TechRepublic Blogs

Wednesday, December 3, 2025

नामस्मरण

 *जयश्रीराम 🙏🏻*


*सत्संग व साधना*


आपण सर्व साधक परमार्थाच्या वाटचालीत आहोत. परमार्थाच्या या वाटचालीत देवप्राप्तीचे साधन म्हणजे "सत्संग" होय. संताचा भक्तमेळा म्हणजे सत्संग. आपण म्हणतो कधी कधी वाण तसा गुण. हा चांगला गुण येण्यासाठी सत्संग जरूरीचा असतो. सत्संग हा देवाचा, गुरूचा,संताचा  धरावा. या जगात सत्संग सामर्थ्यवान आहे. जेथे दया,मैत्री व विनय ही लक्षणे वास करतात तेथे संत, साधू व सदगुरू यांचा सत्संग लाभतो. त्यांचा सहवास, त्यांची कृपा हा सत्संग होय. सत्संग हा परमार्थाचा पाया आहे ज्यामुळे आपण सर्व साधक परमार्थाची उच्च पायरी जी साधना आहे ती गाठू शकतो. कारण त्यामुळे आपला अहंकार गळून पडतो तर विनय, क्षमा, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान या गोष्टी कडे आपला कल असण्यास मदत होते. 

सत्संगाने मनुष्य देहाची दुर्लभता कळून येते आणि मग त्यातून भक्तीमार्ग जवळ करून ईश्वरप्राप्तीचे ध्येय निश्चित करतो. यासाठी सद्गुरू, परंपरा व साधना याचा  स्विकार करतो व आपली "साधकावस्था" सुरू होते. म्हणूनच साधना मार्गावरचा महत्वाचा टप्पा म्हणजे सत्संग.  

सत्संगाने ईश्वर प्राप्ती होते म्हणून सत्संग स्विकारताना दुःसंगाचा त्याग केला पाहिजे. दुःसंगाचा म्हणजे काय तर परमार्थावर विश्वास नाही, ज्याच्या मनात कायम शंका, द्वेष,अधर्म आहे, बाहेरून विनय आहे पण अंतःकरणात संताविषयी द्वेष आहे याची संगती म्हणजे दुःसंग. हा सगळा दुःसंग सत्संगाने नाश होण्यास मदत होते. 

यासाठी आपल्या वाणीला   नामाचे साधन द्यावे. नाम हे सत्संगाचे खरे स्वरूप आहे. नामस्मरण या साधनप्रक्रीयेत देव व सद्गुरू उपस्थित असतात.

नामस्मरण हाच सत्संग व नामस्मरण हीच साधना !!!


*🚩🍂जय श्रीराम 🍂🚩*


*सौ. निलिमा कुलकर्णी*

No comments:

Post a Comment