्षा, परमात्मा, तू देशील त्यात मी समाधान मानीन," ही हमी आज आपण भगवंताला देऊ या. मागणारा मनुष्य आपली योग्यता बघून मागत असतो. एखाद भिकारी आला तर 'तुमचे घर माझ्या नावे करुन द्या' असे कधी म्हणायचा नाही; तो म्हणेल , 'मला चार पैसे द्या. एकवेळचे अन्न द्या.' हे जसे तो आपली किंमत पाहून मागतो, तसे दाता कितीही मोठा असला तरी आपली किंमत पाहूनच आपण मागणार ! अहो, तो दाता भगवंत म्हणजे कसा, वस्तूशिवाय समाधान देणारा आहे ! म्हणून, "भगवंता तुला आवडेल ते मला दे; मी जसे व्हावे असे तुला वाटत असेल तेच मला दे, " हेच मागणे जरूर आहे.


जगामधे आपण पाहिले तर दोन प्रकारचे भक्त आहेत. एक भक्त तुमच्या-आमच्यासारखा आहे; तो म्हणतो. "भगवंता तू माझा कधी होशील ? तू माझा होऊन रहा, म्हणजे मला कशाची ददात नाही पडायची. " म्हणजे खोटा खटला केला तरी निकाल माझ्यासारखा लागेल म्हणतो ! दुसरा भक्त आहे तो म्हणतो, "भगवंता, आता माझं उरलं नाही काही. आता मी तुझा होऊन राहीन." यातला फरक तुम्हाला कळतो आहे. 'तू माझा हो' म्हणत असताना, 'मी आहे तसाच कायम राहीन, जे जे मला हवं आहे ते ते तू पुरव !' असे म्हणतो; आणि दुसरा म्हणतो, 'रामा, आता तुझ्याशिवाय मला काही नको, आता मी तुझाच होणार !' आपले मन आपल्याला काय सांगते ? आपण कोणत्या भक्तांपैकी आहो ? आपण पहिल्या भक्तांपैकी असाल तर आपल्याला वर जाणे जरूर आहे. "आतापर्यंत परमात्म्या, मी मागितलेले तू पुरवलेस. आता माझे मागणेही थांबत नाही, तुझे देणेही थांबत नाही. मग वासनेच्या पोटीच माझा शेवट होणार असे दिसते ! तर आता, परमात्म्या, एकच गोष्ट कर - आता मागण्याची बुद्धी मला देऊ नकोस. '


परमात्म्यासारखा दयाळू कोण आहे ? लहान पोर आईच्या मांडीवर असताना आईने चमच्यातून काहीही आणले तरी आऽ करून पिते, असे आपण भगवंताजवळ राहिले पाहिजे खास ! त्या मुलाला खात्रीच असते; आपल्याला मारण्यासाठी आई हे आपल्याला काहीतरी देते आहे अशी शंकासुद्धा त्याला कधी येत नाही ना ? तसे, मी म्हणेन, परमात्म्याने ज्या अवस्थेत आपल्याला ठेवले आहे त्या अवस्थेतच समाधान बाळगणे तुमचे-आमचे खरोखर काम आहे.


पण व्यवहाराची संगत तर सुटली नाही, आणि भगवंत तर हवा, या अवस्थेत आपण काही करणे जरूर असेल तर, व्यवहारात प्रयत्‍न करावा, अगदी आटोकाटीने करावा, पण 'फळ मात्र, भगवंता, तुझ्या इच्छेने काय मिळायचे ते मिळू दे,' असे म्हणून त्यात समाधान मानायचा अभ्यास करावा. तरच तुम्हाला साधेल, नाहीतर नाही साधणार काही; आणि हे जो करील त्याच्या मागे परमात्मा उभा राहील.


मनुष्याचे जीवन अती क्षणभंगुर आहे. आपण पाहतो ना ? किती मोठमोठे होऊन गेले, राम-कृष्णादि अवतार झाले, मोठमोठे सत्पुरुष होऊन गेले; कोणत्या ना कोणत्या निमित्ताने का होईना, पण आज ते दिसेनासे झाले, एवढी गोष्ट खरी आहे. पण अशा सत्पुरुषांनी आपल्या बरोबरीचे असे काही मागे ठेवले आहे की ते त्यांच्या बरोबरीने काम करील.

 देहात असताना ते जे काम करीत तेवढेच काम त्यांची सत्ता करील, एवढी शक्ति त्यामध्ये आहे. ते गेले तरी त्यांची सत्ताच काम करते, त्याचप्रमाणे परमात्मा गेला तरी त्याने आपल्याला वरदान देऊन ठेवले आहे; आणि ते जो जतन करील त्याला मी पावन करीन, त्याचा मी होऊन राहीन, असे वचन देऊन ठेवले आहे. त्याने सांगितले, "तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना ? मग तू एक कर. 

अती दक्षतेने प्रपंच कर, प्रयत्‍नाला कधी मागे पाहू नकोस; पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस, आणि मी जे औषध सांगतो ते घे." आणि ते औषध जर कोणते असेल तर ते भगवंताचे नाम आहे. त्या नामात राहण्याचा खरोखर तुम्ही अभ्यास करा.


इतक्या अट्टाहासाने मी सांगतो आहे - आणि तुम्ही लोक नाम घेत नसाल अशी शंकासुद्धा मला कधी येत नाही, कारण तुम्ही नाम घेत नसता तर इथे येण्याची बुद्धी तुम्हाला झाली नसती; पण तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा - नामाशिवाय जगणे नाही खरे. नामाशिवाय जगू नये असे मला खरोखर मनापासून वाटते. एकदा तरी भगवंताचे नाम घ्या. 

नाम घेत असताना एक दिवस एक नाम असे भयंकर येईल की भगवंत थरारून जाईल, आणि मी सांगतो, तुम्ही असाल तिथे तो उभा राहील खास ! 'कुठे माझा तो आहे' असे त्याला वाटेल. मी सांगतो हे काहीतरी सांगतो आहे असे समजू नका, बरे का ! त्या नामावर विश्वास ठेवून तुम्ही वागा. नामावरची निष्ठा कशी काम करते हे ज्याचे त्यालाच कळेल. तेव्हा, तुम्हाला एकच सांगणे आहे, ही जी पूजा तुम्ही करता, तुम्हाला सांगितलेले आचरणात आणाल तेव्हाच ही पूजा घेतली असे समजा.

 आणि हे जर कराल ना, तर परमात्मा हात दिल्याशिवाय कधी राहायचा नाही. परमात्म्याला तुम्ही-आम्ही दुःखी रहावे असे कधी वाटत नाही. म्हणून परमात्म्याचे होण्यासाठी एकच त्याच्याजवळ मागू. 'तुझ्या नामात प्रेम दे' एवढेच मागू. नामाचे प्रेम ज्याला लागले त्याच्यामागे परमात्मा उभा राहील हे अगदी सत्य, सत्य त्रिवाचा सांगतो बरे का ! आणि इतके जर केलेत तर पौर्णिमा केल्याचे श्रेय तुम्हाला परमात्मा देईल. आता एकच करा, थोडे तरी नाम घेतल्याशिवाय राहू नका. त्याला मोठी क्रिया आणि विधी असतो असे काही नाही बरे का ! आवडीने, प्रेमाने, भगवंताचे नाव घ्या;


॥ जानकीजीवनस्मरण जयजयराम ॥ 

॥ श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोदवलेकर प्रसन्न ॥ 

|| श्रीराम जय राम जय जय राम ||