*ब्रह्मविद्येची परंपरा*
अध्यात्माच्या क्षेत्रामधें ब्रह्मनिष्ठ पुरुष भेटणे कठीण तर खरेच; परंतु अत्यंत निर्मल व पवित्र अंतःकरण असणारां साधक भेटणें त्याहून कठीण आहे. केवळ भगवंतासाठीच भगवंताचा शोध करणारीं माणसें दुर्मिळ असतात. हिंग ठेवलेल्या भांड्यामधें दूध घातलें तर ते जसे नासून जातें, अगदी तसेंच ज्याच्या अंतःकरणात प्रापंचिक वासना शिल्लक आहे त्याच्या ठिकाणीं ब्रह्मविद्या ठरूं शकत नाही. म्हणून आपले अंतःकरण शुद्ध करणे हें साधकाचें मुख्य काम आहे. चित्त शुध्द होण्यास प्रथम आपले विकार आवरणे जरूर असतें. विकारांपैकीं कामवासना, राग, लोभ आणि द्वेष ही चांडाळचौकडी महाभयंकर आहे. जगामधें नांवाजलेल्या मोठ्यामोठ्यांवर त्यांचा अंमल चाललेला आढळतो. विकार पूर्णपणें ताब्यांत आले कीं चित्त शांत झालेंच म्हणून समजावें. पण एवढ्यानें भागत नाहीं. विकारांवर स्वामित्व मिळविल्यावर चिंतनशीलता शिकावी लागते. ती शिकण्यास कांही काल एकान्त सेवन करणे फारफार जरूर आहे. प्रथम आपल्या घरांतच एकान्त भोगण्यास शिकावे. रात्रीं घरांतील सर्व मंडळी निजल्यावर किंवा अगदीं पहाटे मंडळीं उठायच्या आधीं अंथरुणावर बसून शांत मनानें भगवंताच्या चिंतनांत मन रमविण्याचा अभ्यास फार उपयोगी पडतो. ज्यांना कोठेंतरीं नदीकिनारीं किंवा गावापासून दूर असलेल्या आश्रमांत जाऊन राहण्याची सोय आहे त्यांनी वर्षातून कांहीं दिवस अशा ठिकाणीं जावें आणि चिंतनाची युक्ति शिकावी. साधकानें मधुकरी मागून राहावें असें ऋषि म्हणतात. आपली रसना आणि अहंकार जिंकण्यास मधुकरीसारखा अन्य उपाय नाहीं. पण आपण आपल्या घरांतच राहून आपण खाणें-पिणें सांभाळलें तरी चालेल. अशा रीतीने शिष्याची तयारी झाल्यावर त्याला सद्गुरु भेटावा अशी तळमळ आपोआप लागते आणि त्याचे कार्य ज्याच्या हातून व्हायचे असते त्या सत्पुरुषाची कांहींतरी निमित्त होऊन गाठ पडते. अगदी प्रथमदर्शनी त्यांचे एकमेकांवर दृढ प्रेम बसून दोघेहि आत्मदर्शनाचा आनंद भोगतात. शिष्य तयार झाल्यावर तो देखील आपल्या गुरूचे कार्य बिनबोभाट चालवतो आणि अशा प्रकारें ब्रह्मविद्येची परंपरा चालू राहाते. आज आपलें काम उत्तम शिष्य बनणे आहे हें ध्यानात ठेवावें.
संदर्भः प पू के वि ऊर्फ बाबा बेलसरे यांच्या उपनिषदांचा अभ्यास या पुस्तकातून [पान १७५]
*संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन*
No comments:
Post a Comment