TechRepublic Blogs

Wednesday, December 3, 2025

नामस्मरण

 *जयश्रीराम 🙏🏻*


*सत्संग व साधना*


आपण सर्व साधक परमार्थाच्या वाटचालीत आहोत. परमार्थाच्या या वाटचालीत देवप्राप्तीचे साधन म्हणजे "सत्संग" होय. संताचा भक्तमेळा म्हणजे सत्संग. आपण म्हणतो कधी कधी वाण तसा गुण. हा चांगला गुण येण्यासाठी सत्संग जरूरीचा असतो. सत्संग हा देवाचा, गुरूचा,संताचा  धरावा. या जगात सत्संग सामर्थ्यवान आहे. जेथे दया,मैत्री व विनय ही लक्षणे वास करतात तेथे संत, साधू व सदगुरू यांचा सत्संग लाभतो. त्यांचा सहवास, त्यांची कृपा हा सत्संग होय. सत्संग हा परमार्थाचा पाया आहे ज्यामुळे आपण सर्व साधक परमार्थाची उच्च पायरी जी साधना आहे ती गाठू शकतो. कारण त्यामुळे आपला अहंकार गळून पडतो तर विनय, क्षमा, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान या गोष्टी कडे आपला कल असण्यास मदत होते. 

सत्संगाने मनुष्य देहाची दुर्लभता कळून येते आणि मग त्यातून भक्तीमार्ग जवळ करून ईश्वरप्राप्तीचे ध्येय निश्चित करतो. यासाठी सद्गुरू, परंपरा व साधना याचा  स्विकार करतो व आपली "साधकावस्था" सुरू होते. म्हणूनच साधना मार्गावरचा महत्वाचा टप्पा म्हणजे सत्संग.  

सत्संगाने ईश्वर प्राप्ती होते म्हणून सत्संग स्विकारताना दुःसंगाचा त्याग केला पाहिजे. दुःसंगाचा म्हणजे काय तर परमार्थावर विश्वास नाही, ज्याच्या मनात कायम शंका, द्वेष,अधर्म आहे, बाहेरून विनय आहे पण अंतःकरणात संताविषयी द्वेष आहे याची संगती म्हणजे दुःसंग. हा सगळा दुःसंग सत्संगाने नाश होण्यास मदत होते. 

यासाठी आपल्या वाणीला   नामाचे साधन द्यावे. नाम हे सत्संगाचे खरे स्वरूप आहे. नामस्मरण या साधनप्रक्रीयेत देव व सद्गुरू उपस्थित असतात.

नामस्मरण हाच सत्संग व नामस्मरण हीच साधना !!!


*🚩🍂जय श्रीराम 🍂🚩*


*सौ. निलिमा कुलकर्णी*

Tuesday, December 2, 2025

मुळापासून सुधारणा

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*


*वेदाप्रमाणे  नामही  अनादी ,  अनंत ,  अपौरुषेय  आहे .*

शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की, कृतयुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने, आणि द्वापारयुगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते. परंतु कलियुगामध्ये त्यांपैकी काहीच साध्य होणे शक्य नसल्याने, भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते.

 शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वत: अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की, साडेतीन कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते; आणि तेरा कोटी जप केला असता, भगवंताचे दर्शन होते. मला आपण महत्त्व देऊ नका; पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो, ते ज्ञानेश्वरमहाराज, एकनाथमहाराज, तुकाराममहाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील, हे शक्यच नाही. 

वेदांना जे परमात्मस्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्रूपत्वाने जाणतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली आहेत, म्हणून संतांनी कळवळून ‘ नाम घ्या ’ असे सांगितले.


वेद भगवंताचे वर्णन करतात. नामदेखील भगवंताचेच अस्तित्व प्रकट करते. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी ‘ हरि: ॐ ’ असते, ते नामच आहे. जसा वेद हा अनादि, तसे नाम हे अनादि. जसा वेद हा अपौरुषेय, तसे नाम हे अपौरुषेय. जसा वेद हा अनंत, तसे नाम हे अनंत आहे.

 प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले, म्हणून ते अनादि साधन आहे. इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहारविहाराची बंधने आहेत, भगवंताच्या नामाला ती नाहीत. नाम हे आगंतुक नाही. आदिनारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ॐ चा ध्वनी केला तेच नाम होय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की, आपण नाम घेत जावे.

 किंबहुना, आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे. वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करीत असताना, म्हणजे वेद म्हणत असताना, आपले लक्ष शब्दांकडे नसावे, त्यांच्या अर्थाकडे असावे. अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावे.

 आपण नेमके तेवढेच विसरतो. नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्याविरुद्ध वर्तन करू नये. आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे. 

भगवंताला लबाडी खपत नाही. आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवितो. इतक्या तन्मयतेने नाम घ्या की, ‘ मी नाम घेतो आहे ’ हे सुद्धा विसरून जा.


*२०३ .  इतर  साधनांनी  लवकर  साधल्यासारखे  वाटेल  पण  ते  तात्पुरते  असते .  नामाने  थोडा  उशीर  लागेल ,  पण  जे  साधेल  ते  कायमचे  साधेल ,  कारण  नामाने  मुळापासून  सुधारणा  होते .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*